Vadi Project
Vadi Project Agrowon
ॲग्रो विशेष

Vadi Project : वाडी मॉडेल ची द्वारे लगडली यशाची मधुर फळे

माणिक रासवे

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील आमदरी, राजदरी, पिंपळदरी, भोसी, वाळकी, मूर्तिजापूर- सावंगी ही गावे डोंगराळ, माळरानाची आहेत. पावसावर (Rain) अवलंबून असल्याने खरीप पिकांवर या भागातील शेतकऱ्यांची (Farmer) भिस्त असे. हंगाम संपल्यानंतर गावात कामे उपलब्ध नसत. मग ऊस (Sugarcane) तोड, वीट भट्टी, बांधकाम आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर व्हायचे.

ही परिस्थिती बदलण्यासाठी परभणी जिल्ह्यातील केरवाडी येथील ‘सोशल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट (एसईडीटी) या स्वंयसेवी संस्थेने पुढाकार घेतला. ‘नाबार्ड’ निधीतून २०१३ ते २०२० या काळात या सहा गावांमध्ये प्रकल्प राबविण्याचे ठरले. आदिवासी शेतकरी, भूमिहीन शेतमजुरांचे उत्पन्न वाढावे, स्थलांतर थांबावे हे त्यामागील मुख्य उद्देश होते.

काय आहे वाडी मॉडेल?

प्रकल्पात फळबाग लागवड, संवर्धन, आवश्‍यक साधनांचा पुरवठा व विपणन साखळीशी जोडणे या बाबी अंतर्भूत केल्या. गुजराती भाषेतील वाडी या शब्दाचा अर्थ छोटी फळबाग असा होतो. वनीकरणासाठी विविध वृक्षांच्या प्रजातींचे संवर्धनही यात केले जाते. हवामान, उत्पन्न, विक्रीची जोखीम कमी करण्यासाठी या वाडी मॉडेलमध्ये दोन किंवा अधिक फळपिकांची निवड केली जाते.

अंमलबजावणी

संस्थेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत कुलकर्णी, व्यवस्थापक डी. आर. सारंग, मुख्य लेखापाल प्रल्हाद पांचाळ, चंद्रकांत गवारे यांचे वाडी प्रकल्पात योगदान राहिले. प्रत्येकी एक एकर याप्रमाणे एकूण ५०० शेतकऱ्यांकडे मिश्र फळपिकांची लागवड झाली. प्रति एकरात ५० फळझाडांचा समावेश करण्यात आला.

त्यात केसर आंब्याची ३० झाडे लावणे बंधनकारक होते. उर्वरित झाडांमध्ये चिकू, पेरू, आवळा, जांभूळ, शेवगा आदींचा पर्याय देण्यात आला. लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २०१३ ते २०१५ असा कालावधी लागला. खड्डे खोदणे, लागवडीची मजुरी, निविष्ठा यांसाठीच्या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली.

सिंचन स्रोतांचे बळकटीकरण...

फळबागांच्या संवर्धनासाठी सिंचन स्रोतांचे बळकटीकरण केले. यात १० बाय १० मीटर आकाराची शेततळी, ४ बाय ३ मीटर आकाराचे जलकुंड बांधले. जुन्या विहिरींचे खोलीकरण केले. पाणी उपसा पंप देण्यात आले. बांधबंदिस्ती करून मृदा जलंसधारणाच्या उपाययोजना राबविल्या. ‘व्हर्मिकंपोस्ट’, घरगुती जैविक निविष्ठा निर्मिती व वापराचे प्रशिक्षण देण्यात आले.

उत्पन्नाचा मिळाला आधार

प्रकल्पांतर्गत फळबागांचे उत्पादन सुरू झाले आहे. नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या दर्जेदार केसर आंब्याला हिंगोली शहरासह परिसरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची पसंती मिळाली आहे. शासकीय कर्मचारी थेट शेतातून खरेदी करतात. शेतकऱ्यांना बारमाही उत्पादन घेता येत आहे. शेतमजुरांना शेळीपालन, किराणा दुकानासाठी अर्थसाह्य दिले आहे.

पिंपळदरी, भोसी, वाळकी येथील मच्छीमारांना मासे पकडण्यासाठी आधुनिक जाळी दिली असून, त्यातून श्रम कमी झाले. स्थलांतर कमी झाले आहे. भोसी गावाचे शिवार विस्तीर्ण आहे. वाड्या लोकवस्तीपासून दूर आहेत. त्यामुळे फळबागांचे वन्य पशूंपासून संरक्षण करण्यासाठी फुलाजी झाटे व अन्य शेतकरी शेतात वास्तव्यास गेले आहेत.

दुष्काळात जगविल्या बागा

सन २०१६ मध्ये या भागात दुष्काळी स्थिती उद्‍भवली. त्या वेळी २० शेतकऱ्यांचा गट तयार करण्यात आला. प्रत्येक गटास एक बैलगाडी आणि २०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देण्यात आली. त्यातून फळबागा जगविण्यात अनेक शेतकऱ्यांना यश मिळाले.

बदल घडला

आमदरी या आदिवासी बहुल गावातील डोंगरदऱ्यांमध्ये काही वर्षापूर्वी साग, आंबा, तेंदू, पळस, तिवस आदी वृक्षराजी विपुल होती. गावरान आंब्याचे भरपूर उत्पादन मिळायचे. विभक्त कुटुंब पद्धतीद्वारे जमिनीचे तुकडे झाले. अल्पभूधारकांची संख्या वाढली. आम्रवृक्षांची तोड झाली, गावातील नागोराव बेले यांची माळरानाची अडीच एकर जमीन आहे.

वाडी मॉडेलमध्ये त्यांनी २०१४ मध्ये मिश्र फळबाग यात केसर आंबा, चिकू, पेरू, जांभूळ यांची लागवड केली. आंब्यासाठी त्यांनी खास ग्राहक तयार झाले असून, दरवर्षी नियमित मागणी असते. विहीर खोलीकरणामुळे त्यांना उन्हाळी भुईमूग घेता येत आहे. फळबागेतील आंतरपिकांमधूनही उत्पन्न मिळते.

मजुरी करण्याची गरज राहिलेली नाही. बेल यांनी बैलजोडी विकत घेतली असून, घराचे बांधकाम केले आहे. मुलगा शिवशंकर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पदवीधर झाला. सन २०१९ मध्ये राष्ट्रीय बँकेच्या सेवेत रुजू झाला आहे. पूर्वी अडीच एकरांत कुटुंबाची उपजीविका चालविणे कठीण होते. उन्हाळ्यात डोंगर माथ्यावरील जंगलातून तेंदूपत्ता गोळा करून विक्री करायचो. आता फळबाग वाडीतून वर्षभर उत्पन्न सुरू झाले आहे.

नागोराव बेले आमदरी, ७०५७४५३३४५

सहा एकर माळरान जमीन आहे. खरिपात जेमतेम उत्पन्न मिळायचे. कामासाठी गाव सोडावे लागे. आता फळबाग लागवड, जलकुंड, बोअर खोदणे आदी कामे झाली आहेत. भाजीपाला उत्पादनही घेत आहोत.

फुलाजी झाटे भोसी

मी भूमिहीन आहे. वाडी प्रकल्पात दोन शेळ्या मिळाल्या. सध्या २५ शेळ्या आहेत. व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळत असून, मजुरीची गरज उरलेली नाही.

सुभानजी जवादे,

भोसी

डी. आर. सारंग ः९९२२९१४१०२

चंद्रकांत गवारे ः८६६८६७२८०४c

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT