कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे (Heavy Rainfall) पावसाचे पाणी जमिनीत न मुरता उताराच्या दिशेने वाहून जाते, यामुळे जमिनीची धूपही होते. अशा परिस्थितीत जमिनीची धूप थांबवणे आणि पडलेल्या पावसाचे पाणी पडेल, त्या जागी मुरवणे (Water Conservation) आवश्यक असते. यालाच मुलस्थानी जलसंधारण असे म्हणतात. गेल्या काही दिवसात बऱ्याचशा भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकांचे नुकसान झाले आहे. शेतातील अतिरीक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. यामध्ये रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी केलेल्या पिकांमध्ये तुलनेने कमी नुकसान झाल्याचं दिसून आलयं. रुंद वरंबा सरी पद्धत भारी जमिनीमध्ये जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. याशिवाय आंतरपीक पद्धत शाश्वत उत्पादन व अधिक आर्थिक उत्पन्नाबरोबरच मृदा व जलसंधारणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे.
१) जलसंवर्धन चर
काळ्या, खोल व भारी जमिनीत पाण्याच्या कमतरतेमुळे भेगा पडतात. अशा जमिनीवर जलसंधारणाकरिता पर्यायी उपाय म्हणून जलसंवर्धन चर फायदेशीर ठरतात. यामध्ये समपातळी अथवा ढाळीच्या बांधाचा चर घेऊन चरामधील माती काठावर टाकून बांध तयार करावेत. चर सलग न ठेवता ठराविक अंतरावर काही भाग न खोदता तसाच ठेवावा. चरामध्ये साठलेले पाणी गरजेच्या काळात संरक्षित सिंचनाकरीता उपयोगी पडते.
२) जलसंधारण किंवा मृत सरी
जमिनीची मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर पेरणीपूर्वी उताराला आडवी काढण्यात आलेली खोल सरी मूलस्थानी जलसंधारणाची एक साधी व उपयुक्त पद्धत आहे. ही सरी पीक काढणीपर्यंत नियमित राखावी लागते. ओळीत पेरलेल्या आंतरपीकासाठी तसेच सलग पीका करीता ही पद्धत उपयुक्त आहे. बैलाच्या सरीच्या नांगराने अथवा कुळवाच्या सहाय्याने उतारानुसार पाच ते दहा मीटर अंतरावर ४५ ते ६० सेंमी रुंद व तीस सेंटीमीटर खोल सरी काढावी. जलसंधारण सरी समपातळीवर घेण्याऐवजी सरीच्या लांबीवर ०.२ ते ०.४ टक्के उतार ठेवल्यास ही सरी जास्त पर्जन्यमानाच्या काळात अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्याचे कार्य करते.
३) उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी
रीजर, बळीराम किंवा लाकडी नांगराने पिकाच्या ओळीमध्ये प्रत्येकी दोन ते चार किंवा सहा ओळीनंतर सरी काढावी. कोरडवाहू पिकाकरिता १५ ते २० सेंमी खोलीची अरुंद सरी उपयुक्त आहे. उभ्या पिकात काढलेल्या अशा सरींचा फायदा दीर्घ कालावधीच्या पिकामध्ये विशेष होतो. कापूस, तूरीसारख्या जास्त अंतरावरील पिकांमध्ये प्रत्येक दोन ओळीनंतर ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन यासारख्या कमी अंतरावरील पिकांमध्ये प्रत्येक चार ते सहा ओळीनंतर सरी काढाव्यात.
४) जैविक बांध तयार करणे
शेताच्या बांधावर झुडूपवर्गीय वनस्पतीची लागवड करुन जैविक बांध तयार करता येतात. जैविक बांध निर्माण करण्यासाठी खस, गिरीपुष्प, सुबाभूळ व झुडूपवर्गीय वनस्पतीचा उपयोग होतो. साधारणतः २५ ते ३० मीटर अंतरावर दोन ओळींमध्ये निवड केलेल्या वनस्पतींची पावसाळ्यात लागवड करावी. वनस्पतीच्या प्रकारानुसार एक ते दोन वर्षात बांध तयार होतो. वेळोवेळी छाटणी करून बांधाची उंची व रुंदी ३० ते ४० सेंटीमीटर राखावी लागते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.