Ganesh Patri Agrowon
ॲग्रो विशेष

Ganesh Patri : गणेशपत्रींचे औषधी महत्त्व काय आहे?

Team Agrowon

भाग २

देवदार :
शास्त्रीय नाव सीड्रस डेओडारा, कुळ ः पायनेसी

देवदारचे सदाहरित वृक्ष हिमालय पर्वतावरील वनक्षेत्रात आढळतात. देवदार वृक्ष जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमालय प्रदेश, नेपाळ, सिक्कीम, भूतान, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहेत. या वृक्षाची पाने सुईप्रमाणे लांबट, गोलाकार असतात. या वृक्षास ‘देवदारू’, ‘केलोन’, अशीही नावे आहेत. देवदारच्या लाकडापासून तेल काढतात, त्यास ‘केलोन तेल’ म्हणतात.
औषधी गुणधर्म ः याचे लाकूड, कोवळ्या फांद्या, पाने औषधी गुणधर्माची आहेत. पण प्रामुख्याने केलोन तेल औषधात वापरतात. देवदारमध्ये स्वेदजनन, मूत्रजनन व वायुनाशी हे औषधी गुणधर्म आहेत. केलोन तेल व्रणशोधक व व्रणरोपक आहे. जुनावलेले व्रण तेलामुळे भरून येतात. लाकूड पाण्यात उगाळून डोके दुखीत कपाळावर लेप करतात. ज्वर आणि जीर्ण संधिवातात तेलाचा चांगला उपयोग होतो.

जाई :
शास्त्रीय नाव ः जॅस्मिनम ऑरिक्युलेटम, कुळ ः ओलिएसी

जाई ही झुडूपवर्गीय वनस्पती असून, ती नैसर्गिकपणे वनक्षेत्राप्रमाणे बागेतही लावतात. जाईच्या पानांना ‘जातिपत्र’ म्हणतात.
औषधी गुणधर्म ः जाईची पाने व फुले औषधात वापरतात. जाई शीतल, व्रणशोधन आणि व्रणरोपन गुणधर्माची आहे. तोंडातील जखमा व व्रण यावर जाईची पाने चावावयास व चघळण्यासाठी देतात. यामुळे जखमा भरून येऊन, बऱ्या होतात. तोंडातील जखमा बऱ्या होण्यासाठी जाईची पाने, दारूहळद आणि त्रिफळा यांच्या काढ्याने गुळण्या करतात. कानदुखीत पानांचा अंगरस तिळाच्या तेलात उकडून ते तेल कानात घालतात. पायांच्या बोटांमध्ये पडलेल्या कात्र्यांवर याची पाने ठेचून बांधतात. जखमांवर पाने वाटून त्याचा लेप लावतात.

रुई :
जांभळट रंगाची फुले देणाऱ्या रुईचे शास्त्रीय नाव कॅलोट्रॉपिस प्रोसेरा, तर पांढऱ्या रंगाची फुले देणाऱ्या रुईचे शास्त्रीय नाव कॅलोट्रॉपिस जायजांशीया असे आहे. (कुळ ः अ‍ॅस्कलपिडिएसी.) रुईची झुडपे कोरड्या, पडीक जागेत सर्वत्र आढळतात.
औषधी गुणधर्म ः दोन्ही प्रजाती औषधी असून, गुणधर्म समान आहेत. रुईची पाने, साल, फुले व चीक औषधात वापरतात. रुई वनस्पतीस मंदार, अकंद, अर्क, क्षीरपर्णी अशीही इतर नावे आहेत. रुईची पाने हनुमानास वाहतात. पाने गरम करून पोटीस म्हणून वापरतात. पक्षाघात झालेल्या भागास, सूज आलेल्या व दुखणाऱ्या सांध्यावर तसेच जखमेवर पाने ठेचून बांधतात. जलोदर व पोट फुगणे यावर पाने उपयुक्त आहेत. खंडित तापात पानांचा अर्क देतात. वाळलेल्या पानांचे चूर्ण खोकला, दमा, व्रण यांवर वापरतात. मुळाची साल स्वेदकारी असून, दमा व उपदंशात उपयोगी आहे. साल वांतीकारक, स्वेदकारी व रेचक गुणधर्माची आहे. आमांश व पोट फुगल्यावर गुणकारी आहे. फुले वेदनाशामक व तुरट तसेच पाचक असून, सर्दी, खोकला व कफ यावर उपयुक्त आहे. फुले जंतुनाशक व कृमीनाशक असून, पटकी व मलेरियात वापरतात. चीक कुष्टरोग, खरूज, गजकर्ण, पुरळ, फोड, दमा, प्लिाहावृद्धी यामध्ये गुणकारी आहे. रुईच्या पानांना ‘अर्कपत्र’ म्हणतात.

कण्हेर :
शास्त्रीय नाव ः निरियम इंडिकम, कुळ ः
अ‍ॅपोसायनेएसी म्हणजेच सदाफुलीच्या कुळातील आहे. तिला कण्हेर, तांबडी कण्हेर, करवीर अशीही नावे आहेत. कण्हेरीची बागांमध्ये सर्वत्र लागवड करतात.
औषधी गुणधर्म ः कण्हेरीची पाने, मुळे व फुले औषधात वापरतात. या वनस्पतीचे सर्व भाग, प्रामुख्याने मूळ विषारी असून, बाह्य उपाय म्हणून वापरतात. सुजेत पानांच्या काढ्याने शेक देतात. कोवळ्या पानांचा रस अभिष्यंदासाठी डोळ्यात घालतात. फुले कटिशूल, दाह, डोकेदुखी, खरूज यांसाठी उपयोगी आहेत. मुळांची पाण्यात बनविलेली पिष्टी बाह्य उपाय म्हणून कर्करोग, कुष्ठरोग आणि व्रणात लावतात. मुळांच्या सालीचे तेल इसब व त्वचारोगात उपयोगी आहे. नाळगुंदात मूळ उगाळून अंगावर लावतात.

डोर्ली :
शास्त्रीय नाव ः सोलॅनम अ‍ॅनजुव्ही, कुळ ः
सोल्यॉनेएसी म्हणजेच वांग्याच्या कुळातील आहे.
या बहूवर्षायू रोपवर्गीय वनस्पतीस रानवांगी, रानरिंगणी, चिचुर्डी, बृहती अशी अनेक नावे आहेत. हे वांग्याच्या झुडपाप्रमाणेच दिसणारे झुडूप उजाड रानात, जंगलात, पडीक जमिनीवर सर्वत्र आढळते. फांद्या व पानावर वाकडे काटे असतात.
औषधी गुणधर्म ः डोर्लीची पाने, मूळ, फळे आणि बिया औषधांत वापरतात. ही वनस्पती कडू, तिखट, उष्ण, दीपक व पाचकग्राही गुणधर्माची आहेत. डोर्लीच्या पानांना ‘बृहतीपत्रे’ म्हणतात. पोटातील मुरडा व अतिसारात पानांचा रस मधातून देतात. ओकारी थांबविण्यासाठी पानांचा रस आल्याच्या रसात मिसळून देतात. पानांचा त्वचारोगातही उपयोग होतो. डोर्लीचे मूळ दशमूळपैकी एक आहे. दमा, खोकल्यावर मुळांचा काढा, लेंडी पिंपळीबरोबर देतात. लघवी अडली असेल तर मुळांचा काढा उपयोगी आहे. फळांचा रस दमा व खोकल्यावर मधातून देतात. वाळलेल्या फळांचा धूर दंतरोगावर घेतात. बियांचे अंजन डोळ्यात घातल्याने डोळे आरक्त होतात.

धोतरा :
शास्त्रीय नाव ः धतुरा मेटँल, कुळ ः सोलॉनेएसी

धोतरा वनस्पतीच्या अनेक प्रजाती आपल्याकडे आढळतात. यापैकी पांढरा धोतरा, काळा धोतरा, व राज धोतरा या तीन प्रजाती औषधी गुणधर्माच्या आहेत. पांढरा धोतरा, व राज धोतरा, यांमध्ये फुले पांढरी तर काळा धोतऱ्यामध्ये फुले जांभळट रंगाची असतात. हे वर्षायू झुडूप आहे.
औषधी गुणधर्म ः या तिन्ही प्रजातींचे औषधी गुणधर्म समान आहेत. धोतऱ्याची पाने, मुळे व बिया औषधी आहेत. ही वनस्पती मादक व विषारी आहे. डोळे दुखणे, केसतूट व नाकाचे त्रास यावर पाने उपयुक्त आहेत. संधिवात, केसतूट व गालगुंड यावर पानांचे पोटीस बांधतात. पानाचा रस दह्याबरोबर परम्यात पोटातून देतात. वाळलेल्या पानांचा धूर दम्यात गुणकारी आहे. दाह कमी करण्यासाठी मूळ उपयुक्त आहे. पांढरे डाग, त्वचा रोग, व्रण, श्‍वसननलिका दाह, काविळ, मूळव्याध यांमध्ये बिया गुणकारी आहेत. बियांचा धूर दम्याच्या उपचारासाठी घेतात. दाढदुखीसाठी बियांचे चुर्ण वापरल्यास दाढदुखीत आराम मिळतो. याच्या पानांना ‘धत्तूरपत्र’ म्हणतात.

आघाडा :
शास्त्रीय नाव ः अ‍ॅचरॅनथस अ‍ॅस्पेरा, कुळ ः अ‍ॅमरॉनथेअसी

आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती पावसाळ्यात वनक्षेत्रात, ओसाड, पडीक जमिनीवर, शेतात, रस्त्याच्या कडेने सर्वत्र आढळते. या वनस्पतीस आगाडा, अपामार्ग अशीही नावे आहेत.
औषधी गुणधर्म ः आघाडाचे पंचांग औषधात वापरतात. आघाडा कडू, तिखट, उष्ण, रेचक, दीपक, वायुनाशी, आम्लतानाशक, रक्तवर्धक, मूत्रजनक, मूत्र आम्लतानाशक, स्वेदजनन, कफघ्न, पित्तसारक गुणधर्माचा आहे. ही वनस्पती भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मूतखडा, पोटदुखी, जलोदर, अपचन, आमांश, रक्तरोग, श्‍वासनलिका दाह इ. रोग व विकारांत उपयुक्त आहे. आघाड्याचा काढा पाचक रस वाढवतो आणि आम्लता कमी करतो. यामुळे यकृताच्या क्रिया सुधारतात. आमवात, संधिशोथ, गंडमाळा या रोगांत आघाडा गुणकारी आहे. आघाडा मूत्रजनन आहे. आघाड्यामुळे लघवीची आम्लता कमी होते आणि मूत्रनलिकेचा दाह कमी होतो. अंगातील मेद कमी करण्यासाठी बिया उपयुक्त आहेत. आघाड्याच्या पानांची भाजी करतात.

तुळस :
शास्त्रीय नाव ः ऑसिमम् सेन्कटम, कुळ ः लॅमिएसी

तुळस ही बहूवर्षायू रोपवर्गीय वनस्पती बागेत, मंदिर व घरांच्या परिसरात लागली जाते. याच्या कृष्ण तुळस व श्‍वेत तुळस अशा दोन जाती आहेत. कृष्ण तुळशीचे पंचांग औषधात वापरतात. तुळस पवित्र मानतात.
औषधी गुणधर्म ः तुळशीचा अंगरस तीक्ष्ण, उष्ण, कडू व रुक्ष आहे. तुळशीत ज्वरघ्न, शीतहर, वातहर, कफघ्न, उत्तेजक, आणि वायुनाशी असे गुणधर्म आहेत. ही वनस्पती कृमीनाशक, संसर्गरक्षक, ज्वरशामक, रक्तरोग, कफ, वात, दमा, श्‍वासनलिका दाह इ. विकारांत उपयुक्त आहे. बिया मधुर, स्निग्ध, शीतल व मूत्रजनन गुणधर्माच्या आहेत. पानांचा काढा हिवतापात देतात. पाने दीर्घकालीन खोकल्यात, प्रामुख्याने लहान मुलांना मधाबरोबर कफोत्सर्जक म्हणून देतात. पानांचा रस गजकर्ण आणि इतर त्वचारोगात त्वचेवर लावतात. कानदुखीत पानांचा रस कानात घालतात. पानांचा काढा मुलांच्या पोटाच्या तक्रारीत व यकृत दोषात देतात. अंगदुखीत व सांधेसुजीत तुळशीचा रस ओवा व निर्गुडीबरोबर देतात. जननेंद्रिये व मूत्रोत्सर्जनाच्या तक्रारीत बियांचा वापर करतात.

मरवा :
शास्त्रीय नाव ः ओरिजेनम मार्गोराना,
कुळ ः लॅमिएसी म्हणजेच तुळशीच्या कुळातील आहे.
मरवा या वर्षायू रोपवर्गीय वनस्पतीची सुगंधी म्हणून बागेत व शेतात लागवड करतात. यास मर्वा, मरूवक अशीही नावे आहेत.
औषधी गुणधर्म ः मरवाचे पंचांग व त्याची राख औषधात वापरतात. या वनस्पतीत कोष्ठवातप्रशमन, स्वेदजनन, उत्तेजक, श्‍वासहर, आर्तवजनन हे गुणधर्म आहेत. पोटदुखीत मरवा तिळवणीच्या पानाबरोबर देतात. जुलाब आणि सर्दीत पानांचा फाण्ट देतात. मरव्याचा रस किंवा त्याची राख जुनाट व्रणांवर उत्तम औषध आहे. मरवा पानास ‘मरूपत्र’ म्हणतात.

माका :
शास्त्रीय नाव ः इक्लीप्टा इरेक्टा,
कुळ ः अ‍ॅस्टरेएसी म्हणजेच सूर्यफुलाच्या कुळातील आहे.
माका ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती ओलसर ठिकाणी सर्वत्र आढळते. माकाचे या वनस्पतीला ‘भांगरा’, ‘भृंगराज’, ‘केशराज’, ‘केशरंजन’, अशी विविध नावे आहेत.
औषधी गुणधर्म ः माकाचे पंचांग औषधात वापरतात. माकामध्ये कडू, उष्ण, वायुनाशी, पाचन, आनुलोमिक, मूत्रजनन, बल्य, वातहर, व्रणशोधन, व्रणरोपन, कृमीनाशक, विषशामक हे गुणधर्म आहेत. ही वनस्पती त्वचारोग, केस, डोळे, दात यांवर उपयुक्त आहे. तसेच व्रणशोथ, कफ, वात, श्‍वासनलिका दाह, दमा, कोड, पांडूरोग, रातांधळेपणा यात गुणकारी आहे. ही गर्भपात विरोधक असून, प्रसूतीनंतर गर्भाशयाच्या दुखण्यात उपयोगी आहे. केसाचा रंग सुधारण्यासाठी व डोळ्यांची चमक, वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. माका रेचक व शक्तिवर्धक म्हणून वापरतात. ही वनस्पती यकृत व प्लिहावृद्धीमध्ये तसेच दीर्घकालीन त्वचारोगात वापरली जाते. पानांचा रस कावीळ आणि तापात देतात. तसेच केस काळे करण्यासाठी वापरतात. माकाच्या पानांना ‘भृंगराज पत्री’ म्हणतात.

विष्णुक्रांता :
शास्त्रीय नाव ः इवोलव्हूलस अ‍ॅल्सिनोइडिस,
कुळ ः कॉन्वोलव्हूलेएसी म्हणजेच गारवेलीच्या कुळातील आहे.
विष्णुक्रांता ही बहूवर्षायू, जमिनीवर पसरत वाढणारी रोपवर्गीय वनस्पती आहे. ही वनस्पती हलक्या प्रतीच्या जमिनीत गवताळ जागेत सर्वत्र आढळून येते. या वनस्पतीचे या वनस्पतीला शंखावली, शंखपुष्पी, शामाक्रांता, निलपुष्पी अशी इतर नावे आहेत.
औषधी गुणधर्म ः या वनस्पतीचे पंचांग औषधात वापरतात. कडू, तिखट, संसर्गरक्षक, आरोग्यपुन:स्थापक, पौष्टिक, हे विष्णुक्रांता वनौषधीचे गुणधर्म आहेत. ही वनस्पती मेंदू व स्मरणशक्तीसाठी उत्तम आहे. श्‍वासनलिकादाह, पित्तप्रकोप, अपस्मार कोड, लहान मुलांना दात येताना ही वनस्पती उपयुक्त आहे. बुद्धी तल्लख करण्यासाठी, त्वचेचा रंग सुधारण्यासाठी विष्णुक्रांताचा वापर करतात. ही भूकवर्धक आहे. मानसिक रोग, उन्माद, निद्रानाश यावर ही वनस्पती वापरतात. मुलांच्या विषमज्वरात मूळ वापरतात. आतड्यांच्या रोगात, आवेंत, पंचांगांचा फांट देतात. रक्तस्राव बंद होण्यास अंगरस देतात.

दूर्वा :
शास्त्रीय नाव ः सायनोडॉन डेक्टिलॉन,
कुळ ः पोएसी म्हणजेच गवताच्या कुळातील आहे. दूर्वा या बहूवर्षायू, रोपवर्गीय वनस्पती असून, यास हरळी, हऱ्हाळी, भार्गवी, बहुवीर्या अशी इतर नावे आहेत. दूर्वा सर्व ठिकाणी वाढते.
औषधी गुणधर्म ः दूर्वाचे पंचांग औषधात वापरतात. तुरट, कडवट, शीतल हे तिचे गुणधर्म आहेत. पित्तप्रकोप, तृषारोग, वांती, जळजळ, इसब, त्वचारोग, आमांश, ताप या विकारांवर दूर्वा गुणकारी आहे. नाकातील रक्तस्राव, गर्भस्राव थांबविण्यासाठी अंतर्बाह्य काढा देतात. मूळांचा काढा मूत्रवर्धक असून, मूतखड्यावर उत्तम औषध आहे. मूळ वाटून दह्याबरोबर दीर्घकालीन सुजेवर देतात. पानांचा फांट मूळव्याधीतील रक्तस्राव थांबवितो. पानांचा रस रक्तस्तंभक आहे. जखमेवर व कापल्यास पानांचा रस लावतात. पानांचा रस मूत्रवर्धक असून, जलसंचय व सर्वांगशोफमध्ये उपयोगी आहे.

डॉ. मधुकर बाचूळकर, ०९७३०३९९६६८
(निवृत्त प्राचार्य व वनस्पती व पर्यावरण तज्ज्ञ, कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT