Moringa Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Moringa Farming : शेवगा पिकात सातत्यासह ओळख मिळवलेले हिंगणे

Moringa Cultivation : बारामती (जि. पुणे) येथील विष्णुपंत हिंगणे यांची प्रयोगशील व अभ्यासू शेतकरी अशी ओळख आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी शेवग्याची शेती जपली आहे.

Team Agrowon

गणेश कोरे

Shevga Cultivation : बारामती (जि. पुणे) येथील विष्णुपंत हिंगणे यांची प्रयोगशील व अभ्यासू शेतकरी अशी ओळख आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी शेवग्याची शेती जपली आहे. उत्कृष्ट बियाणे निवडून उत्कृष्ट व्यवस्थापनातून मध्यम जाडी व लांबीच्या दर्जेदार शेवग्याचे उत्पादन त्यांनी यशस्वी केले आहे. बाजारपेठांचाही चांगला अभ्यास करून विक्रीचे तंत्र अवगत केले आहे.

बारामती येथील विष्णुपंत आत्माराम हिंगणे यांची सहा भावांमध्ये असलेली संयुक्त कुटुंबाची सुमारे दीडशे एकर शेती होती. पैकी वाटण्या झाल्यानंतर आज सुमारे ३० एकर शेतीची जबाबदारी विष्णुपंत पाहतात. सन १९७० मधील ते कृषी पदवीधारक आहेत.

शेतीतील शिक्षणाची जोड लाभल्याने त्यांनी अभ्यासूवृत्तीने व तांत्रिक पद्धतीने शेतीचा विकास करण्यास सुरुवात केली. शेवगा हे त्यांचे मुख्य पीक आहे. सन १९८० पासून त्याची लागवड सुरू केली. आजगायत त्या पिकात सातत्य जपले आहे. दरवर्षी दोन ते सहा एकर असे त्याचे क्षेत्र बदलते. यंदा हे क्षेत्र चार एकर आहे.

शेवगा शेतीतील व्यवस्थापन

-अन्य भाजीपाला पिके कमी मुदतीची असतात. त्या तुलनेत शेवगा एकदा लावल्यानंतर किमान
१५ वर्षे उत्पादन देत राहते. वर्षातील मोजके महिने वगळता सात- आठ महिने ते उत्पादन व त्याचबरोबर पैसा देत असते. जोडीला हिंगणे विविध भाजीपाला पिकेही घेतात. त्यामुळे
मजुरांनाही शेवग्यासह शेतीत वर्षभर काम देता येते. त्यामुळे हे पीक फायदेशीर
ठरल्याचे ते सांगतात.


-सुमारे २० वर्षांपासून निवड पद्धतीने शेवग्याच्या बियाण्याचे संकलन केले आहे. कोइमतूर जातींच्या वापराला पसंती आहे. दरवर्षी बागेत फिरून चांगला फुलोरा, फार लांब व फार आखूड नसलेल्या व मध्यम लांबीच्या शेंगांचे निरीक्षणे करून त्या झाडांच्या शेंगा ते बियाण्यासाठी राखून ठेवतात. यामुळे बागेचा आणि मालाचा दर्जा राखून उत्पादनामध्ये सातत्य ठेवणे शक्य होते.


-सुमारे १३ बाय १२ फुटांवर लागवड. एकरी सुमारे २८० पर्यंत झाडे.


- मार्च १५ ते एप्रिल १५ या दरम्यान छाटणी. प्रत्येक झाडाला १० ते १२ फांद्या. प्रत्येक फांदीवर सुमारे तीन काड्या ठेवण्यात येतात. अडीच फुटावर शेंडा खुडण्यात येतो.


-छाटणीनंतर प्रति झाड २० ते २५ किलो शेणखत, अर्धा ते पाऊण किलो निंबोळी पेंड तर सूक्ष्मअन्नद्रव्ये एकरी पाच ते १० किलो.

-जून- जुलैच्या दरम्यान उत्पादन सुरू. ते जानेवारीपर्यंत चालते. झाडाचे वय वाढेल तशी उत्पादनात वाढ.


