Rural Wedding Ageowon
ॲग्रो विशेष

Rural Wedding : गावच्या लग्नातला सोयरीक जुळवणारा मध्यस्थी कुठे गेला?

Wedding Season : धडे मास्तर म्हणजे अवलिया माणूस. एक चालते बोलते वधू-वर सूचक केंद्रच. सोयरिकी जमवणे हा त्यांचा छंद नव्हे ध्यास होता. गावातल्या झेडपीच्या शाळेत गेली दोन दशके टिकून असलेले ते एकमेव मास्तर होते.

Team Agrowon

समीर गायकवाड

Indian Agriculture : गावात पूर्वी कुणाच्याही दारापुढं लग्नाचा मंडप असला की त्यात ठरावीक दृश्ये दिसायची. लग्नघराच्या दरवाजाच्या दोन बाजूस रंगवलेले भालदार चोपदार, घड्या पडलेल्या अधूनमधून बारीक ठिगळे लावलेल्या चकाकत्या कापडाच्या कनाती, गोंगाटसदृश आवाज करणारे भोंगे, मंडपाच्या छतातून डोकं वर काढणारे ओबडधोबड वासे, त्यातल्याच एखाद्या वाशाला बांधलेलं देवक.

मांडवात गलका करणारी खंडीभर पोरं असत. त्यात कुलवऱ्यांचा कलकलाट भर टाकी. लालगुलाबी शालवजा चादर अंगावर पांघरलेला, कुंकवावर चमकीचा मळवट भाळी भरलेला नवरदेव हाती कट्यार घेऊन दिसे, तर लग्नघरातल्या एखाद्या अंधारलेल्या खोलीत हिरव्यापिवळ्या साडीवर पांढरं शुभ्र व्हलगट पांघरून बसलेली नवरी दिसे.

परसदार मोठं नसलं तर अंगणातच एखादा सारवलेला कोपरा बळकावून अख्खा मुदपाकखाना थाटला जाई. तिथली पातेली इतकी मोठी असत की त्यात बसून राखुंडी लावून घासली जावीत. दगडांच्या चुलीवरच्या कढया, वगराळे, पंचपाळे, वावभर लांबीचे उलथणे, पळ्या, भातवाड्या अशी सामग्री पडलेली असे.

गावातलाच कुणीतरी पाककलाप्रवीण पुरुष आचारी म्हणून तिथं असे; जो तेलकट झाक असलेला लालकाळ्या रंगाचा लोखंडी झाऱ्या हातात घेऊन बुंदी पाडताना दिसे.

याशिवाय वरमाईचा ताठा, वधूपित्याचा दीनवाणा अवतार, अकारण गुर्मी दाखवणारे नवरदेवाचे ‘मैतर’, निळ्या शाईच्या मार्किंगसह कंपनीचा जाहिरातवजा मजकूर स्पष्ट दिसणारं नवंकोरं धोतर-सदरा नेसलेले सोयरेधायरे, इकडून तिकडं येजा करत आपल्या दागिन्यांचा अन चकाकत्या शालूचा टेगार मिरवणाऱ्या ढालगज नटव्या, ‘नवऱ्यामुलीस मामाने लवकर मांडवात आणावं’ याचा एकसारखा हाकारा करणारे तुंदिलतनु भटजी बुवा आणि येईल त्याच्यावर आपली छाप पाडण्यात व्यग्र असलेले काही फुकटचंबू आप्तेष्ट हे ठरलेले असत. या सर्वांशिवाय आणखी एक समान धागा गावाकडच्या लग्नात असे तो म्हणजे नारायण धडे!

लग्नमंडपाच्या कोपऱ्यात कुठेतरी सतरंजी नाहीतर जाजम अंथरलेलं असे. लग्न मोठ्या घरचं असलं की सतरंजीऐवजी खुर्च्या असत. जेवणावळी उरकल्या की इथं बैठक बसलेली असे. आजूबाजूची प्रतिष्ठित म्हातारीकोतारी माणसं गराडा घालून बसलेली दिसत. मधोमध धडे मास्तर. त्यांच्या एका हातात अडकित्ता अन् दुसऱ्या हातात सुपारीची खांडे.

