Cotton Storage Bag Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Storage Bags: कापूस हंगाम संपताना स्टोअरेज बॅग वाटप; स्मार्ट प्रकल्पाचा स्मार्ट निर्णय?

Smart Cotton Project: स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना कापूस वेचणी आणि साठवणीसाठी स्टोअरेज बॅग दिल्या जाणार होत्या. मात्र, निकषांवर न बसलेल्या या बॅग अखेर हंगाम संपताच वाटप केल्या गेल्या. त्यामुळे या वाटपाचा उद्देश काय, यावर शंका घेतली जात आहे.

 गोपाल हागे

Akola News: गेले काही दिवस राज्यात गाजत असलेले स्मार्ट (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) कॉटन प्रकल्पातील कॉटन पिकिंग व कॉटन स्टोअरेज बॅग प्रकरण आता गुंडाळण्याचे गुपचूप प्रयत्न सुरू झाले आहेत. निकषानुसार साहित्य पुरवठा झाला नसल्याच्या कारणाने गेले काही दिवस राज्यातील जिल्ह्यांत साहित्य पडून होते.

मात्र आता तालुक्यांना साहित्य रवाना करून प्रकल्पातील शेतकऱ्यांना यातील कॉटन स्टोअरेज बॅग वितरीत करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांच्या निर्देशानुसार हे साहित्य वाटपासाठी स्थानिक यंत्रणा राबवण्यात आल्याची चर्चा आहे.

यंदा स्मार्ट कॉटन प्रकल्पात सहभागी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस वेचण्यासाठी आणि तो साठविण्यासाठी पिशव्या देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार डीबीटी (थेट लाभ हस्तांतर) न करता थेट खरेदी व पुरवठा करण्यात आला. खरेदी दरांवरूनही मध्यंतरी प्रश्‍न उपस्थित झाले होते. शिवाय पुरवठा केलेल्या या साहित्याचा दर्जा तपासला असता तो निकषानुसार नसल्याची बाब ‘सिरकॉट’च्या (सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्‍नॉलॉजी) अहवालातून तेव्हा समोर आली होती.

त्यामुळे हे साहित्य जिल्हा स्तरावर गेले काही दिवस पडून होते. मात्र, आता एका प्रायव्हेट कंपनीने दिलेल्या अहवालाचा दाखला देत गेल्या आठवड्यात अचानक काही घडामोडी होऊन पडून असलेल्या पिशव्या मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समोर आले. वास्तविक, कापूस हंगाम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. साधारणतः डिसेंबरमध्ये पिशव्या उपयोगात आल्या असत्या. अशा स्थितीत या पिशव्या शेतकऱ्यांच्या किती उपयोगी पडतील, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

या प्रकल्पात सुरुवातीला असलेला सहभाग आता तितकासा राहिलेला दिसत नाही. केवळ औपचारिकता वाढत चालल्याचे लपून राहिलेले नाही. मागील काही हंगामात कापूस गाठी बऱ्यापैकी तयार होऊन शेतकऱ्यांनी विक्री केल्या. यंदा किती कापूस गाठी तयार होतील, याचा अद्याप काही अंदाजही समोर आलेला नाही. अशा स्थितीत आता हंगाम संपायला आलेला असताना या कापूस साठवणूक पिशव्या कोणत्या उद्देशाने वितरित केल्या गेल्या, हा प्रश्‍न आहे.

पुरवठा केलेले साहित्य वितरित झाल्याचे दाखवून संबंधित रखडलेले देयक मार्गी लावण्याचा तर हा प्रकार नाही ना असे कृषी खात्यातील जाणकार शंका उपस्थित करीत आहेत. सुरुवातीला निकषानुसार साहित्य नसल्याचे कारण देणारी यंत्रणा नंतर तेच साहित्य शेतकऱ्यांच्या माथी कुठल्या कारणाने मारायला तयार झाली, हेही आता गुपित राहिलेले नाही. या प्रकरणात वरिष्ठस्तरावरून मोठ्या घडामोडी झाल्याची चर्चा आहे.

मध्यंतरी क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता हंगाम संपत आल्याने याचा वापर काय होणार, असे वरिष्ठांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही वाटपाबाबत वरिष्ठांच्या सूचना आल्याने हे साहित्य शेतकऱ्यांना पोहोचवून देण्यात आले. दोनच दिवसांत मोहीमस्तरावर वाटप पूर्ण करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशापुढे जिल्हा व क्षेत्रीय यंत्रणा हतबल दिसून येत आहेत.

पुढील हंगामासाठी दिल्या का पिशव्या?

कापूस हंगाम जेमतेम शिल्लक असताना आता कृषी खात्याने वितरित केलेल्या या पिशव्या पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना दिल्या काय, असा प्रश्‍न कृषी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित केला. जर वितरितच करायच्या होत्या, तर डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना हे साहित्य मिळाले असते, तर थोडा फायदा झाला असता. आता देऊन शेतकऱ्यांनी त्या पिशव्या पुढील वर्षी वापरायच्या का, असाही मुद्दा या निमित्ताने उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT