Bedana Midday Meal Agrowon
ॲग्रो विशेष

School Nutrition Diet : पूरक आहारातील बेदाणा कागदावरच

Raisin School Nutrition Diet : प्राथमिक शिक्षण संचालनालय विभागाने काढून अकरा महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र बेदाणा खरेदी करण्याची प्रक्रिया, निकष जाहीर केले नाहीत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबत बेदाण्याचा पूरक आहारात समावेश केला आहे. विद्यार्थ्यांना पूरक आहारातील बेदाणा द्या, असे पत्रही प्राथमिक शिक्षण संचालनालय विभागाने काढून अकरा महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र बेदाणा खरेदी करण्याची प्रक्रिया, निकष जाहीर केले नाहीत. तसेच यासाठी लागणारा निधीच शिक्षण विभागाने उपलब्ध केला नाही. त्यामुळे पूरक आहारातील बेदाणा कागदावर राहिला आहे.

राज्यात विद्यार्थ्यांची संख्या ९८ लाख ९२ हजार ८७७ इतकी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. शालेय पोषण आहारात बेदाणा समाविष्ट करण्याची मागणी द्राक्ष संघासह विविध संघटनांनी केली. त्यानुसार ऑगस्ट २०२३ मध्ये बेदाणा पोषण आहारात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

परंतु तब्बल पाच महिन्यांनंतर प्राथमिक शिक्षण संचालनालय विभागाने फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पूरक आहारात बेदाण्याचा समावेश करण्याबाबतचे पत्र जारी केले. विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा फळे, सोयाबिस्किटे, दूध, चिक्की, राजगिरा लाडू, गूळ शेंगदाणे पूरक आहार म्हणून दिला जातो. या आहारासोबत आठवड्यातून एकदा बेदाणा देण्याचे निर्देशही दिले. त्यामुळे बेदाणा उद्योगाला चालना मिळणार असल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

राज्यात बेदाण्याचे सुमारे दोन लाख टन बेदाण्याचे उत्पादन होते. त्यापैकी सांगली जिल्ह्यात सुमारे ९० टक्के बेदाणा तयार होते. पूरक आहारात बेदाण्याचा समावेश झाल्याने याचा प्रत्यक्षात फायदा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. बेदाण्याला नवीन बाजारपेठ उपलब्ध होणार असून, बेदाण्याचा उठावही होण्यास मदत होईल. वास्तविक पाहता, पूरक आहारात बेदाण्याचा समावेश करून अकरा महिन्यांचा काळ लोटला. मात्र शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना बेदाणा देण्याबाबत कसल्याही प्रकारच्या हालचाली केल्या नसल्याचे चित्र आहे.

शिक्षण विभागाने जरी, पूरक आहारात बेदाण्याचा समावेश केला असला, तरी शासनाच्या उदासीनता आणि शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना बेदाणा मिळण्याची आशा धूसर बनू लागली आहे. परंतु फेब्रुवारीच्या मध्यापासून नवा बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होईल. त्यामुळे नव्या हंगामापासून विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून बेदाणा मिळणार का, असा सवाल बेदाणा उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.

विद्यार्थ्यांना किती बेदाणा मिळणार

राज्यात ९८ लाख ९२ हजार ८७७ इतकी विद्यार्थ्यांची संख्या आहे. या प्रत्येक विद्यार्थ्याला किती ग्रॅम बेदाणा देणार आहेत. या बाबत अद्यापही शिक्षण विभागाने स्पष्ट केले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेकडील शिक्षण विभागानेही प्रत्येक विद्यार्थ्याला किती बेदाणा द्यावा लागणार आहे, याची माहिती घेण्याची कसलीच तसदी घेतली नाही. या बाबत माहितीचीही स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही. त्यामुळे शालेय विभाग हा निर्णय कधी घेणार याकडे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

निधीची उपलब्धता नाहीच

जिल्हा परिषदेकडील शिक्षण विभाग शाळेतील विद्यार्थ्यांची संख्येप्रमाणे आहार देण्याचे नियोजन करत असतो. त्यानुसार शाळेकडून आराहाची मागणी केली जाते. त्यानुसार निधीची उपलब्धता होते. राज्याकडून निधी संबंधित विभागाकडे वर्ग केला जाते. त्यानंतर प्राप्त झालेला निधी पूरक आहारासाठी खर्च होतो. मात्र बेदाण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने पूरक आहारात कसा देणार असा प्रश्‍न शिक्षण विभागाला पडला आहे.

खरेदीची प्रक्रिया स्पष्ट नाही

स्थानिक व्यापाऱ्यांकडून पूरक आहार खरेदी करून तो विद्यार्थ्यांना देण्याची अशी प्रक्रिया आहे. मात्र शिक्षण संचालनालय विभागाने बेदाणा कोणाकडून खरेदी केला जाणार, त्याचे निकष काय असणार, खरेदीची निविदा काढली जाणार आहे, या सर्व प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे. याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट केले नाही. त्यामुळे नेमके कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बेदाणा द्यायचा आहे, या बाबत स्पष्टता नसल्याने स्थानिक शिक्षण विभागानेही दुजोरा दिला आहे.

शासनाने विद्यार्थ्यांना पूरक आहारात बेदाणा देण्याची घोषणा कागदावरच राहिली आहे केली. एक हंगाम संपला, दुसरा हंगाम आता सुरू होईल, पण त्याबाबतचे निकष जाहीर केले नाहीत. पूरक आहारातील बेदाण्याच्या प्रक्रियेत राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा समावेश करावा.
कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Panchayat Administration : लोकाभिमुख असावे ग्रामपंचायतीचे नियोजन...

Medicinal Plants : औषधी वनस्पती विकासातील खोडे काढा

Kolhapur Rain Forecast : कोल्हापुरात जोरदार पाऊस; भात, भुईमूग पिकांचे नुकसान, दोन दिवस पावसाची शक्यता

Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Warehouse Construction : गोदाम उभारणीमध्ये वजन काटा महत्त्वाचा...

SCROLL FOR NEXT