सुपारी कातरत तिचे वाटप करत त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू असे. कुणाच्या घरी काय भानगड झाली, कुणी दुसरी बायको केली, कुणी बायकोला माहेरी सोडलं, कुणी काडीमोड घेतला, कुणाच्या घरची पोर न्हातीधुती झाली, कोण हुंड्यासाठी अडून बसलं, कुणी कुणाचे पाय धरले, कुणाची फजिती झाली, कुणाचा बेंडबाजा वाजला, कुणाच्या बायकोने नांदणं सोडलं अशा सगळ्या गप्पा असत. मध्येच ‘दे टाळी’चा गजर होई, ‘ये बाब्बाव’चा पडघमही घुमे.

धडे मास्तर म्हणजे अवलिया माणूस. एक चालते बोलते वधू-वर सूचक केंद्रच. सोयरिकी जमवणे हा त्यांचा छंद नव्हे ध्यास होता. गावातल्या झेडपीच्या शाळेत गेली दोन दशके टिकून असलेले ते एकमेव मास्तर होते.

त्यांच्या बदलीची कुणकुण लागली तरी बेरकी मंडळी पुढाऱ्यांच्या धोतराचा कासोटा धरून बसत आणि ‘अजून अमक्या तमक्याच्या अंगाला हळद लागेपर्यंत तरी मास्तरांना राहू द्यावं’ यासाठी गळ घातली जाई. तेव्हा नियमांची अंमलबजावणीही कठोर होत नव्हती. धडे शिक्षक म्हणून गावात रुजू झालेले आणि गावाचे जावई झालेले. त्यामुळे गावाचा त्यांच्यावर विशेष जीव.

शाळेतली पोरंटोरंदेखील त्यांच्यावर फिदा असत. मराठीचे हे मास्तर प्रसंगी गणितापासून इतिहासापर्यंत सगळे विषय शिकवत. कधी शिपाई आला नाही तर शाळेच्या भोवताली लावलेल्या झाडाझुडपांना पाणी घालण्यात कमीपणा मानत नसत.

डबा न आणलेल्या एखाद्या कास्तकाराच्या पोरास आपल्या तीनताळी डब्यातलं धिरडं, पिठलं देत. हे रोजच होई. धडे मास्तर जितके हळवे होत तितकेच वेळप्रसंगी कठोरही होत. गोष्टी सांगणारे, डोक्यावरून मायेचा हात फिरवणारे धडेमास्तर पोरांचेही लाडके होते.

मास्तरांचं व्यक्तिमत्त्व थोडं हटकं होतं. मातीच्या ढेकळात पावसाचे थेंब जिरावेत इतक्या सहजतेने ते कुणातही मिसळत. अंगात काहीसा ढगळ पायजमा नेहरूशर्ट, डोईवर गांधी टोपी. सगळं साधंच पण स्वच्छ धवलशुभ्र असे. किंचित फेंदारलेलं नाक, वर आलेली गालफाडे, जाड भुवया, मिचमिचित डोळे, जाडजुड काळेजांभळे राठ ओठ, चपटी हनुवटी.

सरळ रेषेतल्या चार आठ्या कपाळावर कोरलेल्या, त्यावर गोपीचंद अष्टगंधाचा टिळा. बोलताना लकालका हलणाऱ्या कानाच्या पातळ लंबूळक्या पाळ्या. असं सगळं रुपडं. उजव्या हाताच्या करंगळीत नागाच्या आकाराची तांब्याची अंगठी अन् तर्जनीत एक चांदीची अंगठी. त्यातला मोती काळपट झालेला. धडेंचे ओठ पाहावे तेव्हा पानाने रंगलेले.

पानाचा तोबरा डाव्या गालफडात ठेवून त्याला जिभेचे टेकण लावत दिवसभराच्या पानविड्यांची बांधणी करणे हा त्यांचा आवडता उद्योग. दाबून तेल पिलेली, कराकरा वाजणारी अस्सल चामड्याचं कोल्हापुरी पायताणं पायांत असत. भरभक्कम देहयष्टी असलेल्या धडेंचा पाय कुणाच्या पायावर पडला तरी त्याची बोटे जायबंदी व्हावीत इतक्या त्या वहाणा वजनदार होत्या.

धडे कुठेही बाहेर पडले, की त्यांच्या बगलेत एक लेदरची हँडबॅग असे. यात स्टीलचा पानपुडा असे. त्यातलंच पान काढून बेताने देठ खुडत त्याला मांडीवर पालथेउताणे करत ते समोरच्या व्यक्तीकडून सोयरिकीची माहिती घेत. पानावर असलेल्या शिरांच्या नेमक्या मधोमध अंगठ्याने चुना लावत त्याच्या घरादाराची माहिती घेत.

