Dhule News : खानदेशात धुळे लोकसभा मतदारसंघात १८ व्या लोकसभा निवडणुकीसंबंधी सोमवारी (ता. २०) मतदान पार पडले. मतदानाबाबत सकाळी व सायंकाळी मतदारांमध्ये उत्साह दिसला. उष्णतेमुळे दुपारी मतदान केंद्रांत शुकशुकाट दिसून आला.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४८.८१ टक्के मतदान झाले. भाजपचे डॉ.सुभाष भामरे व काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात सामना आहे. यंदाची निवडणूक कांदा व अन्य शेतीप्रश्नांभोवती फिरत होती. यामुळे निकालांबाबत आतापासून उत्सुकता आहे. मतदानासंबंधी प्रशासनाने तयारी व्यवस्थित पार पाडली होती.
सकाळीच मतदानाला बाहेर पडा, मतदानासंबंधी प्रथम आपले कर्तव्य पार पाडा, असे आवाहन प्रशासनाने अनेक दिवसांपासून करण्यास सुरवात केली होती. तसेच रोटरी क्लब, सॅटर्डे क्लब आदी संस्थांनीदेखील मतदानासंबधी जनजागृती केली होती. यात सकाळच्या वेळेस शहरासह ग्रामीण भागात मतदानाबाबत मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सकाळी सात वाजताच अनेक केंद्रांत मतदानासाठी गर्दी झाली. प्रशासनाने मतदान केंद्रात आनंददायी वातावरण असावे यासाठी मतदान केंद्रांची सजावट केली होती. त्यात विविध रंगांच्या थीमनुसार केंद्र सजविण्यात आले. दुपारी मात्र शुकशुकाट दिसून आला.
दुपारी मात्र मतदान केंद्रात शुकशुकाट दिसत होता. ढगाळ वातावरण परंतु उष्ण वारे, उष्णता कायम आहे. यामुळे वृद्ध, अन्य मंडळीने दुपारी मतदान करणे टाळले. सायंकाळी पाचवाजेपासून पुन्हा मतदान केंद्रांत गर्दी दिसू लागली. यामुळे यंत्रणेवर मोठ्या मतदान केंद्रांत पुन्हा ताण आला.
मतदान सकाळी सात ते सायंकाळी सहा यादरम्यान करण्यास मुभा होती. परंतु सायंकाळी सहानंतर रांगेत आलेल्या मतदारांनादेखील मतदान करण्याची संधी देण्यात आली. मतदान केंद्रात पिण्याचे पाणी, प्रथमोपचार किट आदींची व्यवस्थाही होती. मतदारांना शांततेत मतदानाचे आवाहन केले जात होते.
तिसरा डोळा तत्पर
प्रत्येक मतदान केंद्रातील स्थिती पाहण्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठे स्क्रीन उभारले होते. मतदान केंद्रात काय प्रकार सुरू आहे, याची माहिती यातून प्रशासन घेत होते. या स्क्रीनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून होते.
जिल्ह्यातील मतदारसंघांत सुमारे आठ हजार कर्मचारी या कामासंबंधी नियुक्त केले होते. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी होती. यामुळे ज्यांनी मोबाईल आणले, ते केंद्राबाहेरच ठेवले जात होते. मतदानाच्या निमित्ताने आठवडी बाजार बंद होते. तसेच मतदान करता यावे यासाठी सुट्टीही जाहीर झाली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.