नगर - कोरोना संकटाच्या दोन वर्षांच्या काळात पतींच्या निधनाने अंदाजे ८० हजार महिला एकल (Single woman) झाल्या. या महिलांना आधार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या (Ekal Mahila Punarvasan Samiti) पुढाकारातून साधारणपणे ४० हजारांपेक्षा अधिक महिलांना संकटकाळात आधार मिळाला आहे.
आतापर्यंत एकल महिलांच्या मुलांसाठीच्या योजनेतील रकमेत वाढ झाली. दीडशेपेक्षा अधिक महिलांना रोजगाराचे साधन (Employment tools for women) मोफत उपलब्ध करून दिले. बचतगटांत सहभागासह पाच महिलांना नवीन बचतगट करता येईल, या बाबतचा अध्यादेश निघाला. मुलांनाही आर्थिक आधार मिळाला आहे. या महिलांत बहुतांश ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबांतील महिलांचा समावेश आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona In Maharashtra) मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. त्यात तरुणांचा अधिक समावेश होता. एकूण दीड लाख मृत्यूंपैकी ६० टक्के म्हणजे साधारण ८० हजार पुरुषांचा मृत्यू झाला. त्यात २२ टक्के महिला ५० वर्षे वयाच्या आतील आहेत. कोरोनाने एकल झालेल्या महिलांना एका संस्थेतर्फे आर्थिक मदत दिली जात होती. त्याचे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे काम सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्याकडे होते. या निमित्ताने त्यांचे अशा महिलांशी थेट बोलणे होते होते. त्यातून एकल महिलांची वास्तवता समोर आली. त्यांना मदत करण्यासाठी समिती तयार करण्याची संकल्पना मांडून समाज माध्यमांवर आवाहन केले. त्यानुसार दोन दिवसांत राज्यभरातून सुमारे १९० संस्थांनी काम करण्याची तयारी दर्शवली.
२५ जून २०२१ रोजी कोरोना एकल पुनर्वसन समिती करून राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, नगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांत काम सुरू केले. सध्या ८१ जिल्ह्यांत १०० संस्थांचे प्रतिनिधी काम करत आहेत. महिलांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी नीलम गोऱ्हे, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, रूपाली चाकणकर यांच्यासोबतच ऑनलाइन, तर अजित पवार यांच्यासोबत थेट बैठक झाली. महिला व बालकल्याण विभाग विधवा महिलांच्या मुलांसाठी असलेल्या बालसंगोपन योजनेतून ४५० रुपये प्रतिमहिना एका बालकांसाठी देत होते. समितीच्या पुढाकारातून ११०० रुपये व आता नवीन अर्थसंकल्पात २५०० रुपये झाले आहेत. दोन मुलांपर्यंत लाभ मिळू लागला आहे. एकट्या नगर जिल्ह्यात ६ हजार, तर राज्यातील ४२ हजार मुलांना हा लाभ मिळतो आहे. नगर जिल्ह्यात हनीफ शेख यांच्या पुढाकारातून समिती त्या-त्या तालुक्यांत जाऊन माहिती घेतेय.
राज्यात विविध संस्था, संघटना व वैयक्तिक मदतीतून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारी साधने मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. आतापर्यंत १५० पेक्षा अधिक महिलांना शेळ्या, पिठाची गिरणी, शिलाई मशिन यासह इतर वेगवेगळी रोजगार देणारी सुमारे ४० लाखांच्या साहित्याचे वाटप केले आहे. कोरोना काळात पतीवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांनी जास्तीचे बिल वसूल केल्याच्या १८०० महिलांनी आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यात तथ्य आढळलेल्या काही रुग्णालयांकडून सुमारे १० लाखांची वसुलीही समितीने करून दिली आहे.
समितीच्या पुढाकारातून तरुणपणात आधार हरवलेल्या ८ महिलांचे विवाह झाले आहेत. नगरमध्ये अशोक कुटे हे विवाह जुळवण्याचे काम करणारी मराठा सोयरिक संस्था चालवतात. त्यांच्या पुढाकारातून एकल महिलांत कोणाची लग्न करायची तयारी आहे का, या बाबत अर्ज भरून घेतले होते. त्यानुसार २७ महिलांनी तयारी दर्शवली. तर या एकल महिलांशी विवाह करण्याची २५० तरुणांनी तयारी दर्शवली.
सध्या राज्यात नेमक्या किती महिला एकल आहेत. त्यांची काय परिस्थिती आहे, या बाबत माहिती नाही. त्यामुळे सर्वच एकल (विधवा) महिलांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण ठरवणे गरजेचे आहे. सध्यातरी त्यांच्यासाठी कोणतीही खास योजना नाही. कोरोना एकल समिती त्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करेल.हेरंब कुलकर्णी, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, महाराष्ट्र
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.