काताची भुकटी, कातरलेल्या सुपारीच्या वळ्या पानात टाकत डाव्या हाताने खिशातली डायरी काढत. घडी घालून दुमडलेलं पान तोंडात कोंबलं, की मोठ्याने जबडा हलवत खिशाला लावलेलं पेन काढून सुबक अक्षरात ते त्या माहितीचं टिपण करीत. धडेंच्या खिशात अशा ‘बारकाल्या’ चारपाच डायऱ्या सहज राहत. त्यातली सगळी माहिती अशीच.

नावगाव, पत्ता, नाकनक्षा, वय, कामकाज, अपेक्षा, गोतावळा, सोयरेधायरे याची जंत्री त्यात असे. विशेष गोष्ट अशी की डायरीतली सगळी माहिती त्यांना तोंडपाठ राही. कुणाचा कोण हे सगळं ध्यानात ठेवत ते अचूक विषय काढीत.

म्हणूनच लग्नाच्या मांडवात बसलेले धडे मास्तर सगळ्यांच्या उत्सुकतेचा, जिव्हाळ्याचा विषय असत. त्यांनी दिलेली सोयरिक डोळे झाकून केली जाई. तेदेखील छाती ठोकून सांगत, ‘अरे, मी मध्यस्थ आहे बाबा, पॉर नव्हं काळजाचा दिवा देताय, हा धडे मास्तर पोराची हमी देतो बाबा. तुम्ही नुसतं होय म्हणा, देण्याघेण्याचं मी बघून घेतो !’ आणि धडे मास्तर तिकडे जाऊन वरपक्षाला देण्याघेण्याच्या मागणीवरून खरेच वाकवत.

दोन्ही बाजूंची माणसं त्यांचा शब्द प्रमाण मानत. लोक लांबून लांबून त्यांच्याकडं येत. ‘आपल्या घरी यंदा कर्तव्य आहे तेव्हा तुम्ही जरा मनाजोगतं स्थळ शोधून द्या’ अशी गळ घालत. मिठास वाणीचे धडे कुणाला नाराज करत नसत. प्रत्येकासाठी त्यांच्याकडे काहीतरी पर्याय निघे.

मुलगी बघायला जाण्याच्या दिवसापासून बैठक बसताना, याद्या करताना, सुपारी फोडताना, साखर वाटताना आणि मांडवात अक्षता पाडताना धडेंना विशेष मान राही. दोन्हींकडची माणसं इकडून तिकडे निरोप पाठवताना वा काही मागणी मांडताना त्यांना मध्ये घेत. ते देखील चुटकीसरशी ही कामे करत. या सगळ्याच्या मोबदल्यात त्यांना मांडवात भर आहेर होई. काही जण जबरदस्तीने खुशी म्हणून रोख रक्कम देत.

धडेंच्या अशा लौकिकामुळे त्यांच्या भवतीने लालपिवळ्या रेशमी फेटेवाल्यांचा, परिटघडीच्या टोप्यांचा सुकाळ असे. असं असलं तरी धडेंचं खासगी आयुष्य मात्र आलबेल नव्हतं. बायको सतत हुज्जत घालायची. संसारात लक्ष द्या, म्हणून कानीकपाळी ओरडायची. दोन मुलं होती, त्यांना शिक्षणात रुची नव्हती.

स्वभावाने घुमी असणारी मुलगी घरकामात हुशार होती, पण तिच्यात अंगभूत तुसडेपण होतं. कैकांचा संसार मांडणाऱ्या धडेंना आपल्या संसाराच्या मखमली शेल्यावर भरजरी नक्षी जमली नाही. त्या शेल्याची गोधडी कधी झाली हेदेखील कळले नाही.

निवृत्त झालेले धडे आता घराबाहेर पडत नाहीत. ज्यांच्याशी त्यांच्या घराण्याचा सवतासुभा होता त्यांच्या मुलाशी धडेंच्या मुलीने हट्टाने लग्न केलंय. पोरीने भावकीत नाक कापलं म्हणून त्यांनी घरात कोंडून घेतलंय. लोकही त्यांना काहीसे विसरलेत कारण कुणाच्याही पोरापोरीची कुणी छाती ठोकून हमी घ्यावी, असा काळ आता मागे सरलाय. मध्यस्थच जणू अस्त पावलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT