Pollution
Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

नाही निर्मळ जीवन, काय करील साबण...

- डॉ. सतीलाल पाटील,

पप्पु आज लै खुशीत होता. गुणगुणतच ऑफिसला आला. ‘‘काय रे पप्पू, लै खुशीत दिसतोस? वाहिनी गावाला गेल्या की काय?’’ त्याला मिश्किल विचारणा केली. ‘‘नाही हो, आज ऑफिसला येताना कावळ्याची विष्ठा अंगावर पडली. ते शुभ असतं ना. आज सकाळी सकाळी शुभशकुन मिळालं,’’ तो म्हणाला. एका कावळ्याने पप्पूचा दिवस शुभ केला होता. दुसऱ्या दिवशीदेखील तसंच घडलं. तेव्हा त्याला म्हटलं, ‘‘पप्पू, नक्की कोणता कावळा तुझ्या कुंडलीत शुभस्थानी आहे ते बघ जरा?’’ तिसऱ्या दिवशी पप्पू आला तो तावातावाने, शिवीगाळ करतच. काय झालं? विचारल्यावर म्हणाला. ‘‘काय सांगू राव, तो कावळा नव्हताच. वरच्या गॅलरीत टूथपेस्टने दात घासणारा शेंबडा पोरगा थुंकत होता.’’ त्या दिवशी पप्पूचा कसा पप्पू झाला हाच विषय ऑफिसमध्ये चघळला गेला. पण अशा पद्धतीने पप्पूच्या नशिबाला कावळा शिवला होता.

पप्पूच्या शुभ शकुनाचा फेस विरला होता, पण माझ्या विचाराचा साबण मात्र उगाळला जात होता. साबण म्हणजे काय? जरा सोप्या भाषेत सांगायचं म्हटल्यावर, साबण म्हणजे दोन विरुद्ध विचारांच्या पक्षांची युती. पहिला पक्ष म्हणजे पाण्यात विरघळणारा कॅल्शिअम किंवा सोडिअमचा क्षार आणि दुसरा म्हणजे तेल. तेलाला सोडिअम किंवा कॅल्शिअमच्या क्षाराबरोबर अभिक्रिया करून जोडले जाते. जेव्हा साबण डागाच्या संपर्कात येतो, तेव्हा साबणाचा तेलकट भाग त्याला चिकटतो. कारण डाग तेलकट असतो आणि म्हणूनच तो नुसत्या पाण्याने धुतला जात नाही. दुसऱ्या टोकाचा सोडिअम किंवा कॅल्शिअमचा भाग मात्र पाण्यात विरघळणारा असल्याने, पाण्याकडे ओढला जातो. या रस्सीखेचेत डाग उखडला जाऊन पाण्यात येतो. आणि तेलकट डागाची धुलाई होते.

माणसाचं आयुष्य निर्मळ करणारा साबण कधीपासून वापरला जातोय? या प्रश्‍नाचा माग घेताना शतकानुशतके मागे घसरलो आणि साबणाच्या इतिहासाचा फेस काढायचा प्रयत्न सुरू झाला. हजारो वर्षांपूर्वी भांडी, कपडे आणि स्वतःला स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर व्हायचा. आजपासून ४८०० वर्षांपूर्वी, बॅबिलोनियन संस्कृतीत, साबण वापरला जात असल्याचे पुरावे उत्खनन झाल्यावर समोर आले आहेत. त्या काळी चरबी आणि राख एकत्र करून साबण बनवला जायचा. चरबीत तेल आणि राखेत क्षार असतात. त्यानंतर साडेतीन हजार वर्षांपूर्वी इजिप्तमधील लोकदेखील साबणाने अंघोळ करायचे, असे दाखले मिळतात. ही झाली प्राचीन उदाहरणे. पण ख्रिस्त गेल्यावर कालगणनेला सुरुवात झाल्यानंतर फ्रान्स, स्पेन आणि इटलीमधील लोकांच्या अंगाला पहिल्यांदा साबण लागला तो सातव्या शतकात. पुढे रोमन साम्राज्याची वाट लागल्यानंतर मध्ययुगात युरोपातील लोकांच्या न्हाणीघरातला साबणाचा फेस विरला. सुबत्ता गेली आणि साबणाचा वापर कमी झाला. पण साबणा अभावीच्या अस्वच्छतेमुळे १४ व्या शतकात संसर्गजन्य रोगांना लोक बळी पडले, असं म्हणतात.

आतापर्यंत घरगुती पातळीवर साबण तयार केला आणि वापरला जात होता. पण प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडणाऱ्या ब्रिटिशांनी साबणाला धंद्याला लावले आणि १२ व्या शतकात औद्योगिक पातळीवर साबण बनवायला सुरुवात केली. सतराव्या शतकात श्रीमंत लोकांमध्ये साबण वापरण्याची फॅशन आली. जो तो ‘तुम्हारी त्वचा, मेरी त्वचा से मुलायम कैसे?’ म्हणत साबणाचा ब्रँड विचारू लागला. १९७१ मध्ये निकोलस लेब्लॅंक या फ्रेंच शास्त्रज्ञाने साबण बनवायचं पेटंट घेतलं आणि या व्यवसायाला वेगळं वळण मिळालं. हा व्यवसाय इतका वाढला, की १८५० मध्ये तो अमेरिकी अर्थव्यवस्थेतला सर्वांत वेगाने वाढणारा उद्योग बनला.

इथपर्यंत सर्व काही ठीक होत. तेल, चरबी, राख, क्षार, खनिज असे नैसर्गिक पदार्थ वापरून साबण बनवले जायचे. पण पहिल्या महायुद्धात तेल आणि चरबीची कमतरता भासू लागली. म्हणून रसायनशास्त्रज्ञांनी वेगवेगळे पेट्रोलियम रसायने वापरून रासायनिक साबण तयार केला. याला डिटर्जंट म्हणतात. सध्या वापरले जाणारे बहुतांश साबण हे डिटर्जंट आहेत. वनस्पती तेल आणि चरबीची जागा पेट्रोलियम पदार्थांनी घेतली आणि नैसर्गिक साबण अनैसर्गिक झाला. या आधुनिक साबणाला ‘सरफॅक्टन्ट’ असं म्हणतात. जिथं तेल आणि पाण्याला एकत्र नांदवायचं असतं, तिथं या सरफॅक्टन्टचा मध्यस्थी म्हणून वापर होतो.

पूर्वी फक्त अंग धुण्यासाठी वापरला जाणारा साबण, आता जीवनाच्या प्रत्येक अंगापर्यंत पोहोचलाय. टूथपेस्टपासून ते रंग, मेकअप, कॉफी, चहा, शीतपेये, औषधे, अन्नपदार्थ, पॅकिंग, कीटकनाशके, खते, कापड उद्योग, कागद, तेल, रसायन, वाहन उद्योग, बांधकाम, मशिन उद्योग यांसारख्या हजारो क्षेत्रांत त्यांचा सर्रास वापर होतोय. सुरुवातीला केलेला साबणाचा मर्यादित वापर ठीक होता. पण कंपन्यांनी दिसेल तिथे साबणी पदार्थ घुसडायला सुरुवात केली. हात धुण्यासाठी, अंग धुण्यासाठी, केसांसाठी, कपड्यांसाठी, भांडी धुण्यासाठी. भांड्यात देखील, तांब्या पितळेच्या भांड्यासाठी ‘बायको गेली माहेरी म्हणत’ दिलेला स्पेशल साबण असे एक ना अनेक प्रकार. घरातील पाळलेल्या कुत्र्या-मांजरासाठी अजून वेगळा. बरं, हाताने कपडे धुवायचे असतील तर वेगळा साबण, वॉशिंग मशिनसाठी वेगळा, असे साबणाचे कित्येक प्रकार.

दूरदर्शनच्या जमान्यापासून ‘लाऽऽ लालाऽऽ लालाऽऽ लाऽऽ’ गात हिरव्या सुगंधी साबणाच्या जाहिरातींपासून, ते सध्याच्या ओटीटीवरील सेन्सॉरची कात्री नसल्यामुळे मोकाट सुटलेल्या मादक जाहिरातींपर्यंत, साबण लावून त्वचा मुलायम करणाऱ्या बायका टीव्हीवर झळकू लागल्या. या जाहिरातींमध्ये तसा पुरुष मंडळींवर अन्याय होतो म्हणा. बघा ना, बायकांचे साबण रंगीत, सुगंधी, मुलायम त्वचा बनवणारे आणि पुरुषांचे मात्र लाल, डेटॉलच्या वासाचे, कीटाणू मारणारे. याला काय अर्थ आहे राव? असो.

या निर्मळ सरफॅक्टन्टच्या अतिवापरामुळे मात्र हवा, पाणी, जमीन यांसारखे नैसर्गिक स्रोत प्रदूषित होत आहेत. विचार करा सकाळी दात घासण्याने साबण वापराची सुरुवात होते, ते अंघोळ, कपडे धुणे, संडासाच्या भांड्याचा निळा साबण, फरशी पुसायचा, भांडे धुवायचा साबण अशा एक ना अनेक कारणांनी साबणाचं पाणी आपण निसर्गात फेकतो. आपल्या बाथरूममधून किंवा घरातून बाहेर फेकलेल्या साबणाच्या पाण्याचं पुढे काय होतं याचा कधी विचार केलाय का? हे पाणी नदीनाल्यात सोडलं जातं. गावागावांतील घाण जमा करत, लोकांची फेसाळलेलं पाप धूत, ही मैली गंगा समुद्र प्रदूषित करायला निघते. काही पाणी जमिनीत मुरतं आणि तिथंदेखील हे प्रदूषण पोहोचतं.

या फेसांपैकी फक्त टूथपेस्टच्या फेसाची आकडेवारी आपण समजून घेऊया. भारताची लोकसंख्या आजमितीला १३८ कोटी आहे. आकडेवारीनुसार ५१ टक्के भारतीय टूथपेस्ट वापरतात. म्हणजे ७०.३८ कोटी जनता दिवसातून एकदातरी तोंडातून फेस काढते. म्हणजे एका माणसाने कमीत कमी १०० मिलि जरी फेस दिवसातून एकदा काढला, तरी दररोज सात कोटी लिटर फेस वातावरणात फेकला जातोय. म्हणजे महिन्याला २१० कोटी आणि वर्षाला २५३० कोटी लिटर फेस आपल्या बाथरूममधून बाहेर पडतोय. हे फेसाळतं न्हाणीघरं वर्षभर अविरत फेस ओकतंय. अंदाज येण्यासाठी उदाहरण द्यायचं, तर भारतीय लोक दात घासून करत असलेल्या फेसामुळे दर दोन वर्षांनी खडकवासला धरण भरेल. बरं या टूथपेस्टमध्ये काय असतं, हे त्याची पॅकेटवर लिहिलेली संरचना कधी भिंग लावून किंवा मोबाईलमध्ये फोटो काढून आणि झूम करून पाहण्याचा प्रयत्न केलाय का? तसं केल्यास, हा नुसता फेस नसून रसायनांचा कॉकटेल फेस असल्याचं लक्षात येईल. भारतात २०२० मध्ये १४१ टन टूथ पेस्टचं उत्पादन झालं. हे मार्केट जवळपास १५ हजार कोटी रुपयाचं आहे.

आपल्याला या कंपन्या कशा उल्लू बनवतात, ते बघा. जेव्हा भारतीयांनी पारंपरिक दंतमंजन सोडून त्यांच्या टूथपेस्ट वापराव्यात, असं कंपन्यांना वाटत होतं, तेव्हा दंतमंजन वापरणारे घाटी, मागासलेले, डाउनमार्केट असं मार्केटिंग केलं गेलं. कोळसा वापरणं म्हणजे मागासलेपणाचं लक्षण. मिठाने म्हणे दात खराब होतात. तेव्हा ते उपहासाने जाहिरातीत म्हणायचे ‘क्या आप के टूथपेस्ट मे नमक है?’ आता याच कंपन्या ‘क्या? आपके टूथपेस्ट मे नमक नही है?’ अशी जाहिरात करत मीठ टाकलेले टूथपेस्ट विकत आहेत.

फेसाच्या प्रदूषणाची व्याप्ती लक्षात घ्यायची झाल्यास यमुनेच्या पाण्यात झालेला फेस आणि त्या फेसातच सूर्याला अर्ध्य देणाऱ्या भक्तांचा हा फोटो पुरेसा आहे. या फोटोवरून आपल्या फेसाळलेल्या भविष्याची कल्पना येईल. साबणाचा अतिरेक झाल्यामुळे जलस्रोतांची फेसाळलेली माती झाली आहे. ‘नाही निर्मळ जीवन, काय करील साबण?’ असा प्रश्‍न तुकोबारायांनी विचारला होता. ते आज असते तर चक्रावून गेले असते. ‘बा विठ्ठला! या साबणाने पर्यावरणात निर्माण केलेला मळ धुवायला कोणता साबण वापरू? मानवाच्या कुविचाराचे डाग धुवायला कोणता शाम्पू घासू?’ असा प्रश्‍न त्यांनी विचारला असता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT