Water Resources
Water Resources Agrowon
ॲग्रो विशेष

Water Resources : जुन्या जलस्रोतांचं करायचं काय?

Team Agrowon

अभिजित घोरपडे

तुळजापूरला तीन-साडेतीन वर्षांपूर्वी दिलेली भेट आजही आठवते. उस्मानाबादचं व्याख्यान उरकून तिथं पोहोचलो होतो. वेळ थोडाच होता. तिथल्या जुन्या बारवा पाहण्याची उत्सुकता होती. देवीचं दूरूनच दर्शन घेतलं.

दीपक चव्हाण नावाच्या मित्रासोबत बारवा आणि पाण्याच्या जुन्या व्यवस्था (Water Resources) पाहायला निघालो. एकेक बारव आगळीवेगळी होती. खिळवून ठेवणारी. काही तर प्रचंड आकाराच्या.

तळीही तशीच. पाण्याचे इतर स्रोतसुद्धा जरूर पाहावेत असे. आखीव रेखीव रचना, सुंदर बांधकाम, चुकूनच काही दगड जागचे हललेले... बारवांचा आकार आणि संख्या यावरून साधारण अंदाज घेतला.

पूर्वी हा पाणीसाठा (Water Stock) गाव, मोठ्या संख्येनं येणारे यात्रेकरू या साऱ्यांना पुरून उरेल इतका असावा. अगदी निश्चितपणे... हे सारं पाहताना आधीच्या पिढ्यांच्या जलनियोजनाचा (Water management), शहाणपणाचा अभिमान वाटला.

हे सारं आपल्याला वारशात लाभलंय, या वास्तवाने सुखावलोसुद्धा. तरीही एका गोष्ट अस्वस्थ करीत होती- हे सारं आता वापरात नाही, कचऱ्यानं भरून गेलंय. सर्वच बारवांच्या कचराकुंड्या झाल्या आहेत!

तुळजापूर असो, नाशिक जिल्ह्यातील अहिल्यादेवींचं चांदवड असो, त्र्यंबकेश्वर असो, सांगली जिल्ह्यातील आटपाडी असो, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ असो, विदर्भातील चंद्रपूर असो, किंवा अन्य कोणतंही ऐतिहासिक गाव... सर्वच ठिकाणी पाण्याच्या जुन्या जलस्रोतांची अवस्था दयनीय बनली आहे.

इतकी की आता हा आमचाच वारसा आहे हे सांगण्याची लाज वाटावी. महाराष्ट्रात असं एकही जुनं-मोठं गाव नसेल जिथं जुने जलस्रोत नाहीत. प्रत्येक गावाला कमी अधिक जुना असा जलस्रोतांचा वारसा लाभलेला आहे.

एखादी विहीर, आड, बारव, होळ, पुष्करणी, तळं, तलाव, टाकी, बांध, तट, बंधारा, धरण, पाट, सिंचनाची पद्धती... असं काही ना काही गावात निश्चितपणे असतं. दोन-चार मोजके अपवाद वगळले तर हा वारसा आता पूर्णपणे मोडीत काढण्यात आला आहे.

त्यात कचरा टाकून, सांडपाणी साठवण्याची जागा बनवून किंवा काही ठिकाणी तर शौचकूपासारखा वापर करून त्याची विटंबना केली जात आहे... लांबचं कशाला? तुमच्या स्वत:च्या गावात किंवा आसपासच्या गावातलं पाण्यासंबंधीचं असं जुनं बांधकाम आठवा.

त्याच्या अवस्थेवरून आपण किती पाण्यात आहोत, हे आपोआप लक्षात येईल. अशी 'शितावरून भाताची परीक्षा' केली की या पाण्याच्या वारशाकडं आपण नेमके कशा पद्धतीनं पाहत आहोत, याचाही कल्पना येईल.

या सर्वच जलस्रोतांची काही वैशिष्ट्य आहेत- बांधकामाचा दर्जा. ही बांधकामं काही शतकांनंतर आजही दिमाखात उभी आहेत. बहुतांश बांधकामांमध्ये सौंदर्यदृष्टी पाहायला मिळते.

अगदी दगडांच्या घडणीपासून ते त्यांच्या रचनेपर्यंत याचा विचार केलेला आढळतो. त्यामुळे ही सर्वच बांधकामं अधिक आकर्षक बनतात आणि पाहणाऱ्याला पटकन जोडूनही घेतात.

बहुतांश जलस्रोतांचे भौगोलिक स्थान हेसुद्धा नेमके असेच आहे. त्यावरून त्या काळातील जलशास्त्राच्या प्रगतीची आणि उपलब्ध तंत्रज्ञानाच्या चपखल वापराची चांगलीच कल्पना येते.

याबरोबरच आवर्जून मांडावी अशी एक बाब म्हणजे- हे सर्वच जलस्रोत / व्यवस्था यांच्या देखभाल-दुरुस्तीचा रीत, पद्धत लावून दिलेली होती. विशेष म्हणजे त्याचे बऱ्याच अंशी पालनही होत असे. यामुळेच या बहुतांश व्यवस्था दीर्घकाळ टिकणाऱ्या होत्या, त्या तशा टिकल्यासुद्धा!

पाण्याच्या या जुन्या स्रोतांनी कितीतरी पिढ्यांना पाणी उपलब्ध करून दिलं. त्या त्या काळातील प्रगतीला हातभार लावला.

अवर्षणाच्या अनेक वर्षांमध्येही तारलं. मग आता त्यांची दयनीय अवस्था होण्याचं कारण काय?... हा प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतो. काळपरत्वे होणारे बदल हे त्यामागचं एक कारण आहेच.

पण त्याच्याही पलीकडं अधिक महत्त्वाचं कारण आहे ते, उपलब्ध झालेलं तंत्रज्ञान आणि बदललेल्या गरजा. अलीकडच्या तीस-पस्तीस वर्षांमध्ये तंत्रज्ञानात झालेला बदल कमालीचा वेगवान आहे. त्यानुसार लोकांच्या पाण्याच्या गरजा आणि ते मिळण्याबाबतच्या अपेक्षाही बदलल्या.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावाचं उदाहरण इथं नेमकं बसेल. तिथं पूर्वी घरोघरी आड होते. तोच तिथल्या पाण्याचा भरवशाचा आणि मुबलक साठा होता. त्यामुळे घरात पाणी भरून ठेवण्याची आवश्यकताही भासत नसे.

कित्येक पिढ्यांनी त्यांचा उपयोग केला. अलीकडच्या काळात गावात पाण्याची उंचावरील टाकी आणि नळ आले. तेव्हापासून तिथले आड मागं मागं पडत गेले. आता तर बहुतांश आड बुजवण्यात आलेत, काहींचं रूपांतर मैला साठवण्याच्या टाक्यांमध्ये झालंय.

गंमत अशी की आडांची गरज संपली. परिणामी त्यांच्या पाण्याचं पुनर्भरण करणारा 'शुक्र' नावाचा ओढा नजरेआड झाला. त्याचं अस्तित्व जवळजवळ संपलं, ते आता कधीतरी पावसाळ्यातच जाणवतं.

भूजलाच्या पाण्याच्या वापरातील शिस्त आणि विचारही मागं पडला. त्यामुळे आता या व्यवस्थांचं महत्त्व लक्षात आलं तरी त्यापैकी अनेकांना पुन्हा पूर्वपदावर आणणं हे मोठं आव्हान बनलं आहे. आपण इतके "पुढं" निघून आलो आहोत.

आता कदाचित कोणी असाही प्रश्न करेल की, बदलत्या काळात हे जुने जलस्रोत किंवा व्यवस्थांची आवश्यकताच काय? खरंतर या जलस्रोतांना खूप मोठं वारसा मूल्य आहेच, पण त्याच्याही पलीकडं त्यांचा उपयोग आहेच. पुन्हा आटपाडीचंच उदहरण देऊन सांगावं लागेल- २०१२-१३ च्या दुष्काळात लोकांना पुन्हा जुन्या आडांचीच आठवण आली.

कारण हा स्रोत घरात होता, गावच्या गावात होता. त्यामुळे पाण्यासाठी इतरांच्या तोंडकडं पाहण्याची किंवा आशेवर राहण्याची आवश्यकता नव्हती. आता मात्र लांबचं पाणी आणि परावलंबी व्यवस्था यामुळे आपण इतरांच्या हाती नियंत्रण देऊन बसलो. त्यासोबत निश्चितच काही तोटे हे आलेच.

या नियंत्रणाबरोबरच आणखी एक बाब म्हणजे या स्रोतांमध्ये शाश्वतताही होती. अर्थात, पूर्वी संसाधनांचा वापरही कमी होता. त्यामुळे जलस्रोत शाश्वत बनण्याची शक्यता अधिक होती. तरीसुद्धा पू्र्वी ही संसाधने वाटून घेण्यासाठीची एक शिस्तही अस्तित्वात होती.

ती पाळली जात असे. आताच्या काळात ही शिस्त नियमांमध्ये आढळते, पण प्रत्यक्षात तिचा वापर होताना दिसत नाही. या गोष्टी निश्चितच जुन्या जलस्रोतांबाबत आकर्षण निर्माण करणाऱ्या आहेत.

कळीचा मुद्दा असा की हे स्रोत पुनरुज्जीवित करता येतील का? ते तसे पुनरुज्जीवित करावेत का? याचं कोणतंही एक उत्तर देता येणर नाही. आधी म्हटल्याप्रमाणं आता आपण बरेच "पुढं" गेलो आहोत.

हे जलस्रोत पुन्हा वापरात आणायचे असतील तर परिसरातील पाण्याची संपूर्ण व्यवस्था ठीक-ठाक करावी लागेल. उदाहरण द्याचचं तर, जुन्या विहिरी-आड वापरात आणायच्या असतील तर भूजलाची पातळी, भूजलाचं प्रदूषण अशा विकारांवर मात करावी लागेल.

जुनी तळी-तलावांसाठी त्यांचा संपूर्ण पाणलोट सुधारावा लागेल... हे जलस्रोत पुन्हा वापरात आले तर कोणालाही निश्चितच आवडेल, पण ते आपल्याला झेपणार का? याचाही विचार करावा लागेल. तशी गरज आणि क्षमता असलेल्यांनी हे जरूर करावे. पण ते शक्य नसले तरी हे जलस्रोत वारसा म्हणून आहे तसे टिकवायलाच हवेत...

तुमच्या गावातील जुने जलस्रोत कोणत्या गटात मोडतात, हे जाणून घ्यायची इच्छा आहे, जरूर कळवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT