Solapur News : यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यानंतर पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ६ लाख ६९ हजार १६४ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. तसेच आता आज (ता. ३१) विमा भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामातील पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा भरण्यासाठी आधी १५ जुलैची मुदत देण्यात आली होती. परंतु ई-सेवा केंद्रावरील वाढती गर्दी, सर्व्हरडाउनची समस्या आणि कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे मुदतीत पीकविमा भरला जाऊ शकणार नव्हता. त्यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार ३१ जुलैपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. त्यामुळे या पंधरवड्यात पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. गत आठवडाअखेर जिल्ह्यातील ६ लाख ६९ हजार १६४ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. यात दोन हजार ४५ कर्जदार, तर सहा लाख ६७ हजार ११९ बिगर कर्जदार शेतकरी आहेत.
गेल्या वर्षी जिल्ह्यात सात लाख १ हजार ६४० शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. पण गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३२ हजार ४७६ इतकी संख्या कमी झाली आहे. पण उद्या शेवटचा दिवस असल्याने ही संख्या आणखी वाढू शकते.
जिल्ह्यात बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घ्यावा, यासाठी आम्ही जनजागृती केली आहे. उर्वरित मुदतीत ही संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.- दत्तात्रेय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.