onion seed production
onion seed production 
ॲग्रो गाईड

योग्य प्रकारे करा कांदा बियाणांची काढणी

डॉ. राजीव काळे, डॉ. शैलेंद्र गाडगे

कांदा गोंड्यांची काढणी सकाळच्या वेळी करावी. सकाळच्यावेळी वातावरणातील आद्रतेमुळे गोंड्यावर हलकासा ओलसरपणा असतो. त्यामुळे बी गळून पडण्याची भीती नसते. गोंडे खुडून काढावेत, ओढून काढू नयेत.

सध्या कांदा बियाणे काढणीचा हंगाम सुरू आहे. बरेच शेतकरी स्वतःपुरते व थोड्याफार प्रमाणात विक्रीसाठी कांदा बियाणे तयार करतात. चांगल्या गुणवत्तापूर्वक कांदा उत्पादनासाठी सुधारित जातींबरोबरच बीजोत्पादनावेळी व बीज काढणीपश्‍चात योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते.  पक्व बियाण्याची काढणी 

  • कांद्याच्या फुलांचे दांडे निघण्याचा काळ हा एकसमान नसतो. त्यामुळे एका झाडात वेगवेगळ्या काळात बी परिपक्व होते. बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्यांचा रंग तपकिरी होतो. बियांचे बाह्य आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यातील ५ ते १० टक्के आवरणे फाटून बी दिसायला लागल्यावर बी परिपक्व झाले असे समजावे. असे गोंडे काढून घ्यावेत.
  • एका शेतातील सर्व गोंडे एकदम तयार होत नाही. गोंडे तयार होतील तसे काढून घ्यावेत. सामान्यतः ३ ते ५ वेळा गोंड्याची काढणी हाताने करावी लागते.
  • गोंड्यांची काढणी सकाळच्या वेळी करावी. कारण सकाळच्या वेळी वातावरणातील आद्रतेमुळे गोंड्यावर हलकासा ओलसरपणा असतो, त्यामुळे बी गळून पडण्याची भीती नसते. 
  • गोंडे खुडून काढावेत, ओढून काढू नयेत. गोंडे काढताना मुख्य झाड उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • बी सुकवणे आणि मळणी 

  • गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावेत. गोंडे सुकवताना ३ ते ४ वेळा खाली वर करावेत. 
  • गोंडे चांगले न सुकल्यास बी मळणी अवघड होते. तसेच बियांवर सालपट चिकटून राहिल्याने त्यांची भौतिक शुद्धता कमी होते. 
  • चांगल्या सुकलेल्या गोंड्यामधून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. जास्त जोरात कुटल्यावर बियांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यानंतर उफणणी करून बी स्वच्छ करावे.
  • हलके, फुटलेले, पोचट बी चाळणीच्या किंवा प्रतवारी यंत्राच्या साहाय्याने वेगळे करून उत्तम प्रतीचे बी एकत्र करावे.  
  • साठवण     

  • मळणी केलेल्या बियांमध्ये १० ते १२ टक्के आर्द्रता असते. त्यामुळे स्वच्छ केल्यानंतर बी पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ ते ७ टक्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. 
  • अशा बियांचे आयुष्य एक ते दीड वर्ष असते. बियांत पाण्याचा अंश ६ ते ७ टक्के पेक्षा जास्त राहिल्यास त्यांची उगवण क्षमता कमी होते.
  • आपल्या येथे कांदा बी काढणी उन्हाळ्यात होत असल्याने वातावरण कोरडे व उष्ण असते. त्यामुळे सुकवण चांगली होऊन बियांमध्ये ७ टक्के आर्द्रताराखणे सोपे जाते. 
  • कांदा बी जास्त दिवस साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकिंग साहित्याचा वापर केला जातो. उदा. कापडी पिशवी, प्लॅस्टिक पिशवी, कागदी पाकीट, ॲल्युमिनियम पाकीट किंवा ॲल्युमिनियम पॉलिथिन पाकीट आदी.
  •  जास्त दिवस बी चांगले ठेवण्यासाठी आर्द्रता रोधक पिशव्यांचा वापर करावा. परंतू, या पिशव्यांमध्ये बी ठेवण्याआधी बियांमध्ये ६ टक्केपेक्षा जास्त आर्द्रतानसावी. बियांच्या पॅकिंगसाठी हवाबंद टीनच्या डब्यांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी वाळवून भरले तर दोन वर्ष चांगले राहू शकते. कांदा बियाणे योग्य प्रकारे पॅकिंग करून साठवले नाही तर १२ महिन्यांच्या आत त्यांची उगवण क्षमता नष्ट होते.
  • शीतगृहामध्ये १२ ते १५ अंश सेल्सिअस आणि ३५ ते ४५ टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणात बियाणे २ ते ३  वर्षांसाठी ठेवता येते. मात्र साठवणुकीच्या आधी बियाण्याची आर्द्रता ६ टक्के पातळीवर राखलेली असावी.
  •  पॅकिंग केलेल्या बियांच्या पाकिटावर किंवा पिशवीवर जातीचे नाव, बियांचे प्रकार, पॅकिंगची तारीख, उगवण क्षमता इत्यादी सर्व बाबींची नोंद करणे आवश्‍यक आहे.
  • - डॉ. राजीव काळे, ९५२१६७८५८७,

    (राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संस्था, राजगुरूनगर, जि.पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT