Wheat Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : बागायती गव्हाच्या पेरणीचे नियोजन

Horticulture Wheat Sowing : रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून गहू लागवड केली जाते. देशातील उत्पादनाच्या सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत राज्यातील गहू उत्पादकता फारच कमी आहे.

Team Agrowon

डॉ. योगेश पाटील, डॉ. नीलेश मगर प्रा. संजय चितोडकर

Sowing Management : रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून गहू लागवड केली जाते. देशातील उत्पादनाच्या सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत राज्यातील गहू उत्पादकता फारच कमी आहे. यामागे गहू लागवडीसाठी हलक्या जमिनीची निवड, सुधारित वाणांचा वापर न करणे, उशिरा पेरणी, पीक अवस्थेनुसार सिंचनाचा अभाव, अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर, पीक संरक्षणाचा अभाव, मशागत तंत्रज्ञानाचा अभाव आदी कारणे आहेत. गहू पिकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी योग्य नियोजन केल्यास हेक्टरी उत्पादकतेत वाढ मिळविणे शक्य होते.

जमीन

पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खते वापरल्यास उत्पादन चांगले मिळते.

पूर्वमशागत

जमिनीची १५ ते २० सेंमी खोलवर नांगरट करून कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर हेक्टरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरवून टाकावे.

पेरणीची वेळ

बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची वेळ नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा आहे. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते.

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास थायरम (७५ टक्के डब्ल्यूपी) या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

मावा, तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (७० डब्ल्यूएस) १७.५ मिलि प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून नंतर ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरळविणाऱ्या जिवाणू खतांची प्रत्येकी २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे प्रक्रिया करावी.

बियाणे प्रमाण

गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता हेक्टरी २० ते २२ लाख रोपांची संख्या ठेवणे आवश्यक आहे. ही संख्या मिळवण्यासाठी हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.

पेरणी

जमिनीत पुरेशी ओल असताना पेरणी करावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन भिजवून वाफसा आल्यानंतर जमीन कुळवावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत २० सेंमी अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सेंमी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन २.५ ते ४ मीटर रुंद व ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.

खत व्यवस्थापन

पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत एकरी ४ टन प्रमाणे द्यावे.

पेरणीवेळी रासायनिक खतांचा बेसल डोस ४८ः२४ः१६ (नत्रःस्फुरदःपालाश) किलो प्रति एकर म्हणजेच युरिया ५० किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट १५० किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश २८ किलो या प्रमाणे एकरी मात्रा द्यावी. पेरणीनंतर ३ आठवड्यांनी (खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी) एकरी ५० किलो युरिया खताची मात्रा द्यावी

बागायती क्षेत्रात वेळेवर पेरणी केलेल्या गहू लागवडीत शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन पेरणीनंतर ५५ दिवसांनी आणि ७० दिवसांनी १९ः१९ः१९ हे विद्राव्य खत २०० ग्रॅम प्रमाणे प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दोन फवारण्या कराव्यात.

जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत अधिक उत्पादन तसेच धान्यातील जस्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी शेणखतात झिंक सल्फेट २० किलो प्रति हेक्टरी प्रमाणात एक आठवडा मुरवून (१:१० प्रमाणात) शिफारशीत अन्नद्रव्ये मात्रेसोबत पेरणीच्या वेळेस जमिनीतून द्यावी. फुटवे धरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) आणि फुलोरा अवस्थेत (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवस) झिंक ईडीटीए (०.२ टक्के) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी फवारणी करावी.

लोहाची कमतरता असलेल्या जमिनीत हेक्टरी २० किलो फेरस सल्फेट (हिराकस) आठवडाभर शेणखतात मुरवून (१:१० प्रमाणात) शिफारस अन्नद्रव्ये खतमात्रेसोबत पेरणीच्या वेळी जमिनीतून द्यावे. फुटवे धरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस) आणि फुलोरा अवस्थेत (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवस) लोह ईडीटीए (०.२ टक्के) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

सिंचन व्यवस्थापन

गव्हाची पेरणी केल्यानंतर लगेच शेत ओलवून घ्यावे. पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाळ्यांचे नियोजन करावे. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते.

संवेदनशील अवस्था..........पेरणीनंतरचे दिवस

मुकुटमुळे फुटण्याची अवस्था.......१८ ते २०

कांडी धरण्याची अवस्था ४५ ते ५०

फुलोरा अवस्था ६० ते ६५

दाण्यात दुधाळ /चीक अवस्था ८० ते ८५

दाणे भरण्याची अवस्था ९० ते १००

पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचन नियोजन

एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.

दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी, तर तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

आंतरमशागत

गहू पिकामध्ये चांदवेल, हराळी या सारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता आवश्यकतेनुसार एक किंवा दोन वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा.

अरुंद पानांच्या आणि रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी, पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी मेटसल्फ्युरॉन मिथाईल (२० टक्के डब्ल्यूपी) हेक्टरी २० ग्रॅम प्रति ५०० लिटर पाण्यात किंवा क्लोडीनाफॉप प्रोपरजील (१५ टक्के) अधिक मेटसल्फ्युरॉन मिथाईल (१ टक्का डब्ल्यूपी) हेक्टरी ४०० ग्रॅम प्रति ३७५ लिटर पाण्यातून मिसळून गहू लागवडीतील २ ओळींत फवारणी करावी. तणनाशकाचा वापर केल्यानंतर १० ते १२ दिवस सिंचन करणे टाळावे.

सुधारित वाण

वाण कालावधी(दिवस) उत्पादन (क्विं./हे.) वैशिष्ट्ये

सरबती वाण

फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू. १९९४) १०८ ते ११२ ४५ ते ५० बागायती वेळेवर, उशिरा पेरणीसाठी शिफारस, तांबेरा प्रतिकारक, अधिक उत्पादन क्षमता

एम. ए. सी. एस. ६२२२ १०५ ते ११० ४५ ते ५० तांबेरा प्रतिकारक, बागायती वेळेवर पेरणीसाठी शिफारस

पीडीकेव्ही- सरदार (एकेडब्ल्यू- ४२१०६) १०० ४२ ते ४५ तांबेरा प्रतिकारक, बागायती वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी शिफारस

एम.ए.सी.एस.६४७८ १०८ ते ११० ५०ते ५५ बागायती वेळेवर पेरणीसाठी शिफारस, तांबेरा प्रतिकारक, अधिक उत्पादन क्षमता

बन्सी वाण

एम.ए.सी.एस. ४१०० (जेजुरी) ११० ४५ तांबेरा प्रतिकारक, शेवया, कुरड्या व पास्तासाठी उत्तम वाण

खपली वाण

एम.ए.सी.एस.२९७१ ११० ते ११५ ४६ ते ५० बागायती वेळेवर पेरणीसाठी प्रसारित बुटका वाण (लोळण्याचे प्रमाण कमी), सहज पचनक्षमतेसह चांगले गुणवत्ता गुणधर्म, तांबेरा रोगास प्रतिकारक, लो ग्लायसेमिक इंडेक्स, खीर, उपमा, पुरणपोळी आणि दलिया इ. पदार्थ बनवण्यासाठी उपयुक्त.

- डॉ. योगेश पाटील ९४२१८८६४७४

- संजय चितोडकर ९३२६०९६१८१

(कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT