ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायींच्या (Snail) प्रादुर्भावामुळे नुकसान (Crop Damage) झालेल्या शेतकऱ्यांना ९८ कोटी ५८ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनापासून गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत होती. अखेर सरकारने तीन जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी मदत देण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक ९२ कोटी ९९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
यंदाच्या हंगामात राज्यात अंदाजे ४८.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाल्याचा अंदाज आहे. मागील वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने लागवडीखालील क्षेत्र दोन लाख हेक्टरहून अधिक वाढले आहे. मात्र यंदा अतिवृष्टी आणि गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीनला तडाखा बसला आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. सरकारी यंत्रणेने पंचनामे केल्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषात बसत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. सरकारने नुकत्याच केलेल्या वाढीनुसार १३ हजार ३०० रुपयेप्रमाणे प्रति दोन आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये लातूर जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळणार असून, यात दोन हेक्टरपर्यंत बाधित ९२ हजार ६५२ शेतकऱ्यांच्या ५९ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रासाठी ८१ कोटी २७ लाख, ८४ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर बीडमधील १२ हजार ९५९ शेतकरी या निकषात बसत असून, ३८२२. ३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यापोटी ५ कोटी १९ लाख ८४ हजार, तर उस्मानाबादमधील ४०१ शेतकऱ्यांना २८३. ८३ हेक्टर क्षेत्रासाठी ३८ लाख सहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. लातूरमधील तीन हेक्टरच्या मर्यादेच्या निकषातील १२ हजार ९८४ शेतकऱ्यांच्या ८६२०.७० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ११ कोटी ७२ लाख, ४२ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
अशी मिळणार मदत
बाधित शेतकरी - क्षेत्र - मदत (लाखांत)
बीड : १२९५९ - ३८२२- ५१९. ८४
लातूर : ९२६५२- ५९७६४-८१२७.९४
उस्मानाबाद : ४०१-२८.३-३८.६
(दोन ते तीन हेक्टर)
लातूर : १२९८४-८६२०.७०- ११७२.४२
बीड जिल्ह्यात १४ हजार हेक्टरपेक्षा क्षेत्र बाधित आहे, तरीही केवळ ३८२२ हेक्टर क्षेत्र बाधित दाखवले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात केवळ दोन कोटी ५९ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. सरकार अर्धवट माहिती समोर आणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. त्यामुळे या क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे.
- धनंजय मुंडे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.