Solapur Ujani News : सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाने तळ गाठला आहे. गेल्या ५५ दिवसांत तब्बल ३३ टीएमसी पाणी संपले आहे. अडीच महिन्यांपासून कॅनॉल, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडणे सुरुच आहे. सततच्या पाण्याच्या उपशामुळे धरणातील पाणी पातळी आता उणे पातळीत पोचली आहे.
गतवर्षी १२ जूनला उणेमध्ये गेलेले उजनी धरण यंदा सहा मे रोजी म्हणजे ३७ दिवस आधीच उणेपातळीत गेले आहे. त्यामुळे पाऊस सुरु होईपर्यंत जिल्ह्याला पाणी टंचाईच्या छळा सोसाव्या लागणार आहेत.
उजनी धरणाची १२० टीएमसी पाणी साठवणक्षमता आहे. पण, सध्या २० ते २२ टीएमसीपर्यंत गाळ आहे. त्यामुळे धरण उणेमध्ये गेल्यानंतर ६४ टीएमसी पाणीसाठा राहतो. त्यापैकी ४० ते ४४ टीएमसीच पाणी प्रत्यक्ष वापरायला मिळते.
२०१८-१९ मध्ये धरणातून उणे पातळीतील २७ ते २८ टीएमसीपर्यंत पाणी वापरले होते. यंदाही तशीच वेळ येईल, असा अंदाज आहे. तरीही १५ जूनपर्यंत पाऊस झाल्यास मृत साठ्यातील १५ टीएमसीपर्यंत पाणी वापरावे लागेल, अशी स्थिती आहे.
सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ४३३ क्युसेक, बोगद्यातून ५६० क्युसेक व कॅनॉलमधून २२०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे दररोज अर्धा टीएमसी पाणी संपत आहे. त्यात पुन्हा बाष्पीभवनाचाही फटका बसत आहे. त्यामुळे धरण आता उणेपातळीमध्ये पोचले आहे. सध्या धरणात ६२.८६ टीएमसी पाणी आहे.
पाणी पातळी उणे १.४९ टक्केवर
सोमवारी (ता. ८) सकाळच्या आकडेवारीनुसार धरणाची एकूण पाणी पातळी ४९०.९१५ मीटरपर्यंत आहे. तर एकूण पाणीसाठा ६२.८६ टीएमसी आहे. त्यापैकी सध्या उणे ०.८० टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, तर या पाण्याची टक्केवारी उणे १.४९ टक्के एवढी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.