Ethanol production Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : साखर उद्योगाचा केंद्रावर दबाव टाकण्याचा प्रयत्न

Sugar Industry : केंद्राने उसाचा रस, सिरप व साखरेपासून इथेनॉल तयार करण्यावर निर्बंध आणल्‍यानंतर साखर उद्योग खडबडून जागा झाला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : केंद्राने उसाचा रस, सिरप व साखरेपासून इथेनॉल तयार करण्यावर निर्बंध आणल्‍यानंतर साखर उद्योग खडबडून जागा झाला आहे. या निर्णयाने साखर उद्योगावर विपरीत परिणाम होणार हे स्‍पष्ट झाल्याने अनेक संघटना आता यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्‍यता आहे.

हंगाम सुरू होण्‍याआधी हा निर्णय घ्‍यायला हवा होता, अशी उद्योगाची धारणा आहे. गेल्या काही वर्षांपासून केंद्र साखर उद्योगाचे निर्णय उशिरा घेत असल्‍याने नुकसान होत असल्‍याचा साखर कारखानदारांच्या संघटनांचा आरोप आहे.

विशेष म्हणजे केंद्राच्या या धोरणाला शेतकरी संघटनांनीही विरोध करत निषेध व्‍यक्त केला आहे. शेतकरी संघटनांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून बंदी मागे घेण्याची विनंती केली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत साखर कारखानदारांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी मोदी, शहा यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची मागणी करणार आहेत.

केंद्राच्या धोरणाविरोधात टीका होऊ लागल्यानंतर अधिकार पातळीवरून मात्र सरकार कायमस्वरूपी हा निर्णय ठेवेल, अशी शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. साखर उत्‍पादन चांगले झाले तर कदाचित या निर्णयाबाबत फेरविचार होऊ शकतो. विविध विभागांचे सचिव साखर उत्पादन व विक्री यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

याबाबतच्या बैठका दर आठवड्याला होत आहेत. यामुळे उसाचा रस, सिरप व साखरेपासून इथेनॉल तयार करण्याबाबत निर्बंध काही प्रमाणात शिथिल होऊ शकतात, असे असले तरीही जोपर्यंत अपेक्षित साखर उत्पादनाची खात्री पटत नाही, तोपर्यंत तरी या निर्णयावर शासन कायम असेल, असेही अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

साखर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देश व राज्यपातळीवरील अनेक संघटनांनी केंद्राला तातडीने पत्र लिहून या निर्णयाबाबत नाराजी व्यक्‍त केली आहे. तसेच सध्या उसाचा रस, सिरप व साखरेपासून तयार झालेले जे इथेनॉल आहे व ज्याचा अद्याप तेल कंपन्यांशी करार झालेला नाही, या इथेनॉलचे काय करायचे, असा प्रश्‍नही संघटनांना भेडसावत आहे. हा निर्णय हंगाम सुरू होण्यापूर्वी घेतला असता तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान वाचले असते, असेही उद्योगाने म्हटले आहे.

‘बी हेवी मोलॅसिस’ इथेनॉलची किंमत वाढविण्याची मागणी

या संघटनांनी प्रत्येक कारखान्याकडे इथेनॉलचा साठा किती आहे, याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. काही संघटनांनी बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत वाढवावी, अशीही मागणी केली आहे.

राज्यातील करार झालेल्या इथेनॉलची स्थिती

इथेनॉल प्रकार...झालेले करार (कोटी लिटर)...टक्केवारी

उसाचा रस, सिरपपासून तयार इथेनॉल...५२.२१...५८

बी हेवी मोलॅसिस...३५.४५...४०

सी मोलॅसिस...०.२०...०.२२

खराब अन्‍नधान्‍य...२.०१...२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT