सेंद्रिय कर्बावर अवलंबून जमिनीची सुपीकता 
ॲग्रो गाईड

सेंद्रिय कर्बावर अवलंबून जमिनीची सुपीकता

डॉ. हिंमत काळभोर

जमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे सेंद्रिय कर्बामुळे प्राप्त होतात. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, हिरवळीची खते, जीवाणू खते यांचा भरपूर वापर करावा. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्याने सुपीकता आणि पीक उत्पादकता शाश्‍वत ठेवली जाते. जमीन ही भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांनी युक्त असे सजीव माध्यम आहे. अशी जमीन सर्व वनस्पतींना आधाराबरोबरच योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी आणि आवश्‍यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करते. त्यामुळे पिकाचे चांगले उत्पादन मिळते.  

जमिनीची प्रतवारी

जमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे सेंद्रिय कर्बामुळे प्राप्त होतात. अशी जमीन सुपीक आणि उत्पादनक्षम असते. सेंद्रिय कर्बाविना जमीन पीक उत्पादनासाठी अयोग्य होते. साधारणपणे ०.५ टक्के पेक्षा कमी सेंद्रिय कर्ब असणाऱ्या जमिनीचे आरोग्य खराब समजले जाते. ०.५ ते ०.८ टक्के सेंद्रिय कर्ब असणाऱ्या जमिनी मध्यम, ०.८ ते १.० टक्के असणाऱ्या चांगल्या आणि एक टक्यांपेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असणाऱ्या जमिनी उत्तम समजल्या जातात. सेंद्रिय कर्ब हे जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून जमीन सुपीक व उत्पादक बनविण्याचे महत्त्वाचे कार्य करते. भौतिक गुणधर्म

  • पोत हा मातीमधील रासायनिक खनिज पदार्थाच्या विघटनातून तयार झालेले वाळू कण, गाळाचे कण व चिकण कण यांच्या तुलनात्मक प्रमाणावरून ठरतो.
  • या तीनही मातीच्या कणांचे समतोल मिश्रण असणाऱ्या जमिनी पिकांच्या दृष्टीने उत्तम पोत असणाऱ्या समजल्या जातात.
  • जमिनीतील सेंद्रिय कर्ब मातीच्या या तीन प्रकारच्या कणांच्या एकत्रीकरणातून लहान-मोठे मातीचे संच (ढेकळे) तयार करतात. या ढेकळांचा आकार व प्रकारानुसार जमिनींची विशिष्ठ संरचना तयार होते.
  • मोठ्या पोकळ्या आणि सूक्ष्म पोकळ्यांचे जाळे तयार होऊन जमीन सच्छिद्र बनते.
  • सच्छिद्र जमिनीच्या पृष्ठभागावर पडणारा पावसाचा थेंब मुरतो. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त पाणीसाठा वाढतो. पाणी  जिरण्याच्या चांगल्या शक्तीमुळे अशा जमिनींची पाण्यामुळे धूप कमी प्रमाणात होते.
  • जमिनीतील सूक्ष्म पोकळ्या पिकास लागणारे पाणी जमिनीत धरून ठेवतात. मोठ्या पोकळ्या जादा पाण्याचा निचरा करून जमिनीमध्ये पिकांच्या मुळांना श्वसनासाठी आवश्‍यक असणारी हवा खेळती ठेवण्याचे काम करतात.
  • जमिनीमधील मोठ्या पोकळ्यांमध्ये जीवाणू वसाहती करून राहतात. या पोकळ्यांमध्ये पिकांचीमुळे सहज प्रवेश करून जमिनीचा आधार मिळवतात. अशा जमिनीतील पाणी व अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगल्या प्रकारे होऊन वनस्पतींची वाढ जोमाने होते.
  •    रासायनिक गुणधर्म

  • उत्तम सेंद्रिय कर्ब असणाऱ्या जमिनींचा सामू बहुधा उदासीन पातळीत (६.५ ते ७.५) राखला जातो. उदासीन सामू असणाऱ्या जमिनींमध्ये सर्व आवश्‍यक अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रमाणात होते.
  • असेंद्रिय मातीच्या कणांच्या (वाळू कण, गाळाचे कण, चिकण कण) तुलनेत सेंद्रिय कर्बाचे कण हे आकाराने खूपच लहान असल्यामुळे त्यांचा कार्यक्षम पृष्ठभाग खूप जास्त असतो.
  • जमिनीमध्ये पाणी तसेच अन्नद्रव्य मातीच्या सेंद्रिय तसेच असेंद्रिय कणांच्या पृष्ठभागावर धरून ठेवले जातात.
  • सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितकीच जमिनीची पाणी व अन्नद्रव्य धारण क्षमता अधिक. त्यामुळे पीक वाढीसाठी त्यांची उपलब्धता अधिक.
  • उत्तम सेंद्रिय कर्ब असणाऱ्या जमिनींची अन्नद्रव्य धारण क्षमता चांगली असल्यामुळे अशा जमिनीत रासायनिक खतांच्या     पुरवठ्यामुळे होणारा जमिनीचा सामूतील बदल सहन करण्याची क्षमता अधिक असते.
  •    जैविक गुणधर्म

  • जमिनीमध्ये सतत घडणाऱ्या सर्व जैव रासायनिक क्रिया या उपयुक्त जीवाणूंद्वारे स्रवणाऱ्या विकरांच्याद्वारे घडत असतात.
  • सेंद्रिय कर्ब हे जीवाणूंचे खाद्य असल्यामुळे जमिनीत जेवढे कर्ब जास्त तेवढी उपयुक्त जीवाणूंची संख्या आणि तितकीच विकरांची कार्यक्षमता जास्त. त्यामुळे पुढील सर्व जैव रासायनिक क्रिया जोमाने होऊन पिकांना आवश्‍यक अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होऊन पीक उत्पादन वाढीस मदत होते.
  • सेंद्रिय पदार्थांची विघटन क्रिया होते.
  • उपलब्ध स्वरूपात नसलेल्या आणि पाण्यात अविद्राव्य असलेल्या अन्नद्रव्यांचे पाण्यात विद्राव्य आणि उपलब्ध स्वरूपात रुपांतर.
  • हवेतील नत्राचे पिकांना घेता येण्याजोग्य अमोनिया स्वरूपात रुपांतर.
  • उपयुक्त जीवाणूंद्वारे हानिकारक जीवाणूंचे नियंत्रण.
  • सेंद्रिय कर्ब कमी होण्याची कारणे

  •  सेंद्रिय निविष्ठांचा कमी वापर.
  •  पीक अवशेष जाळणे.
  •  जमिनीची अवाजवी मशागत.
  •  अतिरिक्त नत्र खताचा वापर.
  • सेंद्रिय कर्ब
  • वाढविण्यासाठी उपाय ः

  • शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खते, जिवाणू खतांचा नियमित वापर.
  • पिकांच्या शिल्लक अवशेषांचा पुनर्वापर.
  • जमिनीची गरजेपुरती मशागत.
  • जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा आच्छादनासाठी वापर.
  • चांगल्या जमिनीतील घटक

  • रासायनिक खनिज पदार्थ ः ४५ ते ४८ टक्के
  • सेंद्रिय कर्बयुक्त पदार्थ ः २ ते ५ टक्के
  • पाणी ः २५ टक्के
  • खेळती हवा ः २५ टक्के  
  • संपर्क ः डॉ. हिंमत काळभोर, ८२७५४७३५१६ (मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

    Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

    Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

    Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

    Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

    SCROLL FOR NEXT