डॉ. साधना उमरीकर, डॉ. आश्विनी बोडखे
Tradition Coarse Grains : प्राचीन काळापासून गरजा पूर्ण करणाऱ्या निसर्गाला, अद्भुत शक्तीला मानवाने देव मानले. डोंगर, सूर्य, चंद्र, तारे या शिवाय निसर्ग चक्राचा देखील त्याने अभ्यास केला. ऋतुचक्राच्या आणि बदलांच्या आधारे त्याने कालगणना सुरू केली. निसर्गातील बदल अभ्यासले आणि या ऋतूमधील बदलांचे सोहळे किंवा सण साजरे करणे सुरू केले.
मातीत रुजणाऱ्या, फुलणाऱ्या लोकजीवनाला घडविण्यात संस्कृतीचं रंगरूप प्राप्त करून देण्यात सण, उत्सवांचे अस्तित्व महत्त्वाचे ठरते. आजच्या पिढीला सणाची पार्श्वभूमी, परंपरा, सण साजरा करण्याची पद्धती, खाद्यपदार्थ इत्यादींविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
प्रत्येक सणाच्या दिवशी होणारे खास खाद्यपदार्थ तर आपल्या सणांचे खास वैशिष्ट्य. पुरणपोळीशिवाय होळी, तीळगुळाशिवाय संक्रांती आणि चकलीशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही.
महाराष्ट्रातील डोंगराळ आणि आदिवासी भागात नाचणीला कणसरी माता असे म्हणतात. कारण या भागात नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आदिवासी भागात आजही या धान्याची कापणी केल्यानंतर याच्या लोंब्यांची पूजा केली जाते. यापासून केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. भारतीय संस्कृतीचे जतन करणे हे पौष्टिकता आणि प्रकृती स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.
आपल्या संस्कृतीप्रमाणे पारंपरिक खाद्यसंस्कृतीनुसार भरडधान्ये उत्पादित केली जातात. त्यांनाच आहारात देखील अग्रस्थान होते. महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, राजगिरा या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कदाचित म्हणूनच या धान्याला पारंपरिक, पौष्टिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.
काही दशकांपूर्वी झालेल्या हरितक्रांतीमुळे गहू आणि भात या पिकांची लागवड वाढल्यामुळे काही प्रमाणात आपले पारंपरिक धान्ये मागे जरी पडली असली, तरी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२४ च्या निमित्ताने या धान्याचे महत्त्व वाढले आहे. पूर्वी अशा धान्यापासून केलेल्या विविध पदार्थांना सण समारंभामध्ये देखील स्थान होते.
सणांमधील विविध धान्यांचे पदार्थ
मकर संक्रांत : मकर संक्रांती या सणाला देशाच्या इतर भागांमध्ये उत्तरायण किंवा पोंगल म्हणून ओळखले जाते. या दिवशी तीळ लावलेली पोळी किंवा तीळ लावलेली बाजरीची भाकरी करतात.
काही ठिकाणी बाजरी आणि गुळाच्या मिश्रणाची गोड भाकरीदेखील बनवितात. या सोबतच विविध भाज्या एकत्र करून भाजी बनविली जाते.
शाकंबरी नवरात्र उत्सव : हा उत्सव जानेवारी महिन्यात नऊ दिवस असून पौर्णिमेला कुलाचार करतात. काही ठिकाणी पुरणपोळी तर अनेक घरात देवीला अंबाडीची भाजी आणि ज्वारीची भाकरीचा नैवेद्य दाखवतात.
आषाढी एकादशी : महाराष्ट्रात आषाढी एकादशी हा प्रमुख सण आहे. या निमित्त राज्यभरात लोक उपवास करतात. उपवासाला भगर, राजगिरा, राळा यापासून केलेल्या पदार्थ सेवन केले जातात.
नागपंचमी : महाराष्ट्रातील हा एक महत्त्वाचा सण. श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. नाग उंदरांपासून पिकांचे संरक्षण करतात. म्हणून शेतकरी नागदेवतेची प्रार्थना करतात, त्यांचे आभार मानतात.
या दिवशी ज्वारीच्या लाह्या आणि दूध नैवेद्य म्हणून नागाला अर्पण करतात. काही ठिकाणी नागपंचमीला ज्वारीचे दिंड करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी वरईची कोंडी (एक पारंपरिक पदार्थ) हा मुख्य नैवेद्य म्हणून बनविला जातो.
कृष्ण जन्माष्टमी/ दही हंडी : श्रावण महिन्यात गोकूळ अष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो. या दिवशी ज्वारीच्या लाह्या, दही आणि इतर पदार्थ जसे की काकडीचे तुकडे, साखर किंवा गूळ, तिखट, मीठ मिसळून काला केला जातो. हा अतिशय रुचकर आणि पौष्टिक पदार्थ आहे.
गणपती आणि गौरी पूजन : भाद्रपद महिन्यात गव्हाच्या पिठापासून मोदक, वळीव लाडू किंवा कोकण प्रांतात तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक करतात. गौरीच्या आगमनानंतर तीन दिवस विविध प्रकारचे पदार्थ जसे की लाडू, अनारसे, करंज्या, पुरण पोळी आणि विविध भाज्यांचा नैवेद्य केला जातो.
काही ठिकाणी ज्वारीचे दिवे किंवा सोळवे, तसेच ज्वारीच्या पिठाचे आंबिल करण्याची प्रथा आहे. या बरोबरच अंबाडीची भाजी आणि भाकरी नैवेद्यासाठी बनवली जाते.
नवरात्रोत्सव : नवरात्रीतील नऊ दिवस अनेक जण उपवास करतात. या काळात भगर, राजगिरा वरईपासून विविध पदार्थ केले जातात. भगर आणि राजगिरा यापासून उपमा, शिरा, लाडू, थालीपीठ, खीर, भाकरी असे विविध पदार्थ तयार केले जातात.
दिवाळी : या सणाला अनेक पदार्थ बनविण्याची तसेच देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे. या काळात थंडीने जोर धरलेला असतो त्यामुळे शरीराला उष्णता देणारे पदार्थ, जसे की ज्वारीच्या पिठाच्या चकल्या, बाजरी भरडून उसळ किंवा खिचडी, बाजरीची भाकरी, बाजरीचे दिवे इत्यादी पदार्थ बनवले जातात. या शिवाय काही फराळाचे पदार्थ जसे की चिवडा, लाडू, अनारसे, पुरण पोळी करण्याची देखील प्रथा आहे.
सट आणि नागदिवे : मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीच्या दिवशी नागदिवे हा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक घरात बाजरीच्या पिठाचे दिवे बनवतात आणि हे वाफवून घेतात. हे दिवे कुस्करून बारीक करून यात गूळ आणि दूध मिसळून नैवेद्य दाखवतात. षष्टीच्या दिवशी नव्या कांद्याचे भरीत किंवा वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य अर्पण करतात.
डॉ. साधना उमरीकर, ९४२०५३००६७ (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जि. जालना)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.