Trap Crop Agrowon
ॲग्रो गाईड

सापळा पिकांची लागवड महत्त्वाची...

टीम ॲग्रोवन

डॉ. प्रशांत उंबरकर, डॉ. उषा डोंगरवार

एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या (Integrated Pest Management ) विविध घटकांपैकी सापळा पीक लागवड (Trap Crop Cultivation) उपयुक्त पद्धत आहे. सापळा पिकाचा कीड व्यवस्थापनामध्ये (Pest Management) वापर केल्यास निसर्गाचा समतोल राखून कीड आर्थिक नुकसान पातळी खाली रोखता येते. सापळा पिके हा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक आहे. मुख्य पिकाचे हानिकारक किडीपासून संरक्षण करण्यासाठी हंगामानुसार किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावल्यास कीड त्या पिकाकडे आकर्षित होते. यामुळे मुख्य पिकाचे संरक्षण होते. सापळा पीक लावल्यामुळे रासायनिक कीटकनाशक फवारणीवर होणारा खर्च कामी होतो. मित्र किडींची संख्या संतुलित राहण्यास मदत होते. या सोबतच सापळा पिकापासून अतिरिक्त उत्पन्न मिळते. पर्यावरणाचे संवर्धन होते. मुख्य पिकाच्या उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. भाजीपाला आणि फळपिकामध्ये सापळा पिकाचा उपयोग अतिशय उपयुक्त आहे.

प्रमुख पिकातील सापळा पिके:

सोयाबीन :

१) सोयाबीनभोवती एरंडी या सापळा पिकाची एक ओळ कडेने लावावी. तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा मादी पतंग एरंडीच्या पानावर समूहाने अंडी घालते. त्यामुळे अंडीपुंज आणि प्रादुर्भावग्रस्त एरंडीची पाने अळीच्या समूहासहित नष्ट केल्याने मुख्य पिकाचे संरक्षण होते.

२) सोयाबीन पिकाभोवती ज्वारीची ओळ लावावी किंवा पेरणीच्या वेळेस १०० ग्रॅम ज्वारीचे बियाणे सोयाबीनसोबत मिसळून पेरणी करावी.

३) पिकाभोवती सूर्यफूल किंवा झेंडूची एक ओळ लावावी.

कापूस:

१) पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी. झेंडूच्या पिवळ्या फुलाकडे हिरव्या बोंड अळीचा मादी पतंग आकर्षिला जाऊन त्यावर अंडी घालतो.

२) कपाशीच्या भोवती एक ओळ एरंडीची लावावी. तंबाखूची पाने खाणारी अळीचा मादी पतंग एरंडीच्या पानावर समूहाने अंडी घालतो. असे अंडीपुंज आणि प्रादुर्भावग्रस्त एरंडीची पाने अळ्यांच्या पुंजक्या सहित नष्ट करावीत.

३) कपाशीच्या दहा ओळींनंतर एक ओळ चवळी किंवा मका पिकाची पेरणी करावी. मावा ही कीड चवळी वर मोठ्या प्रमाणावर येते. त्यामुळे ढालकिडा, सिरफीड माशी, क्रायसोपा या मित्रकीटकांची वाढ होते. मका, मूग, उडीद या पिकांवर मित्रकीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते.

तूर :

१) तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनाकरिता ज्वारी किंवा बाजरीची आंतरपीक म्हणून किंवा तूर पेरणीच्या वेळेस १०० ग्रॅम ज्वारी/बाजरी बियाणे १० किलो तुरीच्या बियाण्यासोबत मिसळून पेरणी करावी. यामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षिथांबे तयार होतात आणि हे पक्षी पिकावरील किडींना टिपून नष्ट करतात.

२) तूर पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.

भात ः

१) तुडतुडे, खोडकिडीच्या व्यवस्थापनाकरिता बांधावर भात पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी. यामुळे शत्रू कीटकांवर जगणाऱ्या मित्रकीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते.

२) झेंडू या सापळा पिकामुळे मित्र कीटकांची संख्या वाढते. सूत्रकृमी नियंत्रण करण्यास मदत होते.

भाजीपाला पिके ः

१) कीड व्यवस्थापनाकरिता भाजीपाला पिकामध्ये झेंडू, बडीशेप, मोहरी, कोथिंबीर, गाजर, मका, ज्वारी या सापळा पिकांची लागवड करावी. यावर मित्र किडी, मधमाश्या आकर्षिल्या जातात.

२) टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पिकाच्या कडेने एक ओळ झेंडू आणि दोन ओळी मक्याच्या सापळा पीक म्हणून लावाव्यात. झेंडूच्या मुळामधून अल्फा टर्थीनिल हे रसायन स्रावते. यामुळे सूत्रकृमी नियंत्रण करण्यास मदत होते.

३) कोबीवर्गीय पिकाच्या कडेने एक ओळ मोहरीची लावावी.

--------------------------------------------------------

- डॉ. प्रशांत उंबरकर, ८२०८३७९५०१

(कृषी विज्ञान केंद्र, साकोली, जि. भंडारा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT