Jalgaon News : खानदेशात अपवाद वदळता पाऊस रोज हजेरी लावत आहे. पेरण्याही यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ९० टक्क्यांवर पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांची गती सततच्या पावसाने काही भागात मंद झाली आहे. खानदेशात जूनअखेर सरासरी १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जूनमधील पाऊसमान चांगले राहिल्याने पेरण्यांना गती आली. जूनममध्येच पेरण्या ७० टक्क्यांवर झाल्या. तर या महिन्यात जसा वाफसा मिळाला, तशी पेरणीही झाली.
मागील दोन दिवसात खानदेशात अपवाद वगळता सर्वत्र पाऊस झाला. दोन दिवसांत कुठेही अतिवृष्टी झाली नाही. शनिवारी (ता. ६) अनेक भागांत जोरदार ते मध्यम, हलका पाऊस झाला. जळगाव तालुक्यात २४ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. भडगाव, पाचोरा, धरणगाव, चोपडा या भागातही शनिवारी व रविवारी (ता. ७) पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारी व रात्री अनेक भागात पाऊस झाला. जळगाव तालुक्यात रविवारी १६ मिमी पाऊस झाला. मागील चार ते पाच दिवसांपासून सूर्यदर्शन हवे तसे झालेले नाही. पाऊस व उकाडा अशी स्थिती आहे.
चाळीसगावात प्रमाण कमी
चाळीसगाव, बोदवड भागात पाऊस कमी राहीला आहे. शुक्रवारपासून (ता. ५) चाळीसगाव भागात अपवादानेच चांगला पाऊस झाला. तसेच धुळ्यातील धुळे, नंदुरबारातील नवापूर, नंदुरबार भागातही पाऊस हवा तसा नसल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी (ता. ५) चाळीसगावात फक्त चार मिमी पाऊस झाला होता.
सातपुड्यात पाऊसमान बरे
यंदा सातपुडा पर्वतरांगा व लगत पाऊसमान बरे आहे. नंदुरबारातील धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर या भागात पाऊसमान बरे राहीले आहे. सातपुड्यातील शिरपुरातील अनेर, चोपड्यातील गूळ, यावलमधील मोर व गारबार्डी, रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी आदी प्रकल्पांत जलसाठा ६० टक्क्यांवर आहे. मंगरूळ धरणातील जलसाठा ८५ टक्क्यांवरआहे.
पेरण्या पूर्णत्वाकडे
खानदेशात पेरण्या पूर्ण होत आल्या आहेत. कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. तर मका लागवड सुरू आहे. उडीद, मूग, तूर व सोयाबीनची पेरणीदेखील आटोपली आहे. बाजरी पेरणी काही शेतकरी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात मक्याची एक लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर कापसाची लागवड पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात झाली आहे. उडदाची १७ हजार हेक्टरवर तर मुगाची १६ हजार हेक्टरवर पेरणी जळगाव जिल्ह्यात झाली आहे. तसेच सोयाबीनची खानदेशात सुमारे ४५ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती आहे. कापूस लागवडीत १० टक्के घट येईल, अशी स्थिती सध्या आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.