पीक अवशेषापासून अधिक ज्वलनशील व पर्यावरणपूरक ब्रिक्वेट तयार करण्यासाठी ब्रिक्वेटिंग मशिन.
पीक अवशेषापासून अधिक ज्वलनशील व पर्यावरणपूरक ब्रिक्वेट तयार करण्यासाठी ब्रिक्वेटिंग मशिन. 
ॲग्रो गाईड

पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह पर्यावरणासाठी फायदेशीर

डॉ. एस.आर. काळबांडे, विवेक खांबलकर

शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी ते बहुतांश वेळी जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांच्या कल असतो. त्यातून पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र, त्याच्या घनीकरणातून किंवा ब्रिक्वेटिंगमधून उत्तम प्रतीचे इंधन बनवणे शक्य आहे. हे इंधन प्रदूषण करणारे नसून, त्यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात उत्पन्नही मिळू शकते. 

कृषिप्रधान भारतातून दरवर्षी ३५० अब्ज टन कृषी अवशेष तयार होतात. त्यांचे प्रमाण व आकारमान मोठे असल्याने वाहतूक करणे, हाताळणी करणे अडचणी व अंतिमतः महाग ठरते. सध्या असे अवशेष जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यातून पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन व अन्य प्रदूषक घटक मिसळले जातात. त्याचा फटका सर्वसामान्यांच्या आरोग्याला बसू शकतो. उपलब्ध असलेल्या कृषी अवशेषांचे साधारण वर्गीकरण खालीलप्रमाणे. 

कृषी अवशेषांचे साधारण वर्गीकरण

अ. क्र.   प्रकार    प्रमाण (अब्ज टनामध्ये)
१)      तांदळाचा तूस (राइस हस्क) १०.००
२)    उसाची चिपाडे  ३१.००
३)      भुईमुगाची टरफले   ११.१०
४)      तुराट्या    २.५०
५)     विविध तेलबियांची देठे/काड्या     ४.५०
६)      विविध धान्यांच्या आणि डाळींच्या तुराट्या    २२५.००
७)      इतर     ६५.९०
एकूण      ---- ३५०.००

या पीक अवशेषांचे घनीकरण किंवा ब्रिक्वेटिंग केल्यास त्याचा वापर विविध उद्योगांमध्ये इंधन म्हणून होऊ शकतो. ते प्रदूषणकारक नसल्याने त्याला ‘व्हाइट कोक’ असे संबोधतात.  कच्च्या मालानुसार ब्रिक्वेट्‌सचे सामान्यपणे तीन प्रकार पडतात. 

  • कोळशाच्या भुग्यापासून बनविलेल्या ब्रिक्वेट्‌स
  • लाकडापासून बनविलेल्या ब्रिक्वेट्‌स
  • कृषी अवशेषांपासून बनविलेल्या ब्रिक्वेट्‌स
  • घनीकरण प्रक्रियेसाठीचे तंत्रज्ञान : कृषी अवशेषांचे घनीकरण करण्याच्या प्रक्रियेत यांत्रिक दाबाचा उपयोग केला जातो. त्यामुळे पूर्वीपेक्षा पदार्थांची साठवण आणि हाताळणी सोपी होऊ शकते.  ब्रिक्वेटिंग हे एक प्रकारचे जैविक घनीकरण तंत्रज्ञान आहे. साधारणतः कृषी अवशेंषांची घनता ०.१ ते ०.२ ग्रॅम/ घन सें.मी. असते, तर त्यापासून बनवलेल्या ब्रिक्वेट्‌सची घनता १.२ ग्रॅम/ घन सें.मी. असते. व्यावसायिकरीत्या ब्रिक्वेट तयार करण्यासाठी पिस्टन प्रेस व स्क्रू प्रेस यंत्रांचा वापर केला जातो. या दोन्ही तंत्रांची तुलना केली असता स्क्रू प्रेस ब्रिक्वेट हे पिस्टन प्रेसपेक्षा उत्कृष्ट आहे. तुलना तक्त्यात दिली आहे.

      प्रिस्टन प्रेस     स्क्रू प्रेस
    कच्च्या मालाची कमीत कमी आर्द्रता   १०-१५     ८-९
    मशिनच्या भागांची झीज      कमी प्रमाणात     जास्त प्रमाणात
    मशिनपासून उत्पादन     -     -   
    शक्तीचा वापर    ५० कि. वॅट/ टन      ६० कि. वॅट/ टन
    ब्रिक्वेट्‌सची घनता     १-१.२ ग्रॅ./ सें.मी.      १-१.४ ग्रॅ./ घनसें.मी.
    देखभाल      जास्त    कमी
    ब्रिक्वेट्‌सचे ज्वलन      ठीक     चांगले
    कोशळ्यामध्ये रुपांतरीकरण     शक्‍य नाही     चांगल्या प्रकारचा कोळसा
    गॅसीफायरमध्ये वापर      शक्‍य नाही     वापरू शकतो
    ब्रिक्वेट्‌सचा एकजिनसीपणा     एकजिनसी नसतात   एकजिनसी असतात
  • या तंत्रज्ञानामध्ये घनीकरणासाठी कुठल्याही प्रकारचे रसायन/ गोंद वापरले जात नाही. 
  • या तंत्रज्ञानात जास्त तापमान आणि दाब यांच्या प्रक्रियेमुळे कृषि अवशेषातील लिग्निनचे रुपांतर द्रवपदार्थांत होते. ते बांधणीचे काम करते. पुढे त्यांचे घन लंबवर्तुळाकृती आकारामध्ये रुपांतर केले जाते. 
  • लाकडाच्या तुलनेत ब्रिक्वेट जास्त काळ जळत राहतात. 
  • ज्वलनाच्या वेळी फारच कमी धूर निघतो. 
  • पूर्णपणे व एकसमान ज्वलन होते.
  • ब्रिक्‍वेटिंग तंत्रज्ञानाचे तीन प्रकार :

