Pomegranate Farming Management:
शेतकरी नियोजन । पीक : डाळिंब
शेतकरी : नवनाथ महादेव हराळे
गाव : हराळवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर
डाळिंब क्षेत्र : १ एकर
एकूण झाडे : ७००
हराळवाडी (ता. मोहोळ) येथे नवनाथ महादेव हराळे यांची साडेतीन एकर शेती आहे. श्री. हराळे सोलापुरातील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करतात. यासोबतच त्यांनी शेतीची आवड जोपासली आहे. साडेतीन एकर क्षेत्रापैकी एक एकरामध्ये त्यांनी डाळिंब लागवड केली आहे. २०२१ मध्ये पहिल्यांदा अर्धा एकरावर पारंपरिक पद्धतीने १० बाय ७ फूट अंतरावर ३५० झाडांची लागवड केली.
त्यानंतर मागील वर्षी अर्धा एकरावर एक खोड पद्धतीने सुमारे ४२० झाडांची ६ बाय ९ फूट अंतरावर नवीन लागवड केली आहे. दोन्ही बागेत आंबिया बहर धरला आहे. सध्या जुन्या बागेतील झाडांवर साधारण २०० ते ३०० ग्रॅम वजनाची फळे लगडलेली आहेत. वातावरण बदलामुळे फळांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दोन्ही बागेत क्रॉप कव्हरचा वापर केला आहे. त्यामुळे तापमान आणि अवकाळी पाऊस यापासून बागेचे संरक्षण होण्यास मदत झाली असल्याचे नवनाथ हराळे सांगतात.
आंबिया बहर नियोजन
मागील हंगामातील फळांची काढणी पूर्ण झाल्यानंतर बागेत स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीपासून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बागेस ताण देण्यात आला. या वर्षी पावसाची तीव्रता कमी असल्यामुळे बागेतील झाडांना अपेक्षित ताण बसण्यास मदत झाली. काडी परिपक्वतेसाठी ऑगस्टच्या सुरुवातीस ६ बीए आणि बोरॉन यांचा फवारणीद्वारे वापर करण्यात आला. सोबतच बोर्डोचा देखील वापर केला.
ऑक्टोबरच्या शेवटी अनावश्यक काड्या, कीड-रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करण्यात आली. त्यानंतर बोर्डोचा वापर केला.ताण तोडण्यापूर्वी झाडांना चांगले कुजलेले शेणखत प्रति २० ते २५ किलो, निंबोळी पेंड आणि रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या. रासायनिक खतांमध्ये १०-२६-२६, पोटॅश, सिलिकॉन, मॅग्नेशिअम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि सिंगल सुपर फॉस्फेट यांचा वापर केला आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस ४ तास ठिबकद्वारे सिंचन करत बागेचा ताण तोडला. त्यानंतर इथरेलची फवारणी करून पानगळ केली. दरवर्षी इथरेलची फवारणी करताना त्याचा कमी प्रमाणात वापर केला जातो. कारण, जास्त फवारणीमुळे काडी वाळण्याची शक्यता असते, असा श्री. हराळे यांचा अनुभव आहे.पालवी फुटण्यास सुरुवात झाल्यानंतर १५ दिवसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली. कळी चांगली निघण्यासाठी संजीवकांचा वापर केला.
फुलधारणा अवस्थेत झाडाच्या अवस्थेनुसार ड्रीपमधून ०-५२-३४, बोरॉन, कॅल्शिअम नायट्रेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा साधारण ४ ते ५ दिवसांच्या अंतराने वापर केला.लहान आकाराची फळधारणा झाल्यानंतर संपूर्ण बागेवर क्रॉप कव्हरचा वापर करण्यात आला. तापमान कमी झाल्यानंतर पोटॅश, १०-२६-२६, पोटॅश, सिलिकॉन, मॅग्नेशिअम सल्फेट, निंबोळी पेंड यांचा वापर करण्यात आला आहे.
मागील कामकाज
फळांचा दर्जा राखण्यासाठी रासायनिक खतांचे आणि सिंचनाचे योग्य नियोजन केले जाते. दर पंधरा दिवसांच्या अंतराने सरकी पेंड, शेंगदाणा पेंड यांची स्लरी करून दोन वेळा आळवणीद्वारे वापर करण्यात आला. मागील १५ दिवसांत पोटॅशयुक्त खतांचा वापर करण्यात आला. जेणेकरून फळांना चकाकी येऊन दर्जा, आकार उत्तम मिळेल.
पाच दिवसाच्या अंतराने दोन वेळा वापर करण्यात आला.फळांचा आकार वाढताना फळे फुटण्याची शक्यता असते. त्यासाठी चिलेटेड स्वरूपात बोरॉन, कॅल्शिअम यांचा वापर करण्यात आला. मागील महिन्यात तापमान चांगलेच वाढले होते. त्यामुळे दररोज संध्याकाळी १ तास ठिबकद्वारे सिंचन करण्यात आले.
आगामी नियोजन
सध्या बागेतील झाडांवर साधारण २५० ते ३०० ग्रॅम वजनाची फळे लगडलेली आहेत. पुढील साधारण १५ दिवसांत काढणीस सुरुवात होईल.सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असल्याकारणाने डाळिंबाची फळगळती होऊ नये, तेलकट डाग रोग येऊ नये म्हणून, प्रतिबंधात्मक- पुढील आठ दिवसांमध्ये क्रॉप कव्हर काढले जाईल.
सध्या ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीनुसार बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाईल.बाग थेट व्यापाऱ्यांना देऊन जागेवरच फळांची विक्री केली जाईल. मागील वर्षी सरासरी ९९ रुपये प्रतिकिलो जागेवर दर मिळाला होता, असे श्री. हराळे सांगतात.
क्रॉप कव्हरचा वापर
आंबिया बहरातील फळांचे पूर्णपणे सेटिंग झाल्यानंतर उन्हापासून फळांचे संरक्षण होण्यासाठी दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात क्रॉप कव्हरचा वापर केला जातो. क्रॉप कव्हरचा वापर केल्यामुळे डाळिंबाची गुणवत्ता उत्तम राहण्यास मदत झाली. फळ सेटिंग होण्यास सुरुवात झाल्यानंतर क्रॉप कव्हरचा वापर केल्यामुळे अवकाळी पाऊस आणि वाढत्या तापमानापासून फळांचे संरक्षण होण्यास मदत मिळते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात राहून रासायनिक फवारणीवरील खर्चात मोठी बचत होते, श्री. हराळे यांनी सांगितले.
- नवनाथ हराळे, ९९२२२२३२२७
(शब्दांकन : सुदर्शन सुतार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.