Satara News : गाईच्या दुधाला ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रतिलिटर दर मिळावा, दुधाचे थकलेले अनुदान तातडीने मिळावे, तसेच खतांप्रमाणे पशुखाद्यालाही अनुदान द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास प्रतिसाद मिळाला.
बहुतांश दूध संघांतून संकलन झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दहा लाखांवरील दूध संकलन ठप्प झाल्याचा अंदाज आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. २३) कऱ्हाडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून आंदोलन केले.
दूध दरातील घसरण आणि रखडलेले अनुदान यामुळे जिल्ह्यातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. याविरोधात आवाज उठविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात दूध बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनास सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. दूध उत्पादकांसमवेत दूध संकलन करणारे संघही सहभागी झाल्याने ग्रामीण दूध संकलन झाले नाही.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कऱ्हाड येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गाईच्या दुधाला ४० रुपये तर व म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रतिलिटर दर मिळावा, रासायनिक खताप्रमाणे पशुखाद्यालाही अनुदान द्यावे, शासनाने ठोस दूध धोरण तयार करावे, राज्याने दुधाचा स्वतःचा एक ब्रँड विकसित करावा, दुधाला ऊसाप्रमाणे ८०-२० फॉर्म्युला आणून एफआरपी कायदा लागू करावा, दुधामधील खासगी व सहकारी लूटमार विरोधी कायदा करावा,
दूध भेसळ रोखण्यासाठी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीत शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व दूध उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करावा, शासनाकडून दूध उत्पादकांना मिळणारे प्रतिलिटर अनुदान तातडीने दूध उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करावे आदी मागण्या करण्यात आल्या. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामभाऊ साळुंखे, बापूराव साळुंखे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
तीन महिने अनुदान रखडले
आचारसंहितेमुळे दुधाचे अनुदान मिळालेले नव्हते. त्यातच नवे मंत्रिमंडळ स्थापन होण्यास वेळ लागल्याने दूध दराच्या व अनुदानाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शासनाने जाहीर केलेले सात रुपये प्रतिलिटरप्रमाणे दूध अनुदान ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले असून ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनात शेतकऱ्यांनीही सहभागी होत रोष व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.