Nagar News : दुष्काळ सदृश जाहीर केलेल्या महसूल मंडलांत शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून कर्जवसुली करण्याला सहकार विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता उसाच्या रकमेतून सेवा सहकारी सोसायट्या, बॅंकांना वसुली करता येणार नाही.
नाशिक विभागाचे विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांनी जिल्हा सहकारी बॅंकेला तसे पत्र दिले आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसबिलातून होणाऱ्या कर्जवसुलीबाबत सतत तक्रार केली होती.
साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. जिल्हा सहकारी बॅंकेने दिलेल्या एकूण कर्जाच्या साधारण ८० टक्के कर्ज ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतले आहे. कर्जपुरवठा झाल्यानेच उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचा दावा जिल्हा सहकारी बॅंकेने केला आहे. शेतकरी मात्र ऊस कार्यक्षेत्राएवजी अन्य कारखान्यांना देत असून हे कारखानेही त्याबाबतच्या रकमेच्या याद्या विकास सेवा सहकारी सोसायट्यांना न दाखवता परस्पर रोखीने पैसे देत आहेत.
त्याचा परिणाम सहकारी संस्थेच्या वसुलीवर होत आहे. त्यामुळे उसाच्या रकमेतून कर्ज वसूल करण्याला सहकार्य करावे, अशी मागणी जिल्हा सहकारी बॅंकेने विभागीय सहनिबंधकांकडे केली होती. दरम्यान, दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यात व मंडलांत शेतीशी संबंधित कर्ज वसुलीला स्थगिती देण्यासंदर्भात शासनाचे आदेश आहेत.
त्यामुळे उसाच्या पैशातून कर्ज वसुली करू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल औताडे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा सहकारी बॅंक व प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे सातत्याने केली.
त्यानुसार कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नाशिक विभागाच्या विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयानुसार राज्यातही असा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत शेतकऱ्यांकडून शेतीशी निगडित कर्जाची वसुली सुरूच होती. आता नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांनी आदेश दिल्याने कर्जवसुली थांबेल. मात्र शासनाच्या आदेशानंतरही वसुली करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी, या बाबत मागणी करत आम्ही पोलिसातही तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत.- अनिल औताडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.