Jalgaon News : खानदेशात रविवारी (ता. २१) रात्रीासून पावसाची रीपरिप सुरू आहे. सर्वदूर पाऊस असून, हतनूरसह अन्य मध्यम, लघू प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.खानदेशात मागील आठवड्यात काही भागांत सतत पाऊस होता तर काही भागांत तुरळक, अल्प पाऊस अशी स्थिती होती. जळगाव जिल्ह्यात जळगाव, धरणगाव, चोपडा, एरंडोल, पारोळा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नवापूर भागात पाऊस होता.
परंतु अन्य भागात तुरळक, अल्प असा पाऊस झाला. ढगाळ वातावरण मात्र कायम असायचे. कोरडे, सूर्यप्रकाशित वातावरण नव्हते. परंतु उकाडा वाढला होता. पाऊसमान सर्वत्र सारखे नसल्याने काही भागांत कमी पाऊस तर काही भागांत चांगला पाऊस, असे चित्र होते. परंतु रविवारी रात्री खानदेशात सर्वत्र पाऊस सुरू झाला.
रात्री नऊपासून अनेक भागांत पाऊस आला. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण, उकाडा अशी स्थिती होती. परंतु रात्री सर्वत्र पाऊस दाखल झाला. सुरुवातीला हलका, मध्यम पाऊस होता. नंतर काही भागांत पावसाचा जोर वाढला. जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, जामनेर, भुसावळ, धरणगाव, जळगाव, चोपडा, यावल, धुळ्यातील साक्री, शिरपूर, धुळे, नंदुरबारातील तळोदा, शहादा, नवापूर, नंदुरबार आदी भागांत पाऊस झाला. २४ तासांत जळगाव जिल्ह्यात जळगावमध्ये २२, चोपडा २५, यावल १५, धरणगावमध्ये २१ मिमी तर धुळे जिल्ह्यात धुळे येथे १६, साक्रीमध्ये २२ मिमी पावसाची नोंद झाली.
शेतीकामे ठप्प
खानदेशात शेतीकामे ठप्प झाली आहेत. ज्या भागात मागील आठवड्यात कमी पाऊस होता, त्या भागांत शेतीकामे सुरू होती. त्यात तणनियंत्रण व फवारणीचे काम गतीने झाले. परंतु अन्य भागांत सतत पाऊस असल्याने फवारणी, आंतरमशागतीची कामे रखडली. त्यात संततधार पाऊस सुरू झाल्याने शेतीकामे सोमवारी (ता. २२) सर्वत्र ठप्प झाल्याची स्थिती होती. पिकांत तण वाढत आहे. बैलांकरवी आंतरमशागत शक्य नाही. त्यात तणनाशकांची फवारणीदेखील शेतकरी पावसाने करू शकत नसल्याने अधिकची अडचण आहे.
अनेक प्रकल्पांतून विसर्ग
पावसाची संततधार रात्रभर अनेक भागांत सुरू होती. जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील भुसावळातील हतनूर, यावलमधील हरिपुरा, वड्री, मोर, रावेरातील सुकी या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू होता. तसेच अनेक धबधबेही खानदेशात प्रवाही झाले आहेत. त्यात नंदुरबारातील धडगाव भागातील तोरणमाळ येथील धबधबे खळाळले आहेत. तसेच यावलमधील सातपुड्यातील मनुदेवी येथील धबधबाही प्रवाही आहे.
जळगाव व छत्रपती संभाजीनगरच्या सीमेवरील अजिंठा डोंगरातील धबधबेही फेसाळले असून, अजिंठा लेणी भागातील सप्तकुंड धबधबा आकर्षणाचा बिंदू बनला आहे. परंतु जळगावातील गिरणा नदीवरील गिरणा, बहुळा, अग्नावती, बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी आदी सिंचन प्रकल्पांतील जलसाठा मात्र रविवारच्या पावसाने वाढलेला नसल्याची स्थिती आहे. जोरदार ते अतिजोरदार पाऊस कुठेही नसल्याचे सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.