Pune News: देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. देशात ६४० लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला. यात गहू, मका, हरभरा आणि भुईमुगाची लागवड वाढली आहे. तर ज्वारी, बाजरी, मोहरी आणि मसूरची लागवड कमी आहे. हरभरा आणि गव्हाची पेरणी गेल्यावर्षीच्या तुलनेत अडीच टक्क्यांनी तर मक्याची पेरणी तब्बल ९ टक्क्यांनी वाढली आहे. मोहरीची लागवडही ६ टक्क्यांनी कमी आहे.
देशातील रब्बी पेरणी २० जानेवारीपर्यंत सरासरीपेक्षा जास्त झाली आहे. देशात मागील ५ वर्षातील रब्बी लागवड क्षेत्राची सरासरी ६३५ लाख हेक्टर आहे. पण आतापर्यंत देशात ६४० लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. मागील हंगामातही लागवड क्षेत्र याच तारखेपर्यंत ६३७ लाख हेक्टर होते. म्हणजेच यंदाची लागवड गेल्यावर्षीपेक्षाही आघाडीवर आहे. यंदाची लागवड सरासरीच्या तुलनेत एक टक्क्याने तर मागील वर्षीच्या तुलनेत अर्धा टक्क्याने लागवड आघाडीवर आहे.
देशात आतापर्यंत गहू, भात, मका आणि हरभरा लागवड गेल्यावर्षीपेक्षा जास्त दिसत आहे. तसेच एकूण कडधान्य लागवडही जास्त आहे. भरडधान्याची लागवड मात्र काहीशी पिछाडीवर आहे. आतापर्यंत ५४ लाख ४९ हजार हेक्टरवर भरडधान्याची लागवड झाली. यात ज्वारीची लागवड यंदा चांगलीच कमी आहे. गेल्याहंगामात जवळपास २६ लाख हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली होती. तर यंदा आतापर्यंत २४ लाख हेक्टरवरच ज्वारीची लागवड आहे. बाजरीची लागवडही कमीच आहे. तर मक्याची लागवड आघाडीवर आहे. भाताची लागवडही गेल्यावर्षीपेक्षा काहीशी वाढून २६ लाख २० हजार हेक्टरवर पोचली आहे.
तेलबिया लागवड कमीच
देशातील तेलबिया लागवड कमीच दिसत आहे. आतापर्यंत जवळपास ९८ लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची लागवड झाली. मात्र सध्याची लागवड ही गेल्यावर्षीपेक्षा ४ टक्क्यांनी कमी आहे. मोहरीची लागवडही जवळपास ६ टक्क्यांनी कमी असून ८९ लाख हेक्टरवर आतापर्यंत लागवड पूर्ण झाली. भुईमुगाची लागवड काहीशी वाढून ४ लाख हेक्टरच्या दरम्यान पोचली आहे.
हरभरा पेरणी आघाडीवर
देशात कडधान्याची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा काहीशी वाढून जवळपास १४२ लाख हेक्टरवर पोचली. यात हरभरा लागवड अडीच टक्क्यांनी आघाडीवर आहे. आतापर्यंत ९८ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली. मसूर लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमीच असून १७ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरा झाला.
गव्हाला चांगली पसंती
पेरणीच्या काळात भाव चांगले होते. तसेच पेरणीसाठी पोषक हवामान असल्याने यंदा गव्हाचा पेरा चांगलाच वाढलेला दिसत आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत आणि सरसरी क्षेत्राच्या तुलनेत गव्हाची लागवड वाढली आहे. आतापर्यंत गव्हाची पेरणी ३२० लाख हेक्टरवर पोचली. यंदाची लागवड सरासरी क्षेत्रापेक्षा अडीच टक्क्यांनी तर गेल्यावर्षीपेक्षा दीड टक्याने आघाडीवर आहे.
मक्याचाही पेरा वाढला
मक्याला मागील हंगामापासून चांगली मागणी आहे. तसेच खरिपात यंदा उत्पादन वाढल्यानंतरही मक्याचे बाजारभाव टिकून होते. त्यामुळे रब्बीतही शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिल्याचे दिसते. आतापर्यंत मक्याची लागवड गेल्यावर्षीपेक्षा ९ टक्क्यांनी वाढली आहे. आतापर्यंत मक्याची जवळपास २३ लाख हेक्टरवर लागवड झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.