-उत्पादन सुरू झाल्यानंतरही गरजेनुसार प्रत्येक महिन्याला डीएपी, १०-२६-२६ आदी रासायनिक खतांत वापर केला जातो.


-हंगामात तीन आठवड्यांनी तर उन्हाळ्यात १५ दिवसांनी पाटपाणी दिले जाते. पाण्यासाठी कॅनॉल, बोअर व ठिबकची सोय असून पाणी मुबलक आहे.


-शेवग्याचे उत्पादन दर्जेदार फुलोऱ्यावर अवलंबून असल्याचा हिंगणे यांचा अनुभव आहे. झाडाला जेवढा जास्त फुलोरा व चांगले परागीभवन तेवढे जास्त उत्पादन मिळण्यासाठी मधमाश्‍यांचा वावर बागेमध्ये असण्यावर त्यांचा भर असतो. त्यादृष्टीने मधमाश्‍यांच्या एकरी तीन तर चार एकरांत १२ पेट्यांची व्यवस्था केली आहे.

काढणी व उत्पादन

चार एकरांचा हिशेब केल्यास दर आठवड्याला एकूण अडीच ते तीन टन मालाची काढणी होते.
एकरी सुमारे सात ते ८ टन उत्पादन मिळते. शेंगांची विक्री पुणे तसेच स्थानिक बारामती बाजार समितीमध्ये केली जाते. श्रावणापासून ते दिवाळीपर्यंत शेंगांना मागणी चांगली असते.

वर्षभराचा विचार केल्यास किलोला १५ ते २० रुपयांपासून ४० ते ५० रुपयांपर्यंत दर मिळतो. काही वेळा तो १०० रुपयांपर्यंतही मिळाला आहे. दीड ते दोन फूट लांबी व मध्यम जाडीच्या शेंगांना ग्राहकांकडून अधिक पसंती असते.

शेंगांची लांबी जास्त झाली तर काही वेळा त्याचे दोन भाग करून ग्राहकांना दिले जातात. पण त्यांना भाग केल्यापेक्षा अखंड शेंग घेणे अधिक पसंतीचे असते असे हिंगणे सांगतात.

सल्लागार शेतकरी

बारामतीच्या कृषी विकास न्यासाचे हिंगणे विश्‍वस्त सल्लागार आहेत. येथील कृषी विज्ञान केंद्रालाही ते दरवर्षी गरजेनुसार ३० ते ५० किलोपर्यंत शेवग्याचे बियाणे पुरवितात. इस्राईल, नेदरलॅंड येथेही त्यांनी शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी भेटी दिल्या आहेत. टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा आदी पिके घेण्यातही त्यांनी हातखंडा जपला आहे.

शेवग्याची बाजारपेठ

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांसह विविध राज्यांमधूनही शेवग्याची आवक होते. यामध्ये बारामती, इंदापूर, सोलापूर, दौंड आदि स्थानिक भागांचा समावेश आहे. याचा हंगाम डिसेंबर ते एप्रिलदरम्यान असतो. या दरम्यान दररोज १० ते १५ टन आवक होत असते. या शेवग्याला प्रति किलोला १० ते ५० रुपये असा दर मिळते.

तर मे ते ऑक्टोबर या कालावधीत आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून दररोज सरासरी १५ ते २० टन या प्रमाणात असते. या वेळी या १० ते ४० रुपये दर असतो. सर्वांत महत्त्वाचा म्हणजे तमिळनाडूच्या शेवग्याचा हंगाम संपल्यावर बाजारात ऑक्टोबर- नोव्हेबरमध्ये गुजरातहून आवक होते. ती सुमारे एक ते टन असते.

या वेळी सर्वाधिक १०० ते १५० रुपये दर मिळतो. पुणे- गुलटेकडी बाजार समितीमधील शेवग्याचे प्रसिद्ध व्यापारी रामदास काटकर यांनी याबाबत माहिती दिली.

विष्णुपंत हिंगणे, ९७६७६७५३००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT