जयंत खाडे
Rural Story :
‘‘अय, येरवाळी येरवाळी?’’
‘‘रानात निघालोय, तात्या, चहापाणी झालं का?’’
‘‘हितं कुठं वस्तीवं च्या आणि पानी? आता भाकरी खायाची आल्यावर.’’
‘‘मग सकाळी सकाळी?’’
‘‘यरवाळी कोन यतंय च्या घिऊन, आनी आपल्याला पांगळ्या पायाने काय कुठं जमतंय?’’
‘‘मग तल्लफ होत नाही का?’’
‘‘कुनाला सांगायचं? सरळ हुतो तवा सकाळ पारी घरात च्या घिऊन पुन्हांदा हाटीलात जाऊन एक कप मारल्याशिवाय तलफ जात नवती... हा हा हा.’’
‘‘तात्या, म्हणजे तुमच्या पायाला काय झाले आहे? डॉक्टरला दाखवले का?’’
‘‘लई वेळा दावलं, पण फरक पडत नाय, नावांनाव जास्तीच जीव निघालाय, पण कमी व्हायचं नाव नाय. आता बसूनच जायाचं वर. हा हा हा.’’
‘‘हे कशामुळे झालं? अचानक का काही ॲक्सिडेंट?’’
‘‘त्याचं असं झालं, मला साऱ्या गावात भरलेली पोती गाडीत चढवायला बोलवायची. मी पण लय जोमानं पोती फेकायचो, एकदा जोरात चमाकलं. जी मी बसलो तसा उठलोच नाय. काय ती चकती सरकली आणि शिरा दबल्या. हा हा हा.’’
‘‘तात्या, आता तंत्रज्ञान खूप सुधारले आहे. अपंग पुनर्वसन तसेच मदतीसाठी संस्था काम करतात. तुम्हाला संस्थेत दोन-तीन महिने ठेवून घेतात. उपचार करतात, कृत्रिम अवयव जोडतात. तुम्ही बघा एकदा.,’’
‘‘तिथं जाऊन राह्याचं? तीन महिने? जमनार नाय आपल्याला.’’
‘‘तात्या, तज्ज्ञ डॉक्टर असतात तिथे आणि तुमच्यासारखे खूप लोक येतात उपचाराला. सर्व उपचार, राहणं, खाणं, मोफत!’’
‘‘मंजी ततं सारी पांगळीच असत्यात व्हय? हा हा हा.’’
‘‘पांगळी, पांगळी काय म्हणताय, तात्या? त्यांना दिव्यांग, अपंग म्हणतात.’’
‘‘हे काय आवघाड. मला सादं नातवाचं नाव घ्याला येत नाय.’’
‘‘अपंग म्हणायला काय अवघड आहे होय?’’
‘‘आरं, हितं कुठं गेला तर मानसं म्हनत्यात, पांगळा तात्या आला, पांगळ्या तात्याला उचला, पांगळ्या तात्याला बसवा, पांगळ्या तात्याच्या घराजवळ... सारीच पांगळं, पांगळं करत्यात. हा हा हा.’’
‘‘हे तुमचे गाव जरा आगावच आहे.’’
‘‘तसंच आमी पण हाय. मंजी साळंत अस्ताना कुनाला पांगळ्या म्हन, कुनाला आंधळ्या म्हन, हेच केलं. आय म्हनायची की, अरं वाद्या, इकुलता एक हैस, असं वंगाळ म्हनू नगोस, देव तुझं बी असंच करल. आणि तसंच झालं. हा हा हा.’’
‘‘शाळेत गेलाय तुम्ही?’’
‘‘तर काय वाईच मार खाल्लाय व्हय.’’
‘‘कोणाचा, गुरुजींचा?’’
‘‘व्हय, त्या खालती कडच्या, दुस्काळी भागातला बामन गुर्जी व्हता. साळंत आला की पइल्यांदा मला बदादा हानायचा, मग साळा सुरू! हा हा हा.’’
‘‘का मारायचे?’’
‘‘काय सुदिक लिवायला, वाचायला याचं नाय. त्यात रोज एक पोरगं माझं नाव घ्याचं. मग काय, खावा मार, रतिब घातल्यागत. हा हा हा.’’
‘‘घरात कळायचं नाही, तुम्हाला मारतात म्हणून.’’
‘‘त्या गुर्जीला सारा गाव देव म्हनायचा. पोराला झोडून काढा म्हणून सारी सांगांची. मग माझी काय गत?’’
‘‘मार खाऊन तुम्ही सुधारला?’’
‘‘अजाबात नाय, मीच काय साळंतला एक पन सुदारला नाय. हा हा हा.’’
‘‘मग मार खाणं थांबलं? का शाळा बंद झाली?’’
‘‘लय बाजार झाला. एकदा असंच काय झालं अन् गुर्जीनं वल्या गारवलीच्या फोकानं चार-पाच जनांस्नी फोडलं. घरला गेलोच नाय. देवळात दोन दिस इवळत पडलो. तवा मार खानाऱ्या साऱ्यांनीच ठरवलं, साळंची कौलं पाक फोडायची आणि भुंडी करायची साळा, ती पन सायेब येन्याच्या आदल्या दिवशी. मग रातीचचं चढलो मागल्या लिंबावर आणि झाडून फोडली सारी कौलं, पाक बुक्का पाडला.’’
‘‘मग काय झालं साहेब आल्यावर?’’
‘‘सकाळपारी गुर्जी लवकर आला आणि त्यानं बगितलं तसं यरबाडलाच आनी म्हागारी गेला ती बाडबिस्तारा गुंडळूनच चावडीवर आला.’’
‘‘का?’’
‘‘जातो म्हनायला लागला, गाव सोडून. पंच, गावकरी गोळा झालं, सारी बिंत्या करायला लागली. तवर सायेब पण आला. त्वोव म्हणाला की आगाव लोक हैत, बंद करा साळा.’’
‘‘मग?’’
‘‘मग काय, समदं गाव हातापाया पडलं, माफी मागितली. आमाला सारी हुडकायला लागलं. दहा-पंधरा दिवस गायब व्हतो. गावानं कौलं भरून दिली आणि साळा सुरू झाली. आणि आम्ही कायमचंच कटाप झालो. हा हा हा.’’
‘‘पण तुम्ही पंधरा दिवस कुठे गायब होता?’’
‘‘हीतच डोंगरातन फिरत व्हतो.’’
‘‘पुढे काय झालं?’’
‘‘मग काय, सारं गाव नावं ठेवायला लागलं. आय म्हनायची, की बाबा, लेकरा माज्या, देवाचं नाव तुला दिलंय, देवपन नाय तरी राकुस तरी होऊ नगोस. तुजं कसं व्हायचं पुढं? पाया पडतो तुज्या, सवनं वाग निदान माजं डोळं मिटं पातूर.’’
‘‘शाळा सुटल्यावर मग काम?’’
‘‘रानात जायाचं, म्हसरा मागं फिरायचं, पुढं आलंच रानातल्या म्हेंती, पेरणी, काढणी, मळणी. दुसरं काय!’’
‘‘मग सुधारला का?’’
‘‘कशाचं आलंय! कावळा धुतला म्हनून बगळा हुतूय व्हय? एक वर्षी गल्लीतल्या मानसांबरं वारीला पाठवला, दोन दिवसांत कट्टाळलो आणि पळालो मधूनच. हा हा हा.’’
‘‘का?’’
‘‘मला सारखं खायाची सवं, दिंडीत काय? सकाळी खाल्लं की पुना रातीलाच! मग आपल्याला काय निभंना. आलो पळून कुनाला बी न सांगता. राती पोहोचलो. बेतानं घरात जाऊन शिक्यात बघितलं तर भाकरी, झुणका, पातेल्यात कोरड्यास सारं व्हतं. खायाला लागलो तर आय जागीच. ती मला म्हनाली, की बाबा, खा प्वाटभर, तू येनार म्हागारी म्हनून गेल्यापसनं जेवाण करून ठेवतूय. हा हा हा.’’
‘‘तात्या, मग पुढे गावात कसे दिवस घालवले?’’
‘‘घालवलं? कसं गेलं ही मलाच कळलं नाय.’’
‘‘काय उद्योग चालायचे?’’
‘‘हा, एक का काय? रानातल्या कामाबर शिकारी करायच्या, डोंगरात फिरायचं, ससा, पकुर्डा, सायाळ मारायचं, तिथंच मैतर बोलवायचं आनी जेवणं करायची.’’
‘‘दररोज शिकार मिळायची?’’
‘‘ती कुठलं, घावली तर घावली. लई तल्लफ झाली तर हिरीतलं पारवं काढायचं आनी बेजमी करायची.’’
‘‘म्हणजे सुट्टीच द्यायची नाय म्हणा.’’
‘‘हा हा हा...आमची टोळीच हुती. कुनी डोंगरात परडी सोडली, म्हसूबाला निवद सोडला तरी आमची धाड पडायची.’’
‘‘मग गावातले लोक काय म्हणायचे?’’
‘‘आता काय म्हणतील? गल्लीतला संपानाना तर म्हणायचा आरं आखीतीला निवद दावन्यापरास तात्याला घाला जेवायला. हाहाहा.’’
‘‘तात्या, गावातली लोकं कशी बघायची तुमच्याकडे?’’
‘‘त्याचं काय हाय, मला समदा गाव कामाला बोलवायचा. मी कवा नाय म्हनायचो नाय. कुनाची मशागत हाय, पेरणी मळणी हाय, मानसं मला हक्कानं न्यायची. एकदा तर लई च्वार झालं. शिवारातलं काय जाग्यावर ऱ्हाईना मग गावानं मला राखण्या म्हनुन नेमलं.
तवा तर वरपासनं खालीपातूर आनी डोंगरापसनं सडकंपातूर मी एकला राखणी करत हुतो.’’
‘‘आ? मग परिणाम झाला का चोरावर?’’
‘‘अवो, य्याक कणीस खुडायला चोराला जमलं नाय.’’
‘‘मग गावानं काय सत्कार वगैरे केला का नाही तुमचा?’’
‘‘तर उरसाला पिराच्या शिड्याबर हालगी वाजवत मला फिरवलावता.’’
‘‘आणखी काही खास गोष्ट सांगा की तात्या.’’
‘‘आता काय सांगू? हा, एकदा चौगुल्यानं बैलं इकत आनली व्हती. बैलं मजी हात्तीगत दांडगी. त्यास्नी दावणीला बांधून माणसं गेली आनी समदा गाव चौगल्याच्या मळ्यात बैलं बघायला लोटला.’’
‘‘म्हणजे गावानं अशी जोडीच बघितली नव्हती म्हणा.’’
‘‘तर काय? एकांदा पुतळा बगावा अशी बैलं... नादच करायचा नाय.’’
‘‘मग पुढे काय झाले?’’
‘‘बैलं दावणीला बांधून मूळ मालकाची मान्सं गेली, पन बैलं काय कुनाला जवळ यवू दिनात.’’
‘‘आ?’’
‘‘तर काय, नुसतं फुरफुरत अंगावर यायला लागली. बरं दोन एक दिसात मानसाळतील म्हनून वैरण पाणी दिलं तर त्याला बी त्वांड लावनात. चौगल्याचा थुका वाळला, त्यानं देवरषी आणला, काय बाय उपाय केला पण बैलं अबूट वटनात.’’
‘‘अरेच्चा, मग वो तात्या!’’
‘‘अवो, मी असंच सांजच्याला गल्लीत पारावर बोलत बसलोतो आनी चौगल्याची म्हातारी मला हुडकत आली.’’
‘‘रात्रीच्या वेळी?’’
‘‘हा पार कडूस पडल्यावर आनी मला ततचं अश्या नं असं झाल्यालं सांगाय लागली.’’
‘‘तुम्हाला आणि का?’’
‘‘मला बैलं लई वटायची, पाच पाच जोडीचं नांगूर मी हाकायचो.’’
‘‘बरं पुढे?’’
‘‘म्हातारी काकुळतीला येऊन मला मळ्यात चल म्हणून मागं लागली.’’
‘‘आणिक?’’
‘‘आनी काय, उठलो तसाच. म्हातारीबरं मळ्यात गेलो. मळ्यात सगळी डोस्क्याला हात लावून बसलेली.’’
‘‘मग रात्रीच तुम्ही काय केलं?’’
‘‘काय नाय, खंदील हातात घेतला आनी नुस्ता बैलाम्होरं चाबूक खांद्याला लावून हुबारलो.’’
‘‘आ...’’
‘‘बैलास्नी आवाज दिला तशी बैलं मान हालवायला लागली. गळ्यातलं चाळ एका सुरात वाजायला लागलं. मी खंदील खाली ठिऊन बैलांच्या मधी गेलो, पोळं चोळलं, वशिंडापातूर हात फिरवला, पार टांगंतून गेलो. बैलं बुजली न्हाईत का अंगावर आली न्हाईत. मग पाटी समोर ठिवून पाणी वतायचा अवकाश पाणी फुर फुर करीत ढोसायला लागली. पाणी पिवून बैलांनी वैरणीत त्वांड घातलं.’’
‘‘आबाबा...’’
‘‘आरं मळ्यातली तीस-चाळीस बाया माणसं आवाकहून बघायला लागली. चौगल्याचा म्हाताऱ्याची बैलावरनं नदार हटंना. त्याला तेच्या पोरांनी हाताला धरून घरात नेला. राती ततंच निजलो. यरवाळी बैलं सोडून गाडीला जुपली आनी सकाळी सकाळी गावात म्हादेवाच्या देवळात उभी केली. सगळा गाव शर्ती बघायला आल्यागत बघायला आलावता. हा हा हा.’’
‘‘तात्या, एक नाजूक गोष्ट विचारू का?’’
‘‘आ? इचार की. हा हा हा.’’
‘‘तात्या, तुम्हाला बायको कशी मिळाली, म्हणजे कोणी पोरगी दिली?’’
‘‘खरं हाय, सगळ्या पै पावण्यात आपला डंका वाजलेला, मग माज्या थोरल्या आत्तीनं तिची पोरगी मला दिली. त्यात पण एक झालं.’’
‘‘काय सांगा की.’’
‘‘असं झालं, माझं लगीन कसं हूनार म्हणून आय काळजीनं झुराय लागली. हे कळल्यावर माझ्या आत्तीनं तिला धीर दिला. ती म्हणाली, मी देतो माझी पुरगी.’’
‘‘मग, पुढं?’’
‘‘तर आत्तीची थोरली पूर्गी वरडत आली, म्हणाली, की तुला लई झाल्याय काय? हिरीत ढकलतीस काय तिला?’’
‘‘अरं त्येच्या.’’
‘‘पन आत्ती ऐकली नाय, तिनं लगीन लावूनच दिलं.’’
‘‘मग तात्या, तुमची बायको लगीन झाल्यावर तुम्हाला रुसलेली दिसली नाही.’’
‘‘तस काय आढाळलं नाय, पन मी शाना झालो. शिकार बंद झाली, परड्या खानं बंद झालं, म्हसूबाचा निवद खानं बंद झालं. हा हा हा.’’
‘‘म्हंजे तुम्ही सुधारला?’’
‘‘आता तुमीच ठरवा, हाहाहा...’’
‘‘तात्या, खरंच हसताय का उगीचंच?’’
‘‘आ? काय कळंना गड्या. मानसं म्हनत्यात ह्यो अजून बदलला नाय, मग काय रडलो तरी कुनाला पटनार? म्हनून हसायचं, जीव हाई तवरपातूर.’’
‘‘खरं आहे. चलतो तात्या. घ्या काळजी. राम राम.’’
‘‘राम राम.’’
९४२१२९९७७९
(लेखक जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.