Maharudra Manganale
Maharudra Manganale Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Manganale : व्हिएतनाममधलं डोंगराच्या पायथ्याशी असलेलं स्वप्नातलं गाव

महारुद्र मंगनाळे

- महारुद्र मंगनाळे

village Story : मी सध्या व्हिएतनाममध्ये आहे. इथली शेती, ग्रामीण जीवन, निसर्ग बघायला आलोय. सकाळी सहा वाजता पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागा झालो. यात चिमण्यांचा चिवचिवाट आहेच. रुद्रा हटची आठवण करून देणारा माहोल होता. मात्र एवढी शांतता तिथंही अनुभवता येत नाही. उठून फ्रेश झालो.

पहिल्या मजल्यावर संपूर्ण लाकडाचा वापर करून बांधलेलं होम-स्टे सुंदर आहे. बाजूला मोठा कॉमन हॉल आहे. तिथली चटई घेऊन पाऊण तास नीट व्यायाम करून पाठीला लाइनवर आणलं. एवढ्यात आशू म्हणाला, की आजीने नाश्त्याला बोलवलंय. खाली गेलो.

गरमागरम नूडल्स. बांबूच्या दोन लांब काड्यांनी खायचे असतात. मी व्हिएतनामला आलेल्या दिवशीच ठरवलं, काट्या-चमच्यांनी खायचं. ते जमतं मला. नूडल्स सोबत कॉफी आणि नंतर टरबूज खाल्लं. जे खाऊ वाटतं, शक्य आहे ते खायचं.

शक्यतो कमी खायचं. पोट बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. तसंही मी भरपूर खात नाही. आमचं खाणं सुरू असताना मांजराची दोन पिलं आमच्या टेबलवर फिरत, अंगावर येऊन बसत होती. आशू त्यांना घेऊन मस्त बसला.

आठ वाजले होते. रात्री छान झोप झाली होती. कालचा दिवस बाइकवर बसून प्रवास करण्यात गेला असल्याने, चालणं गरजेचं होतं. त्यामुळे बाहेर पडलो. गावात येणारा एकच लांब रस्ता आहे. त्या रस्त्यनं चालत बाहेरच्या मोठ्या रस्त्याला लागलो.

समोरच डोंगराच्या पायथ्याशी एक गाव दिसत होतं. त्या गावात जाण्यासाठी पूल आहे. त्याखाली नदी. नदीकडं बघितलं आणि बघतच राहिलो. अशी स्वच्छ पाण्याची नदी अनेक वर्षांत बघितली नव्हती. पुलाच्या दोन्ही बाजूंना नजर जाईल तिथपर्यंत स्वच्छ पाणी.

किनाऱ्यावर उंचच उंच वाढलेली बांबूची मजबूत झाडं. नजर जाईल तिकडे उंचच उंच डोंगर आणि त्यांच्या पायथ्याशी चित्रातल्या सारखी सुंदर घरं. माझ्या बाजूनं माणसांची जा-ये सुरू होती. पण एकानंही विचारलं नाही. त्यांना माहीत आहे, हा कोणीतरी पर्यटक त्याच्या आवडीचं जगणं जगण्यासाठी इथं आलाय. त्याच्या जगण्यात व्यत्यय आणायचा नाही.

मी भारतातील एखाद्या गावात असतो, तर कोण, कुठले, कोणाकडं आले? कशाला आले? कुठं जाणार? सगळीकडं संशयानं भारलेली माणसं आणि त्यांचे प्रश्‍नही तसेच. हा मोठा फरक आहे जगण्याच्या दृष्टिकोनाचा. पुलावर पंधरा-वीस मिनिटं थांबलो असताना, एक वयस्कर माणूस त्याची छोटीशी होडी वल्हवीत या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर गेला.

त्यानं हात उंचावून हॅलो केलं. मीही त्याला प्रतिसाद दिला. मी बघितलं, पुलाच्या बाजूनं खाली उतरून नदी किनाऱ्यावर जाता येतं. नदी किनारीचं एक छोटसं घर आहे. घरालगतच नदीत उतरायला चार-पाच पायऱ्या आहेत. बाजूला एक बोट दिसत होती.

बऱ्याच दिवसांत तिचा वापर झाला नसावा. तिच्या शेजारी कोरड्या जागेवर बसलो. समोर अथांग पसरलेली नदी. तळातील दगड, वाळलेली पानं दिसत होती. शांतता... गूढ वाटावी अशी. अशी शांतता कोकणात अज्ञात समुद्र किनाऱ्यावर अनुभवली होती.

कसलाच आवाज नाही. फक्त संथपणे वाहणारं पाणी. त्याच्याकडं बघत कितीतरी वेळ हरवल्यागत बसून होतो. जी दृश्यांची कल्पना कधी स्वप्नात केली होती, ते वास्तवात बघत होतो. एक मांजरी पायऱ्यांवर येऊन म्यांव... म्याव... करू लागली तेव्हा समाधी भंगली.

तिला म्हटलं, तुला खायला देण्यासाठी काहीच नाहीय माझ्याकडं. वरच्या पायऱ्यांवर कुत्र्याचं पिलू माझ्याकडं बघत थांबलं होतं. मी, मांजरी आणि कुत्रा! त्या दोघांचा एक फोटो घेऊन पुन्हा निवांत बसलो. मग विचार आला फेसबुक मित्रांना लाइव्ह दाखवावं.

एक लाइव्ह केला. सविता, वीणा, राणीसह काही मित्रांना व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवलं. याच मूडमध्ये आनंदला फोन लागला. झोपेतच त्यानं फोन घेतला. मी म्हटलं, अरे.. बघ किती सुंदर आहे. तो बोलला, बाबा... पहाटेचे तीन वाजलेत... मी आधीच उशिरा झोपलोय.

मी म्हटलं, एकदा नदी बघ आणि मी फोन कट केला. तो लंडनमध्ये आहे हे मी विसरूनच गेलो होतो. शिवाय मला या नदीचं जेवढं कौतुक वाटतंय, तेवढं त्याला वाटण्याचं कारण नाही.

अडीच तासांनंतर परत निघालो. इकडच्या कोंबड्या आपल्यासारख्याच आहेत. म्हशी भुऱ्या रंगाच्या वेगळ्या आहेत. कुत्री बऱ्याच नमुन्यांची आहेत. बदकंही वेगवेगळी आहेत. रस्ते हनोईसारखेच. इथं शहरात आणि खेड्यात सगळ्या सुविधा सारख्याच. इंटरनेट सुपरफास्ट. कितीही वापरा.

महारुद्र मंगनाळे, (व्हिएतनामवरून)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT