जिरायती गहू लागवडीतील तंत्रे
जिरायती गहू लागवडीतील तंत्रे 
ॲग्रो गाईड

जिरायती गहू लागवडीतील तंत्रे

डॉ. विजेंद्र एस. बाविस्कर, डॉ. यशवंतकुमार के. जे.

जिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. जिरायती क्षेत्रासाठी दोन ओळीतील अंतर २३ सें.मी. ठेवावे. बियाणे ५ से.मी.पेक्षा जास्त खोल पेरू नये, त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा/वापसा असताना पेरणी करावी. पेरणी शक्यतो दक्षिण-उत्तर दिशेने करावी, त्यामुळे पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळून उत्पादनामध्ये वाढ होते. राज्यातील बहुतांश क्षेत्र (८७ टक्के) अवर्षणप्रवण असून, प्रामुख्याने खरिपामध्ये पिके घेतली जातात. रब्बीमध्ये परतीच्या पावसामुळे मुरलेल्या ओलाव्यावर अनेक पिकांची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात केली जाते. जिरायती गहू लागवड वाढवण्यासाठी या परतीच्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याच बरोबर जमिनीची योग्य सुधारणा, सुधारित जाती, वेळेवर पेरणी, आवश्यक त्या वेळी संरक्षित पाणी, रोग व कीड संरक्षण या बाबी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.

जमीन :

  • चांगल्या निचऱ्याची, भारी आणि खोल जमिनीची निवड करावी.
  • हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे.
  • जिरायत गहू ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीतच घ्यावा.
  • जमिनीची पूर्वमशागत योग्य पद्धतीने करून जमीन तयार ठेवावी.
  • पूर्वमशागत : गहू पिकाच्या उपयुक्त मुळ्या ६० ते ७५ सेंमी. खोलवर जातात. त्यामुळे जमिनीची चांगली मशागत गरजेची असते. खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर लोखंडी नांगराने १५ ते २० सेंमी. खोलवर जमीन नांगरून, ३ ते ४ वेळा वखराच्या पाळ्या द्याव्यात. आधीच्या पिकाची धसकटे व तण वेचून जमीन स्वच्छ करून घ्यावी.

    पेरणीची वेळ : जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.

    पेरणी :

  • पेरणीचे दोन ओळीतील अंतर २३ सें.मी. ठेवून करावी.
  • बियाणे ५ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये, त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते.
  • जमिनीमध्ये पुरेसा ओलावा/वापसा असताना पेरणी करावी.
  • पेरणी शक्यतो दक्षिण-उत्तर दिशेने करावी, त्यामुळे पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळून उत्पादनामध्ये वाढ होते. उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते.
  • पेरणी शक्यतो दोन चाड्याच्या पाभरीने किंवा सुधारित खते व बियाणे पेरणी यंत्राने करावी. या पद्धतीने पेरणीबरोबरच रासायनिक खतेही देता येईल.
  • जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ४.० मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब सारे पाडावेत. उताराला आडव्या दिशेने पाट पाडावेत.
  • बियाणे व बीज प्रक्रिया :

  • जिरायत गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. तसेच २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर + २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया गुळाच्या पाण्याबरोबर करावी. नंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीमध्ये वाळवून पेरणीसाठी वापरावे.
  • सेंद्रिय तसेच रासायनिक खत व्यवस्थापन :

  • हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत/कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत २ टन प्रति हेक्टर कुळवाच्या पाळीने मिसळावे. जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे किंवा युरिया-डीओपी ब्रिकेट मार्फत पेरणीचे अंतर कमी करून दोन जोड ओळीमध्ये १ गोळी (२.७ ग्रॅम वजनाची) १० से.मी खोल खोचावी.
  • गहू फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असताना (३० दिवसांनी) १९:१९:१९ @ ७० ग्रॅम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २% युरियाची फवारणी करावी.
  • जिरायत/कोरडवाहू गव्हाचे सुधारित वाण व  वैशिष्ट्ये सरबती वाण १. एन. आय.- चपातीसाठी चांगला २. एच.डी.२७८१ (आदित्य) - तांबेरा रोगास प्रतिकारक ३. के.९६४४ (अटल) -तांबेरा रोगास प्रतिकारक, उष्णता सहनशील ४. एन.आय.ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती) - १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक

    बन्सी वाण ५. एम.ए.सी.एस. -पास्तासाठी उत्तम ६. एकेडीडब्लू २९९७-१६(शरद) -चपाती व पास्ता साठी उत्तम ७. एन.आय.डी.डब्लू. १५ (पंचवटी) - प्रथिने १२%, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, तांबेरा रोगास प्रतिकारक ८. एम.ए.सी.एस. -तांबेरा रोगास प्रतिकारक, प्रथिने १४.७%,जस्त ४०.३ पीपीएम, लोह ४६.१ पीपीएम रांची येथे नुकत्याच झालेल्या भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था, कर्नाल (हरियाना) आणि बिरसा कृषी विद्यापीठ, रांची(झारखंड)द्वारे संयुक्तपणे आयोजित केलेल्या तीनदिवसीय अखिल भारतीय गहू आणि बार्ली संशोधक परिषदेत आघारकर संशोधन संस्थेने विकसित केलेल्या जिरायती बन्सी गव्हाचा नवीन वाण “एम.ए.सी.एस ४०२८” प्रसारीत करण्यात आला. या वाणाची शिफारस द्वीपकल्पीय भारत (कर्नाटक आणि महाराष्ट्र) या भागांसाठी जिरायती वेळेवर पेरणीसाठी करण्यात आली आहे. या वाणात प्रथिने १४.७%, सूक्ष्मपोषणतत्त्वे- जस्त ४४.० पीपीएम व लोह ४२.८ पीपीएम यांचे प्रमाणदेखील अधिक आहे. आंतरमशागत : पेरणीपासून ३० ते ४० दिवसांच्या आत तणाचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. जरुरीप्रमाणे १-२ कोळपणी करून जमीन मोकळी करावी त्यामुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. जिरायती गव्हामध्ये जमिनीवर आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा जास्त टिकून राहतो.

    पाणी व्यवस्थापन : जिरायत गहू हा पावसावर आणि कमी पाणी असणाऱ्या भागामध्ये घेतला जातो. मात्र, १ किंवा २ संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास खालील प्रकारे नियोजन करावे. एकच पाणी देणे शक्य असेल, तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी पाणी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी द्यावे. गहू पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत, त्या वेळी पिकास पाणी देणे फायद्याचे आहे.

    जिरायत गहू लागवडीसाठी महत्त्वाचे... गव्हाच्या कल्याण सोना, सोनालिका आणि लोकवन या जाती तांबेरा रोगास बळी पडत असल्यामुळे त्याची लागवड करू नये. जमिनीची मशागत करताना खरीप पीक जर सोयाबीन किंवा गळीत धान्य असेल तर एकच कुळवणी करावी. बियाणे निवड करताना जिरायत लागवडीसाठी योग्य व सुधारित वाणाची निवड करावी. बियाणे कीड व रोग मुक्त असावे.

    शेततळी : साधारणतः एकूण पावसाच्या पाण्यापैकी १५ ते २० टक्के पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते. पाणलोट क्षेत्रात शेततळी खोदून असे वाहून जाणारे पाणी त्यात साठविता येतो. शेततळी पाणलोट क्षेत्राच्या खोलगट भागात खोदावेत. उंचवट्याच्या जमिनीवरून वाहून जाणारे पाणी तळ्याकडे वळवण्यासाठी योग्य ठिकाणी गवताचे रस्ते तयार करावेत. अशा प्रकारे तळ्यात साठविलेले पाणी पिकास पाणी देण्याच्या अवस्थेत संरक्षक पाणी म्हणून वापरता येते. रब्बी जिरायत गव्हास एक संरक्षक पाणी दिल्यास उत्पादनात ५० ते ६० टक्के वाढ होते.

    डॉ. व्ही. एस. बाविस्कर- ८३७४१७४७९७ (कृषी विद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी), पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT