Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department: दक्षता पथकाच्या प्रमुखाला तडकाफडकी हटविले; आयुक्तांची कारवाई

Corruption Inquiry: कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्याच्या कृषी दक्षता पथकाचे प्रमुख गोविंद मोरे यांना गैरव्यवहाराच्या संशयावरून तडकाफडकी हटवले आहे. त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यासाठी दोन उच्चस्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. प्राथमिक अहवालात संशयास्पद बाबी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

मनोज कापडे

Pune News: कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी पहिली तडाखेबाज कारवाई थेट कृषी विभागाच्या दक्षता पथकावरच केली आहे. त्यांनी गैरव्यवहाराच्या संशयावरून राज्याच्या कृषी दक्षता पथकाचे प्रमुख गोविंद मोरे यांना तडकाफडकी हटविले आहे.

आयुक्तालयात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यासारखेच दक्षता प्रमुखाचे पददेखील ‘पॉवरफुल’ समजले जाते. राज्याच्या कोणत्याही भागात कृषी विषयक योजना किंवा कामकाजाची चौकशी करण्याचे अधिकार पथक प्रमुखाला आहेत. त्यामुळेच कृषी विभागातील सोनेरी टोळीचे सदस्यदेखील दक्षता पथकाला बिचकून असतात. दुसऱ्या बाजूने या पथकात घुसण्यासाठी मंत्रालयातून सतत लॉबिंग चालू असते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) दर्जा असलेले दक्षता पथकाचे प्रमुखपद मिळवण्यासाठी मंत्रालयात वेगवान घडामोडी झाल्या होत्या. त्यात मातब्बर अधिकाऱ्यांना मागे टाकत चंद्रपूरच्या राजुराचे उपविभागीय कृषी अधिकारी असलेल्या श्री. मोरे यांनी बाजी मारली होती.

दक्षता पथकाची सूत्रे स्वीकारतेवेळी कृषी आयुक्त, सचिव तसेच मंत्री अशी सर्व कार्यालये अस्थिर होती. त्यामुळे श्री. मोरे यांना दोन वर्षे काहीही अडथळा आला नाही. परंतु, आता स्थिती बदलली असून तीनही कार्यालये सक्षम झाल्यामुळे त्याचा पहिला तडाखा श्री. मोरे यांना बसला आहे.

दोन उच्चस्तरीय समित्यांची नियुक्ती

दक्षता पथकाचे प्रमुख थेट आयुक्तांच्या अखत्यारीत काम करतात. ही कामे मुख्यत्वे गैरव्यवहाराच्या चौकशीच्या संबंधी असतात. परंतु, कृषी आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर श्री. मांढरे यांना गेल्या काही दिवसांपासून श्री. मोरे यांच्याच भानगडींची माहिती मिळत होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दक्षता पथकाच्या प्रमुखाच्या मागील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी दोन उच्चस्तरीय समित्या नियुक्त केल्या होत्या.

एका समितीला श्री. मोरे यांच्या चंद्रपूरमधील; तर दुसऱ्या समितीला वर्धा जिल्ह्यातील कामकाजाची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, दोन्ही समित्यांना चौकशीसाठी अत्यावश्यक असलेली कागदपत्रे देण्यात आली नाहीत. यातील एका समितीचा प्राथमिक चौकशी अहवाल प्राप्त होताच श्री. मोरे यांना हटविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.

‘‘दक्षता पथक अनेक गोपनीय स्वरूपाची कामे हाताळते. त्यामुळेच आयुक्त वगळता कोणत्याही अधिकाऱ्याला दक्षता पथकाला काम सांगण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळेच पथकाच्या पदावर चांगली पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती अपेक्षित असते. मात्र, श्री. मोरे यांच्यावरच गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने त्यांना हटविणे क्रमप्राप्त होते. त्यांच्यावर आता प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे,’’ अशी माहिती आयुक्तालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दक्षता पथकाची सूत्रे राऊत यांच्याकडे

कृषी विभागाच्या दक्षता प्रमुख पदावरून गोविंद मोरे यांना तडकाफडकी हटविण्यात आल्यामुळे पथकाला चांगलाच तडाखा बसला आहे. पथकाची सूत्रे आता पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्याकडे देण्यात आली आहेत. श्री. मोरे यांच्याकडून हाताळली जाणारी गैरव्यवहाराच्या चौकशी प्रकरणात आता श्री. राऊत काय भूमिका घेतात, याकडे आता अधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT