The leaves on the citrus tree turn yellow due to various reasons
The leaves on the citrus tree turn yellow due to various reasons 
ॲग्रो गाईड

संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची कारणे, उपाययोजना

डॉ. रविंद्र काळे, राजेश डवरे

संत्रा बागेत पाने पिवळी पडण्याची समस्या अनेक बागायतदारांना दिसून येते. पाने पिवळी पडण्याची कारणे परिस्थितीनुसार भिन्न असू शकतात. ती नेमकेपणाने जाणून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. संत्रा बागेत पाने पिवळी पडण्याची संभाव्य कारणे 

  • बऱ्याच संत्रा बागेत कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या शेंड्यापासून खाली वाळत येतात. फांद्यावरील पाने पिवळी पडतात व गळतात. फांदीचा शेंड्यापासून खाली वाळत आलेला भाग पांढुरका दिसतो. त्यावर सूक्ष्म काळ्या गोल पुटकुळ्या दिसतात. अशी लक्षणे दिसल्यास ती शेंडे मर या रोगाची असू शकतात
  • बऱ्याच वेळा संत्राच्या झाडाचा तजेलपणा नाहीसा होतो. काही बागांमध्ये संत्र्याच्या झाडाची एकच फांदी किंवा झाडाचा एकच भाग पिवळा पडलेला दिसतो, अशा झाडावर फायटोप्थोरा बुरशीचा जमिनीतून प्रादुर्भाव झाला का, याचे निदान करून घेणे गरजेचे असते.
  • जुन्या संत्रा बागेत जमिनीचे निर्जंतुकीकरण न करता त्याच जागेवर लागवड केल्यास, विशेषतः झाडाचा कलम युतीचा भाग जमिनीजवळ किंवा जमिनीत गाडला गेल्यास अशा संत्रा बागेत पाय कुज व मूळकूज या रोगाचा प्रादुर्भाव होतो. झाडाची मुळे तंतुमय मुळ्याकडून मुख्य मुळ्याकडे कुजण्यास सुरुवात होते. मुळाची साल कुजून पुढे मुळाचा आतील भागही इतर बुरशीच्या प्रादुर्भावामुळे कुजतो. अशा वेळेस रोगग्रस्त झाडाची पाने प्रथम मलूल होऊन मुख्य शिरा पिवळ्या पडतात. पुढे पूर्ण पाने पिवळी पडून गळून पडतात. अशा रीतीने पूर्ण झाड पर्णहीन होऊन वाळते. अशा प्रकारची लक्षणे पाय कुज व मुळकुज या रोगात आढळून येतात.
  • चुनखडीचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या जमिनीत संत्र्याची लागवड असल्यास, अशा झाडांना स्फुरद ,पोटॅश, झिंक व मॅग्नेशिअम या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते. अशा अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडू शकतात.
  • ज्या बागेत मृग बहार काही कारणास्तव फुटला नाही, अशा बागेत पुन्हा एकदा आंबिया बहारा करिता ताण दिल्यास व ताणांच्या अन्नद्रव्यांचे योग्य नियोजन न झाल्यास पाने पिवळी पडू शकतात. पानगळ सुद्धा वाढण्याची शक्यता असते.
  • उपाययोजना  पाने पिवळी पडण्याचे नेमके कारण शोधून, त्यानुसार खालीलपैकी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

  • पाने पिवळ्या पडलेल्या संत्रा बागेला अतिरिक्त ताण देण्याचे टाळावे.
  • माती परिक्षणाच्या आधारावर झाडाचे वय लक्षात घेऊन शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. सर्वसाधारणपणे दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या झाडासाठी एक किलो अमोनियम सल्फेट, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा १०: २६ :२६ हे मिश्रखत दोन किलो प्रति झाड याप्रमाणे झाडाच्या परीघात द्यावे. झाडाचे वय दहा वर्षापेक्षा कमी असल्यास खताची मात्रा अर्धी करावी.
  • माती परिक्षणाच्या आधारावर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन झिंक सल्फेट दोनशे ग्रॅम, आयर्न सल्फेट दोनशे ग्रॅम व बोरॉन १०० ग्रॅम प्रति झाड शेणखतात मिसळून जमिनीतून द्यावे.
  • आवश्यकतेनुसार झिंक लोह व बोरॉन हे अन्नद्रव्य असणारे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त फवारणीचे चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण २० ग्रॅम प्रति दहा लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी
  • संत्रा झाडावर शेंडे मर या रोगाची वरील प्रमाणे लक्षणे आढळून आल्यास झाडावरील रोगग्रस्त व वाळलेल्या फांद्या किंवा सल पावसाळ्यापूर्वी काढून घ्याव्यात. त्यानंतर पानावरील ठिपके या रोगाकरिता कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २.५ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने पुढील फवारणी करावी.
  • संत्र्यावरील फायटोप्थोरा म्हणजे पायकुज, मूळकूज व डिंक्या या रोगाच्या प्रतिबंधासाठी ठिबक सिंचन किंवा डबल रिंग पद्धतीद्वारे ओलिताचे व्यवस्थापन करावे.
  • रोगग्रस्त झाडाच्या सालीतून डिंक निघताना, वाहताना दिसल्यास रोगग्रस्त झाडाची साल धारदार व निर्जंतुक केलेल्या पटाशीने किंवा चाकूने काढून टाकावी. रोगग्रस्त भाग एक टक्का पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावा. त्यावर बोर्डो पेस्ट (१ टक्के) १:१:१० या प्रमाणात तयार करून लावावा.
  • झाडाच्या परिघात सायमॉक्झॅनिल (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम अधिक जवस तेल ५ मिली प्रती लीटर पाणी या प्रमाणे प्रत्येक झाडाच्या आळ्यामध्ये आळवण करावी. (लेबल क्लेम आहे.)
  • वर्षातून दोन वेळा म्हणजे पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात व पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात १:१:१० या प्रमाणात एक टक्का बोर्डो मलम तयार करून झाडाच्या बुंध्यावर जमिनीपासून एक मीटर अंतरापर्यंत लावावा.
  • डिंक्या किंवा पाय कुज किंवा मुळकूज यांची लक्षणे दिसून येताच ट्रायकोडर्मा हरजियानम अधिक ट्रायकोडर्मा ऍस्पिरिलियम अधिक सुडोमोनास फ्लुरोसन्स १०० ग्रॅम (प्रत्येकी) प्रति झाड एक किलो शेणखतात मिसळून झाडाचे परीघात जमिनीत मिसळून द्यावे. (या जैविक कीडनाशकांना ॲग्रेस्को शिफारस आहे.)
  • आंबिया बहराचे व्यवस्थापन शास्त्रोक्त शिफारशीप्रमाणे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.
  • संपर्क- राजेश डवरे, ९४२३१३३७३८ (कृषी विज्ञान केंद्र, करडा, ता. रिसोड, वाशिम)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT