बरसीम लागवड तंत्रज्ञान
बरसीम लागवड तंत्रज्ञान  
ॲग्रो गाईड

पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम

डॉ. बाबासाहेब सिनारे,  हेमचंद्रसिंह परदेशी, अजित सोनोने

बरसीम पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे. लागवडीसाठी वरदान, मेस्कावी  या जातींची निवड करावी.

दुग्ध व्यवसायात संतुलित आहारासाठी एकदल व द्विदल वर्गीय चारा योग्य प्रमाणात दिल्यास दूध उत्पादनाबरोबर स्निग्धांश वाढतो. बरसीम हे द्विदल वर्गीय चारा पीक आहे. या चाऱ्यात प्रथिने, खनिजे, ‘अ’ व ‘ड’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. चारा पालेदार, लुसलुशीत आणि चविष्ट असतो. या चाऱ्यामुळे जनावरांची भूक भागते. पचनक्रिया सुधारते. शरीराची झीज भरून निघते. हाडांची वाढ होते. पौष्टीकतेचा विचार करता बरसीम पिकात (शुष्काशांवर आधारीत) १७ ते १९ टक्के प्रथिने आहेत.

  • मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. 
  • लागवडीपूर्वी एक खोल नांगरट करून उभी-आडवी कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते. 
  • लागवडीसाठी ५ x ३ मीटर आकाराचे वाफे बांधावेत. जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करून पाणी सम प्रमाणात बसेल असे पहावे.
  • भेसळविरहित, शुद्ध बरसीम बियाणे निवडावे. पेरणी १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५ किलो बियाणे लागते. दोन ओळीत ३० सें.मी. अंतर ठेऊन पेरणी करावी. त्यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते. बियाणे फेकून पेरल्यास जास्त लागते. उगवण एकसारखी होत नाही. आंतरमशागतीसाठी अडचणी येतात. त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होतो. म्हणून बियाणे ओळीत पेरावे.
  • पेरणीपूर्वी दहा किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बियाणे थोडावेळ सावलीत वाळवून पेरणी करावी.
  • सुधारित जाती : वरदान, मेस्कावी.
  • हेक्‍टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पूर्व मशागतीवेळी जमिनीत मिसळून घ्यावे. पेरणीपूर्वी हेक्‍टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश जमिनीत मिसळून द्यावे.
  • पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांच्या आत एक कोळपणी व एक खुरपणी करावी.
  • जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याचे नियोजन करावे. हिवाळ्यात १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • पेरणीनंतर पहिली कापणी ४५ ते ५० दिवसांनी करावी. कापणी जमिनीपासून ५ ते ६ सें. मी. उंचीवर करावी. कापणी करताना पीक उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी, त्याकरिता धारदार विळ्याचा वापर करावा. पहिल्या कापणीनंतर भरपूर फुटवे येऊन पुढे चांगले उत्पादन मिळते. पुढील कापण्या २१ ते २५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
  • हिरव्या चाऱ्याचे ३ ते ४ कापण्यांद्वारे प्रति हेक्‍टरी  ६०० ते ८०० क्विंटल उत्पादन मिळते.
  • बीजोत्पादन तंत्रज्ञान : 

  • बीजोत्पादन घेण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र राखून ठेवण्याची आवश्‍यकता नसते. कारण चाऱ्याकरिता घेतलेल्या पिकामधूनच आवश्‍यक क्षेत्र बीजोत्पादनासाठी राखून ठेवता येते. 
  • पिकाची चाऱ्यासाठीची कापणी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येईल असे  नियोजन करून कापणीनंतर पिकास १५ ते २० दिवसांचा पाण्याचा ताण द्यावा. दरम्यानच्या काळात पीक तणविरहीत ठेवून जमीन हलवून घ्यावी. पुढील प्रत्येक पाण्याच्या पाळीतील अंतर ४ ते ५ दिवसांनी वाढवावे. 
  • बियाणे तयार होण्यास ७५ ते ८० दिवसांचा कालावधी लागतो. साधारणपणे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पीक बियाण्याच्या कापणीस तयार होते.
  • कापणीनंतर पीक पूर्णपणे वाळवावे. त्यानंतर मळणी करून बियाणे स्वच्छ करावे. पूर्ण वाळलेले बियाणे योग्य पद्धतीने साठवून ठेवावे. शिल्लक भुसा जनावरांना खाऊ घालावा. पीक चांगले जोमदार असल्यास हेक्‍टरी ३ ते ४ क्विंटल बियाणे मिळते.
  • संपर्क :  हेमचंद्रसिंह परदेशी, ०२४२६- २४३२२३ (अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन व उपयोगिता प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT