Uran News : आगरी कोळी समाजात तांदळाच्या पिठाची उकड घेऊन पाण्यावर थापलेल्या पांढऱ्या शुभ्र, मऊसूत भाकरीची शुभ कार्यात एक वेगळीच शान आहे. आगरी लग्नसंमारंभात भाकरी व पोळ्यांना अधिक महत्त्व आहे.
मात्र, आजच्या काळात उकडीच्या इतक्या मोठ्या प्रमाणात भाकऱ्या बनवणे सोपे नसल्याने उरण, पनवेल, पेण, अलिबाग, नवी मुंबई परिसरातील लग्नसराईमुळे महिला बचत गटांना रोजगाराचे नवे साधन मिळाले आहे.
‘अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर’, ही बहिणाबाईंची प्रसिद्ध कविता सर्वपरिचित आहे. मात्र घरापुरत्या मर्यादित असणारा भाकरीने आता विस्तृप्त स्वरूप घेतले आहे.
खरे पाहता मानवी आयुष्य हे भाकरी भोवतीच फिरते, मात्र हीच भाकरी व पारंपारिक तांदळाचे पोळे महिलांसाठी वरदान ठरली आहे. कारण यामुळे अनेक महिला सक्षम बनल्या असून त्यांच्या कुटुंबाला देखील आधार देत आहेत.
१० ते १५ हजारांची महिन्याकाठी कमाई
१) गावोगावी अनेक महिला बचत गट आहेत. या बचत गटांना ऑर्डर मिळत असल्याने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.
२) प्रत्येक महिला भाकरी मागे महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये कमवत आहे. त्याचप्रमाणे पोळे देखील दहा ते बारा रुपयांना मिळत आहेत. खापरीवर करणाऱ्या चविष्ट भाकरीला मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे.
३) या महिला एकत्र येऊन हसत खेळत भाकऱ्या करत असल्यामुळे महिला बचत गटाच्या महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दिवसाला ३०० भाकऱ्या
आगरी, कोळी लग्न व साखरपुड्यामध्ये मटण-भाकरी तसेच सकाळी लग्नाला सुकट व पोळ्याचा बेत असतो. मात्र, उकडीची भाकरी जितकी खाण्यासाठी चविष्ट असते. तितकी बनवण्यासाठी किचकटीचे काम असते.
घरात लग्न समारंभ किंवा साखरपुडा असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात पोळे व भाकऱ्या बनवणे घरातल्या गृहिणींना शक्य होत नाही. त्यामुळे महिला बचत गटांना लग्न समारंभासाठी तसेच हळदी साखरपुड्यासाठी पोळे व भाकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत.
पूर्वी गावातील सर्व नातेवाईक महिला एकत्र येऊन पोळे व उकडीच्या भाकऱ्या करीत असतात. मात्र आता परिस्थिती बदलत असल्याने बचत गटांच्या माध्यमातून ऑर्डर देण्यात येते. या माध्यमातून चार पैसे मिळत असल्यामुळे महिला देखील मोठ्या आनंदाने करत आहेत.- नूतन पाटील, भाकरी विक्रेत्या
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.