Fig Agrowon
ॲग्रो विशेष

Fig Management : अंजिरातील मीठा बहर व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. प्रदीप दळवे, डॉ. युवराज बालगुडे, नितीश घोडके, सुनील नाळे

अंजीर हे कोरडवाहू भागातील कमी पाणी, कमी खर्च आणि अत्यल्प मशागतीत अधिक नफा मिळवून देणारे फळपीक म्हणून अंजीर ओळखले जाते. अंजिराच्या अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. अंजिराला वर्षातून दोन वेळा बहर येतो.

पावसाळ्यात येणाऱ्या बहराला खट्टा आणि उन्हाळ्यात येणाऱ्या बहराला मीठा बहर असे म्हणतात. खट्टा बहरातील फळे नोव्हेंबर ते जानेवारी, तर मीठा बहरातील फळे फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान तयार होतात. खट्टा बहरातील फळे आंबट व बेचव असतात. तर मीठा बहरातील फळे चांगल्या दर्जाची तसेच चवीला अधिक गोड असल्याने त्यांना चांगला बाजारभाव मिळतो.

पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या भागात खट्टा, तर वर्षभर पाण्याची शाश्वती असलेल्या भागात मीठा बहर घेतला जातो. उन्हाळ्यात ताणावर गेलेल्या झाडांना जून-जुलै महिन्यात नवीन फुट येऊन वाढीस लागते. परंतु पावसाळ्यात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊन पुन्हा पानगळ होते व झाडे सुप्तावस्थेत जातात. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बागेची छाटणी केली जाते. छाटणीनंतर बागेस खत व पाणी व्यवस्थापनास सुरुवात केली जाते.

बहर व्यवस्थापनातील बाबी

झाडांची छाटणी करून बहर धरणे

अधिक व दर्जेदार उत्पादनाकरिता प्रत्येक वर्षी झाडांची छाटणी करणे फायद्याचे ठरते. काही भागांमध्ये अंजिराच्या झाडांची दरवर्षी खरड छाटणी केली जाते, तर काही भागात हलकी छाटणी करतात. अंजीर बागेत मीठा बहराकरिता सप्टेंबर महिन्यात प्रत्येक फांदीचा जोर पाहून १/३ किंवा १/२ आखूड छाटणी करावी. छाटणीनंतर १ टक्का बोर्डो मिश्रणाची (एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी. छाटणीनंतर उर्वरित फांदीच्या भागावरील डोळे फुटतात व आलेल्या नवीन फुटीवर फळे येतात.

झाडांची पानगळ करून बहर धरणे

पुणे जिल्ह्यातील पुरंदर भागात छाटणी न करता सुप्तावस्थेत गेलेल्या झाडांवरील राहिलेल्या पानांची हाताने पानगळ करतात. त्यानंतर संजीवकाची फवारणी करून बहर धरला जातो. याकरीता हायड्रोजन सायनामाइड (५० टक्के) २० मिलि प्रति लिटर पाण्यातून फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे पानगळ केलेल्या काडीवर अधिक व एकसारखे डोळे फुटतात तसेच भरपूर प्रमाणात फलधारणा होते. या पद्धतीने बहर धरलेल्या बागेतील फळांचा दर्जाही उत्तम मिळतो.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

अंजिराच्या झाडांची नीट व जोमाने वाढ होण्यासाठी लागवडीच्या सुरवातीच्या काळात नियमित खते द्यावीत. पूर्ण वाढ झालेल्या झाडास ५० किलो शेणखत, ११२५ ग्रॅम नत्र (२४४१ ग्रॅम युरिया), ३२५ ग्रॅम स्फुरद (२०३१ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) व ४१५ ग्रॅम पालाश (६९३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति झाड प्रति वर्ष द्यावे. त्यापैकी ५० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा बहर धरताना व उर्वरित ५० टक्के नत्र बहर धरल्यानंतर एक महिन्याने द्यावी.

अंजीर बागेस जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अबलंब करणे आवश्यक असते.

अंजीर बागेस सेंद्रिय खते वापरणे अत्यंत गरजेचे असते. अंजिरास प्रति झाड प्रति वर्ष ५ किलो निंबोळी पेंड द्यावी. अंजीर बागेत सेंद्रिय पदार्थांचा तसेच जिवाणू संवर्धके, हिरवळीची खते, गांडूळखताचा योग्य आच्छादनाचा व पिकांच्या अवशेषांचा वापर बहर धरण्यापूर्वी महत्त्वाचा आहे. अंजीर पिकास नत्र, स्फुरद, पालाश सोबतच मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, गंधक, बोरॉन, जस्त, मोलाब्द, मंगल, ताम्र, लोह इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात, योग्य वेळी व गरजेनुसार द्यावीत.

