Palghar News : वाढत्या वातावरण बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी एक कोटी बांबू वृक्षांची लागवड करून हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्याबरोबरच शेजारच्या महामुंबईला ऑक्सीजन पुरवण्यासाठी आता आदिवासी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. पालघर जिल्हा प्रशासन आणि श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून ‘मिशन बांबू लागवडी’चा महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार वनपट्टे तसेच खाजगी जमिनीवर बांबू लागवड करिता पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बांबू लागवड मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स’ अंतर्गत स्थापित कार्यकारी समितीचे अध्यक्ष ब राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली १९ मे पर्यंत‘बांबू मिशन शेतकरी मेळावे’ आयोजित करण्यात आले आहेत.
शुक्रवारी (ता. १६) पालघर येथे सातवली आणि वसई मधील उसगाव मध्ये बांबू मिशन शेतकरी मिळावे पार पडला. यावेळेस मोठ्या संख्येने परिसरातील आदिवासी शेतकरी आणि बांबू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये मध्ये बोलताना विवेक पंडित म्हणाले, की मोठ्या संघर्षातून आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्ट्यांचे हक्क मिळाले. आता या हक्कांच्या वनपट्ट्यांमध्ये बांबू लागवडीची सुरुवात करून आदिवासींचे जीवनमान उंचावणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे तसेच शेजारच्या महामुंबईला ऑक्सिजन पुरवठा करणे या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय आहे.
यासाठी सर्व राज्य सरकारच्या यंत्रणा यांच्याशी समन्वय साधून तातडीने लागवडीची पूर्वतयारी आणि लागवडीचा कार्यक्रम हजारो शेतकऱ्यांनी हाती घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मिळून एकत्रितरित्या आम्ही एक कोटी बांबू वृक्ष लागवड करण्याचे ध्येय निश्चित केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या, की आदिवासींना मिळालेल्या पलाटावर आता बांबू लागवडी शिवाय पर्याय नाही. पारंपरिक भात शेती परवडत नाही. बांबू लागवडीतून ऑक्सिजन निर्मिती बरोबरच स्वयंरोजगार आणि जी आदिवासींचे जीवनमान उंचावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.या दोन्ही मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास कृती दलाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी वातावरण बदलाचे संकट आणि बांबू लागवड आवश्यकता यावर सखोल मार्गदर्शन आणि विचारमंथन केले.
पाशा पटेल म्हणाले, की वातावरण बदलाचे दृश्य परिणाम सर्वत्र दिसत आहेत. या बदलाचे मानव जातीवरील प्रतिकुल परिणाम रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची तातडीने आवश्यकता आहे परंतु इतर वृक्षांच्या मर्यादा आहेत. त्यामुळेच आपण जलद गतीने वाढणारा बांबू हा पर्यावरण पूरक पर्याय दिला आहे. मराग्रारोहयो योजनेअंतर्गत बांबू लागवड यासाठी सात लाख चार हजाराचे अनुदान मिळणार असल्याचे सांगत त्यांनी बांबू पासून २००० प्रकारच्या वस्तू निर्मिती करणे शक्य असल्याचे यावेळी उपस्थितांना दाखवले.
वाढते कार्बन उत्सर्जन आणि तापमान वाढ रोखण्यासाठी बांबू लागवड करणे आवश्यक असून बांबू लागवड अनुदान, बांबूपासून वस्तू निर्मिती आणि ऑक्सिजन हे केवळ आदिवासी नव्हे तर शहरी भागातील महा मुंबईतील नागरिकांना देखील फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सप्रमाण सांगितले.
राज्य सरकारने यंदा अर्थसंकल्पामध्ये बांबू प्रक्रियेसाठी चार हजार तीनशे कोटी रुपयांची तरतूद केली असून बांबू मधील कौशल्य निर्मितीसाठी पाशा पटेल स्किल टेक विद्यापीठ आकाराला येत आहे. ऊर्जा निर्मितीसाठी बांबू पॅलेट आणि शाश्वत मटेरिअल म्हणून बांबूचा सर्वत्र वापर हे देखील एक बांबू मिशन मधील महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले.
आता पालघर भागातील आदिवासी आता मुंबईसह जग वाचायच्या चळवळीत सहभागी झाले आहेत. आपणाला यापुढील काळात मुंबईच्या गरजा पालघर जिल्ह्यातील वाड्या आणि तांड्यातून पूर्ण करायचा आहे, असे पाशा पटेल यांनी शेवटी सांगितले.कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी प्रशासन, श्रमजीवी संघटना, कृषी, ग्रामविकास, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.
बांबू मिशन कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी
सातवली आणि वसई मधील उसगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पारंपरिक भात लागवड आतबट्ट्याची ठरत असून पर्याय म्हणून बांबू लागवड हाच एक कलमी कार्यक्रम हाती घेऊन उद्दिष्ट आणि गाठू असा विश्वास उपस्थितांनी त्यावेळी व्यक्त केला.
आज, उद्या मेळावे...
पालघर जिल्ह्यातील बांबू मिशन कार्यक्रमाचे पुढील टप्पे १८ आणि १९ मे रोजी वाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, मोखाडा, आणि जव्हार तालुक्यामध्ये पार पडणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.