Nagar News : उन्हामुळे दुधाच्या दरात तीस टक्क्यांपर्यंत घट झाली. पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न, पशुखाद्याचे वाढते दर यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आलेला असताना काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढवलेले गाईच्या दुधाचे दर बहुतांश दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटरचा २९ रुपयांचा दर पुन्हा २७ रुपयांवर आला आहे.
दोन रुपये दर कमी केल्यापासून दूध उत्पादकांना दर दिवसाला तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक तर शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार ३४ रुपये दर दिला जात नसल्याने प्रति लिटरला सात रुपयांप्रमाणे दररोज १५ कोटी रुपयांपेक्षा आर्थिक फटका बसत असल्याने दूध उत्पादक पुरते हैराण झाले आहे.
राज्यात गाईच्या दुधाचे साधारणपणे दोन ते सव्वादोन कोटी लिटरपर्यंत संकलन होत असते. साधारणपणे कमी पाणी उपलब्धता असलेल्या भागातील शेतकरी शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय करतात. नगरसह नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांत तीव्र उन्हाळा असल्याने व उष्माची तीव्र आहे.
बहुतांश भागात पाण्याची टंचाई आहे. त्याचा थेट परिणाम दूध व्यवसायावर होताना दिसत आहे. उष्मामुळे साधारणपणे तीस ते चाळीस लाख लिटरपर्यंत दुधात घट झाली आहे. नगरसह उन्हाळ्यात लग्नसोहळे व अन्य कार्यक्रमामुळे दुग्धजन्य पदार्थाला मागणी अधिक असते. असे असताना दर कमी केल्याने शेतकरी बेजार झाले आहेत.
गेल्या वर्षी या दिवसात दुधाला पस्तीस रुपयांच्या आसपास प्रति लिटरला दर होता. यंदा सात ते आठ महिन्यांपासून सातत्याने खरेदीदार दुधाचे दर कमी करत आहेत. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनानंतर शासनाने समिती नियुक्त करुन ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये प्रति लिटर दर द्यावा, या बाबत शिफारस केली होती.
मात्र त्याकडे पशुसंवर्धन विभाग आणि खरेदीदार संघांनी दुर्लक्ष केले. मागील काही दिवसांपासून गाईच्या दुधाला पंचवीस रुपये प्रति लिटरला दर होता. मागील दीड महिन्यापूर्वी तो २७ रुपये केला व ११ मे ला २ रुपयांनी त्यात वाढ केली. मात्र पुन्हा २५ मेपासून रुपयांनी दर कमी केले आहेत. त्यामुळे सध्या २९ रुपयांपर्यंत पोहोचलेले दुधाचे दर आता पुन्हा २७ रुपयांपर्यंत खाली आले आहे.
एकतर दुधाला मिळणारा दर कमी आहे. त्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांला मागणी नसल्याचे कारण पुढे करत खरेदीदार दूध संघांकडून दुधाचे दर पाडले जात असल्याने दूध उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून तोट्यात दूध धंदा करत आहेत. गेल्या सहा महिन्यांचा विचार केला तर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका दूध उत्पादकांना सोसावा लागला आहे.
जनावरे जगवण्यासाठी कसरत
राज्यातील पंचवीस जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, त्यावर कोणतीच उपाययोजना नाही. दुष्काळी भागात यंदा छावण्या सुरू केल्या नाहीत, चारा डेपोही उभारले नाहीत. त्याऐवजी चारा उत्पादन करण्यावर भर दिला. मात्र राज्यातील अनेक भागांत चारा, जनावरांसाठी पिण्याचे पाणी मिळवताना दूध उत्पादकांना कसरत सुरू आहे, असे असताना दुधाचे दर पाडून दूध व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकरी करत आहेत.
राज्य शासनाच्या अनास्थेमुळे दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. साधारण पस्तीस रुपये दर मिळायला हवा. कारण अनेक शेतकऱ्यांकडे घरचा चारा नाही, पशुखाद्याचे दर वाढत असताना दर कमी करत असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हा व्यवसाय कसा जगवावा असा प्रश्न आहे.देविदास पिसे, दूध उत्पादक शेतकरी, मोहोज देवढे, ता. पाथर्डी, जि. नगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.