पाणी व्यवस्थापन

अंजीर झाडाच्या वाढीसोबतच झाडाची पाण्याची गरज वाढू लागते. जमिनीच्या मगदरानुसार भारी जमिनीत ५ ते ६ दिवसांनी, तर हलक्या जमिनीत ३ ते ४ दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे.

फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. फळे पक्व होण्याच्या काळात पाणी योग्य प्रमाणात द्यावे, अन्यथा फळे बेचव बनतात.

जमिनीत जास्त ओलावा टिकून राहिल्यास फळे भेगाळण्याचे प्रमाण वाढते.

अंजीर बागेस पाणी देण्यासाठी खोडाभोवती मोठी आळी किंवा वाफे करण्याची पद्धत आहे. पाणी देत असताना बुंध्यापाशी पाणी साचून राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. यासाठी खोडालगत मातीची भर लावावी. पाणी देण्याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची ५० ते ७० टक्के बचत होते. तसेच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

बहर नियोजनातील महत्त्वाच्या बाबी

बहर घेण्यापूर्वी तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, पाऊस, पावसाचे एकूण दिवस, धुके, गारा, वादळ, वारा या सर्व बाबींचा अभ्यास असणे गरजेचे आहे.

बागेचा जोम प्रभावी राखण्यासाठी संंतुलित खत मात्रा द्याव्या. भरपूर सेंद्रिय खताचा वापर करावा.

बागेत तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर व बचत करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. यासाठी प्लॅस्टिक आच्छादन किंवा पालापाचोळा, उसाचे पाचट, वाळलेले गवत वापरावे.

छाटणीनंतर किंवा पानगळ केल्यानंतर झाडांवर नवीन फूट फुटण्यापूर्वी झाडांच्या फांद्या आणि खोडावर १ टक्का बोर्डो मिश्रणाची (एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी.

बहरासाठी पाणी सुरू करत असतानाच खोडावर व फांद्यावर संजीवकांची फवारणी करावी. त्यासाठी हायड्रोजन सायनामाइड (५० टक्के) २० मिलि प्रति लिटर पाण्यातून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने फवारावे किंवा संपूर्ण झाडास चोळावे. त्यामुळे सर्व सुप्त डोळे फुटतात व झाडांना नवीन पालवी येते.

अंजीर झाडावर येणाऱ्या विविध कीड-रोगांची अचूक ओळख करून घ्यावी. नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार शिफारशीत कीटकनाशके व बुरशीनाकांची योग्य वेळी, योग्य प्रमाणात फवारणी करावी. बागेतील तणांचे वेळीच नियंत्रण करावे.

बागेत एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. मित्र कीटकांचे संरक्षण करावे.

अंजीर बागेस सूत्रकृमींचा उपद्रव आहे की नाही हे प्रत्येक वर्षी तपासावे. त्यासाठी अंजिराच्या मुळ्यांची तपासणी करावी, तसेच माती परीक्षण करून घ्यावे.

अंजीर बागेत सतत ओलावा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याचा अतिरेकी वापर टाळावा.

बागेच्या पश्चिमेस व उत्तरेस वारा प्रतिबंधक झाडे उदा. सुरू, निरगुडी, तुती, करंज, शेवगा, हादगा, पांगारा, बकाना इत्यादीची लागवड करावी.

अंजीर फळांचा टिकाऊपणा वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याकरिता खतांची संतुलित मात्रा द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरदेखील महत्त्वाचा आहे. उदा. जर फळे भेगाळत असतील तर ३० ते ५० ग्रॅम बोरॉन प्रति झाड द्यावे.

फळ वाढीच्या काळात चार ते पाच वेळा चाळणी करण्याची पद्धत आहे. चाळणीनंतर गरजेनुसार खतांचा पुरवठा करून बागेस पाणी देण्यात येते. त्यामुळे फळांचे आकारमान सुधारते व चांगल्या प्रतीची फळे मिळतात.

कीडग्रस्त फांद्या, बांडगूळ, खोडे कीडग्रस्त असल्यास वेळोवेळी काढून नष्ट कराव्यात.

खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी झाडाची खोडे जमिनीपासून २ ते २.५ फुटांपर्यंत मोकळी करावीत. खोडावर गेरूची पेस्ट लावावी. याकरिता १० लिटर पाण्यात ४ किलो गेरू रात्रभर भिजत घालावा.

- डॉ. प्रदीप दळवे, ८९८३३१०१८५

(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प,

जाधववाडी, ता. पुरंदर जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Anudan : दूध अनुदानात २ रुपयांची वाढ पण शेतकऱ्यांऐवजी दूध संघांचा फायदा

Crop Damage : तासगाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

Onion Seed : रब्बी कांदा बियाण्याची चढ्या दराने विक्री

Rain Update : सांगली जिल्ह्यात सरासरीच्या १७३.८ टक्के पाऊस

Satara Rain : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT