Agriculture SRT Method Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Team Agrowon

सतीश खाडे

Indian Agriculture : या वर्षी पावसाळा उत्तम झाला. या वाक्यासोबतच वाढलेल्या व कमी काळात अधिक पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान आपल्याला नक्कीच पाहावे लागते. ही दर एक, दोन वर्षांआडची नियमित स्थिती आहे. दुष्काळी स्थितीसोबच अधिक पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकडेही तितक्याच सजगपणे पाहण्याची आवश्यकता असते. कारण शेत जमिनीमध्ये पाण्याचा अतिरेक होऊन पिकांची मुळे कुजणे, सर्व पाने पिवळी पडणे यातून हजारो एकरावरील पिके नष्ट होतात. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यासोबत सुपीक माती वाहून जाते. सुपीक माती वाहून जाणे म्हणजेच शेतीची अवस्था कायमस्वरूपी बिघडणे. खरीप हंगामातील पूर्ण पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होतेच, पण सोबत सुपीक माती नष्ट झाल्यामुळे जमिनीची कायमस्वरूपी नापिकीकडे वाटचाल होते. उत्पादन कमी येऊ लागले, की रासायनिक खतांचा वापर वाढत जातो. आपल्याकडे पशुधन कमी होत असल्यामुळे पूर्वीप्रमाणे शेणखत व कंपोस्ट खत अशी सेंद्रिय खते देण्याचे प्रमाण मुळातच कमी झाले आहे.

रासायनिक खतांचा वाढत्या वापरामुळे उत्पादन खर्चात मोठी भर पडते, पण त्यासोबत मातीची व त्यातून सूक्ष्मजीवांची विविध अंगाने जी हानी होत जाते, त्याला तोड नाही. ही बाब एखाद्या वर्षाची राहिलेली नाही, त्यामुळे दुष्परिणामांचे हे चक्र सुरूच राहते. अतिपावसाच्या स्थितीमध्ये शेतजमिनीतील माती वाहून जाणे टाळण्यासाठी आणि साचलेल्या पाण्यातही पिके उत्तम प्रकारे तग धरण्यासाठी कृषिभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी तयार केलेल्या ‘सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक (एसआरटी)’ या तंत्राचा मोठा फायदा होऊ शकतो. या तंत्रासाठी लेखामध्ये आपण एसआरटी असा शब्द वापणार आहोत.

पूर परिस्थितीतही एसआरटी तंत्रामुळे पिके का तगून राहतात?

विशेषतः भात पिकामध्ये पुनर्लागवड केलेल्या शेतामध्ये नांगरणी व चिखलणीमुळे जमिनीच्या कणरचनेची पूर्णतः वाट लागते. त्यामुळे पूर परिस्थितीत तेथील माती व पीक दोन्हीही वाहून जाते. त्या विरुद्ध एसआरटीमधील वर्षागणिक सुधारलेल्या कणरचनेमुळे व भात बियांची थेट टोकण केल्यामुळे मुळांची मुजबूत जाळी तयार होतात. त्यामुळे पुराचे पाणी तेथील मुळे व मातीच्या परिसंस्थेला फारसा धक्का लावू शकत नाही. या जाळ्यात मातीचे कण अडकत केवळ अतिरिक्त पाणी निघून जाते.

पूर्वीची पिके आपण वरच्यावर कापून घेत असल्यामुळे त्या पिकांच्या मुळांची जाळी जमिनीत तशीच राहतात. ही हळूहळू कुजत मुळांच्या जागी सूक्ष्म पोकळ्या व नळ्या तयार होतात. या अगणित पोकळ्या आणि नळ्यामधूनही अन्य वेळी हवा खेळती राहते, तर अधिक पाण्याच्या स्थितीमध्ये पाणी खोलवर नेऊन सोडले जाते. यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया वेग घेते. या दोहोंचा फायदा होऊन कापूस - सोयाबीन सारख्या पिकांची मूळकूज रोखली जाते. पीक तग धरण्याची प्रमाण वाढते.

काढणी झालेल्या पिकांची मुळे जमिनीतच कुजल्यामुळे व अन्य सर्व पीक अवशेष मातीतच कुजल्यामुळे जमिनीतील अनेक अन्नद्रव्यांबरोबरच सेंद्रिय कर्बही वाढतो. हा सेंद्रिय कर्ब जमिनीची कण रचना सुधारण्यासाठी मदत करतो. त्यामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता सहा पटीने वाढते. पाण्याचा निचरासुद्धा सुधारतो. सेंद्रिय कर्ब हेच मुख्य अन्न असल्यामुळे या जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. गांडुळे व तत्सम माती भुसभुशीत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते.

या सेंद्रिय कर्बाच्या वाढीमुळे रोपांची व झाडांची वाढ खूप सुदृढतेने होते. या सुदृढतेमुळे त्यांची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. यामुळेच निचरा होत असूनही काही काळ पाणी साठून राहिले, अगदी पीक पूर्ण पाण्यात बुडाले तरी ते काही काळ तगून राहते.

प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतीत एसआरटी...

जांभूळपाडा, (ता. सुधागड, जि. रायगड) येथील रसिका फाटक यांनी २०१९ मध्ये प्रथम एसआरटी पद्धतीने शेती केली. मुळात त्यांचे शेत पाणथळ आहे. अति पावसामुळे त्यांच्या शेतात एकाच वर्षात चार वेळा महापूर येऊन गेला. जवळ जवळ सहा फूट पाणी प्रत्येक वेळी सहा दिवस पिकाच्या डोक्यावर होते. असे असून सुद्धा एसआरटी पद्धतीने केलेल्या भाताचे पिकाचे काहीही नुकसान झाले नाही. उलट या शेतीतून प्रतिहेक्टरी सात टन भात उत्पादन मिळाले. बाजूलाच असलेल्या पारंपरिक शेतातील भात व चिखल दोन्ही वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षीही दोन वेळा महापूर येऊनसुद्धा हेक्‍टरी १२ टन असे भाताचे विक्रमी उत्पादन घेण्यात त्यांना यश आले आहे.

साखरा (ता. जि. गडचिरोली) येथील राजेश वाणी हे गेल्या दहा वर्षांपासून एसआरटी पद्धतीने शेती करत आहेत. ते सांगतात, ‘‘चार वर्षांपूर्वी माझ्या शेतात महापुराचे पाणी शिरले. जमिनीपासून १० फूट उंच असे महापुराचे पाणी सुमारे पाच दिवस शेतात होते. आमच्या शेजारच्या शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीने केलेली शेती पूर्णपणे जमीनदोस्त झाली. माझे एसआरटी पद्धतीवर पीक मात्र वाचलेले होते. थोडेफार नुकसान झाले असले तरी अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये त्याचे प्रमाण खूपच कमी होते.’’

रांजणगाव (ता. राहता, जि. नगर) येथील रावसाहेब गाढवे सांगतात, ‘‘आमच्या भागात एका दिवसात ९० ते १०० मी.मी. पाऊस होऊन पीक सडून जाण्याची समस्या दर एक दोन वर्षांतून एकदा तरी घडत होती. त्यावर उपाय म्हणून तीन वर्षांपूर्वी मी प्रथमच एसआरटी पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड केली होती. त्यातून आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या तुलनेत पीक चांगल्या प्रकारे तग धरत असल्याचे लक्षात आले. बाजूच्या अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्क्यांपर्यत पीक नुकसान झाले होते. अशा अवकाळी मोठ्या पावसाला तोंड देण्याची क्षमता एसआरटी पद्धतीने नक्कीच आहे.’’

म्हैसाळ (ता. मिरज, जि. सांगली) येथील शेतकरी अमोल देवाप्पा कागवाडे सांगतात, ‘‘आमच्या भागात वर्षानुवर्षे ऊस पीक घेतले जाते. परिणामी, जमिनीचा पोत खराब झाला होता. २०१९ पासून पूरपरिस्थितीत पिकांचे नुकसान होत होते. जमिनीचा पोत सुधारण्यासोबत पाण्यात तग धरेल, अशा नवीन पिकाच्या किंवा पद्धतीच्या शोधात मी होतो. माझ्या वाचनात एसआरटी पद्धतीची माहिती आली. मी चंद्रशेखर भडसावळे दादांच्या सगुणा बागेला भेट देत त्याविषयी समजून घेतले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार एसआरटी वर हळद हे पीक घेतले. दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस या वर्षी होऊनही जमिनीतून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे झाल्यामुळे हळद पिकात कंद कूज, पिकाची वाढ खुंटणे, पीक पिवळे पडणे या गोष्टी झाल्या नाहीत. जमिनीला वाफसाही लवकर आला. अतिवृष्टीच्या स्थितीत बाजूच्या शेतामधील ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.’’

एसआरटी पद्धतीने पीक नियोजन

खरेतर एसआरटी हा शून्य मशागत शेती तंत्राचाच प्रकार आहे. म्हणजे एकदा नांगरणी करून कायमस्वरूपी गादीवाफे तयार केले जातात. त्यानंतर पुढील सुमारे वीस वर्षे जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची मशागत (नांगरणी, खळणी, कुळवणी, कोळपणी, खुरपणी, भांगलणी इ.) करणे टाळायचे. म्हणजेच कोणत्याही मशागतीशिवाय या गादीवाफ्यावर विविध प्रकारची पिके घेत राहायची. ही सर्व पिके दोन ओळींवर रोपांतील शास्त्रीय अंतर राखत थोडासा खड्डा करून टोकण पद्धतीने लावायची. गादीवाफ्याच्या बाजूला असलेल्या सरीमधून जमिनीवर पडलेल्या वा पिकातून वाहणाऱ्या पाण्यापैकी अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी सोय केली जाते. मुख्य म्हणजे या पद्धतीत पहिल्या पिकाची काढणी झाली की त्याचे सारे अवशेष आणि त्या झाडांची मुळे जमिनीत जागीचे कुजू दिली जातात.

या पद्धतीमध्ये कोणताही काडीकचरा अजिबात जाळायचा नाही. त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढत राहते. अगदी भातासारख्या पिकातही चिखलणी वा तत्सम काहीही मशागत केली जात नाही. अशा प्रका भात, नाचणी, ज्वारी, बाजरी, कापूस, तूर, ज्वारी, गहू, मका, भुईमूग, कांदा, सोयाबीन, सूर्यफूल, चवळी, पालेभाज्या, हुलगा, कोबी, भेंडी, टोमॅटो, हरभरा या व अशा अनेक प्रकारची पिके आपण शून्य मशागतीवर घेऊ शकतो. फक्त त्या शास्त्रीय पद्धतीनेच फेरपालट करत राहायची. यातून जमिनीच्या सुपीकतेत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येते. अगदी वर्षाला तीन- तीन पिके घेऊनही जमिनीच्या सेंद्रिय कर्बात एका वर्षात ०.५ टक्क्याने वाढ झालेली दिसून आली आहे. या पद्धतीने शेती केल्यास पावसाळ्यात भात पिकातही आपोआप गांडुळे येत असल्याचे आपल्याकडे जगामध्ये सर्वप्रथम दिसून आले आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून पिकाच्या उत्पादकतेत दुपटीने वाढ होते. आज महाराष्ट्रातील २० पेक्षा जास्त जिल्ह्यात (यात सर्व कृषी हवामान विभाग आले) ८ हजारांपेक्षा जास्त शेतकरी एसआरटी पद्धतीने शेती करत आहेत.

सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार

Crop Damage : खानदेशात पावसाने पीकहानी सुरूच

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

SCROLL FOR NEXT