    1. जास्त दाबाची प्रक्रिया :  सूक्ष्म पदार्थांना जास्त दाब देऊन दाबले तर बांधणीची गरज लागत नाही. ब्रिक्वेटिंगच्या प्रक्रियेमध्ये जैविक पदार्थ सलग असलेल्या बॅरेलच्या भिंतीवर जोराने आदळतात. त्यामुळे घर्षण बल तयार होते. त्याच्या आंतर्गत घर्षणामुळे आणि जास्त चक्रिय वेगामुळे (६०० फेरे प्रति मिनिट) तापमान वाढते. त्यामुळे जैविक पदार्थांची उष्णता वाढते, त्याच्यानंतर ते जोराने चक्रतीतून बाहेर टाकतात. तिथे पाहिजे त्या आकारामध्ये ब्रिक्वेट्‌सला आकार दिला जातो.
    2. मध्यम दाबासोबत उष्णता वाढविणारे तंत्र 
    3. कमी दाबासोबत बांधणी (गोंद/ रसायने) यांचा उपयोग करणे.

    शेतकऱ्यांकडे शिल्लक राहणाऱ्या कृषी अवशेषापासून ब्रिक्वेटिंग बनवण्याविषयी माहिती घेऊ.  कृषी अवशेषापासून ब्रिक्वेटिंग निर्मिती संयंत्र उपलब्ध आहे. त्याद्वारे कमी घनता असलेल्या कृषी पदार्थांचे जास्त घनता असणाऱ्या जैविक इंधनामध्ये (ब्रिक्वेट्‌स, जैविक कोळसा किंवा पांढरा कोळसा) रुपांतर केले जाते. विविध प्रकारच्या भट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कोळशाच्या किंवा लाकडाच्या ऐवजी ब्रिक्वेट्‌सचा उपयोग सहजरित्या करू शकतो.

    कच्च्या मालाची वैशिष्ट्ये :

  • लांबी रुंदी/ आकार जास्तीत जास्त २० मिली मीटर
  • ओलावा १०% पेक्षा कमी
  • कच्च्या मालाचा/ जैविक पदार्थांचा दर ठिकाण आणि उपलब्धतेवर वेगळा असतो. 
  • कच्च्या मालाची प्रक्रिया (गरज असल्यास) :

  • कच्च्या मालातील पाण्याचे प्रमाण १०% पेक्षा जास्त असल्यास ते वाळवून कमी करून घ्यावे लागते. 
  • कच्चा माल २० मिली मीटरपेक्षा अधिक लांबीचा असल्यास कापण्याची प्रक्रिया करणे गरजेचे ठरते.
  • प्रक्रियेनंतर तयार झालेल्या ब्रिक्वेट्‌स : बांधणीविरहित तंत्रज्ञानानुसार बनवलेल्या ब्रिक्वेट्‌समध्ये कोणतेही रसायन किंवा गोंद वापरलेले नसल्याने १००% नैसर्गिक असतात. त्यांची आकारमानची घनता ८०० किलो/ घन मीटर असते. ब्रिक्वेट हे एक आदर्श इंधन आहे कारण :

  • ब्रिक्वेट हे एक पूनः उत्पादीत उर्जा इंधन आहे.
  • कोळसा आणि लाकडापेक्षा स्वस्त आणि किफायतशीर आहे.
  • राखेचे प्रमाण अत्यंत अल्प ( म्हणजेच २-५%) राहते. 
  • गंधक किंवा हानिकारक घटक नसल्यामुळे प्रदूषणमुक्त आहे.
  • ओलावा कमी असल्याने दाहक क्षमता जास्त आहे.
  • घनता आणि स्थिर कार्बनचे प्रमाण जास्त आहे.
  • इतर कोळशापेक्षा ब्रिक्वेट्‌सचे ज्वलन एकसारखे होते.
  • एकसमान आकारामुळे त्यांची साठवणूक करणे आणि ज्वलन करणे सोयीस्कर आहे.
  • स्क्रू प्रेसपासून बनविल्या जाणाऱ्या ब्रिक्वेट्‌सचा व्यास ४५-६० मिली-मीटर असून, त्याचे पूर्ण ज्वलन होते.
  • संपर्क : डॉ. एस. आर. काळबांडे, ०७५८८७६३७८७ (अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

    Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

    Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

    Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

    Boycott of voting : फक्त महाराष्ट्रच नाही तर युपीच्या दोन गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार

    SCROLL FOR NEXT