Indian Agriculture
Indian Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

कमीत कमी जोखमीची शेती

महारुद्र मंगनाळे

शेतकऱ्यांनी स्वतः आपला शेतीमाल थेट ग्राहकांना विकावा, हे वचन कागदावर कितीही आकर्षक वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात उतरवणं कठीण आहे. केवळ मुठभर शेतकरीच व्यापार करू शकतात. त्यासाठी पुरेसा वेळ, मनुष्यबळ, भांडवल आणि यंत्रणा उभी करावी लागते. हे सगळं जुळवणं शेतकऱ्यांसाठी अवघड आहे. मुळात शेती हा व्यापार नाही. शेती करणारा पीक उत्पादनात एवढा अडकून पडलेला असतो, की त्यातून वेळ काढून दुसरं काम करणं शक्य होत नाही. शेतीत एका दाण्याचे शंभर दाणे होण्याचा चमत्कार होत असला, तरी शेतीइतकी जोखीम इतर कुठल्याही व्यवसायात नाहीत. अतिवृष्टी, महापूर किंवा अचानक उद्‌भवलेली रोगराई सगळं होत्याचं नव्हतं करून सोडते. कुठलाही छोटा, मोठा व्यवसाय असो; त्यात चार पैसे मिळण्याची निश्‍चित हमी आहे. पण शेतीत उत्पादनाचीच खात्री नाही.

साधारण मी आठ-दहा वर्षांचा असेन, तेव्हापासूनच्या माझ्या शेतीसंदर्भातील आठवणी ताज्या आहेत. तेव्हा शेतीसमोर जी जी सुलतानी आणि अस्मानी संकटं होती; ती आजही कायम आहेत. अतिवृष्टी, दुष्काळ, मालाला भाव नसणं, पिकांवरील विविध प्रकारच्या किडी हे सगळं तेव्हाही होतं. माझ्या वडिलांना भाजीपाला लागवडीची आवड होती. ते सतत नवनवे प्रयोग करायचे. किमान दोन -तीन वर्षे तरी पिकलेले टोमॅटो म्हशींना पोटभर खाऊ घातल्याचं मला आठवतं. एके वर्षी गाजरं एवढी पिकली, की बाजारात कोणी घेईना. त्या वर्षी मोठं टोपलं भरूभरू गाजरं सगळ्याच जनावरांनी अनेक दिवस खाल्ली. हिरव्या मिरच्या, वांगी, वरणा यांचीही कशी बेकिमत झाली होती, ते मला आठवतंय. हरितक्रांतीनंतर संकरित ज्वारी आली. पहिले पाच-सहा वर्षे त्या ज्वारीचं विक्रमी उत्पादन झालं. भाव शंभर रुपये क्विंटलच्या आसपास असावा. त्यानंतर ज्वारी काढणीच्या सुमारास हमखास पाऊस पडू लागला. पांढरी शुभ्र ज्वारी काळी पडू लागली. ती बाजारात व्यापारी घेईनात. ती सरकारने खरेदी करावी म्हणून मोर्चे, आंदोलनं झाल्याचंही आठवतं. तेव्हाही हरिण, रानडुक्कर यांचा कमी प्रमाणात का होईना त्रास होताच. आज तो अधिक वाढलाय एवढंच. तेव्हा मोरांची संख्या कमी होती. आता मोरांची वाढती संख्या हे एक संकट बनलंय.

शेतकरी पूर्वी विविध पिकं घ्यायचे, आता ते ठरावीक पिकंच घेतात, याचं अनेक शेतकरीप्रेमींना दु:ख आहे. पण बहुविध पीकपद्धती का बंद झाली, याचा शोध ते घेत नाहीत. माझ्या बालपणी झिंगरी ही उंच वाढणारी पांढरी ज्वारी होती. सुरुवातीला चांगलं उत्पन्न होतं. नंतर ती हिसाळा (कणसात दाणे न भरणे) जाऊ लागली. तिची जागा पिवळ्या ज्वारीने घेतली. काही वर्षे चांगलं उत्पादन. पुन्हा त्यात घट. त्यानंतर संकरित ज्वारी आली. त्याच दरम्यान एच फोर हा संकरित कापूसही आला. हवामान बदलामुळे आमच्या भागातली ही दोन्ही पिकं बंद झाली. अनेक वर्षे भुईमूग हे आमच्याकडचं खरिपातलं प्रमुख पीक होतं. आम्हाला शंभर क्विंटल भुईमूग झाला तेव्हा मी आठव्या वर्गात शिकत होतो. नंतर पावसाची अनियमितता वाढली, उत्पादन घटत गेलं आणि भुईमूग पेरणं हळूहळू बंद झालं. पुढं डुकरांचा त्रास हेही महत्त्वाचं कारण ठरलं. झिंगरी ज्वारीत अंबाडी आणि मुग्या ही पिकं हमखास असायची. काटे टोचतात म्हणून अंबाडी कापायला रोजगारी मिळेना झाले. त्याची रास करणं अधिक कठीण. अंबाडीचं तेल खाणारेही कमी झाले. तेलापेक्षाही अंबाडीपासून दोर निघत असल्याने, ती पेरली जायची. पण शेतकऱ्यांनी अंबाडा तयार करणं बंद केलं. बाजारातील रेडीमेड दोर वापरू लागले. अंबाडी इतिहासजमा झाली. मुग्या कधी संपल्या ते कळलं नाही. आज ते बियाणं मिळणंसुद्धा शक्य नाही. तीळ, बारकं कारळ उत्पादन होईना म्हणूनच संपत चाललंय. बाजरीचं उदाहरण माझ्या कार्यकाळातलंच आहे. सलग तीन वर्षे बाजरी पेरली. बाजरी छान यायची. पण दाणे भरायच्या काळात हजारो चिमण्या येऊन बाजरी खात. एका वर्षी बाजरी राखायला म्हणजे चिमण्या हाकलायला एक महिला ठेवली पण त्याचाही उपयोग झाला नाही. शेवटी बाजरीवर फुल्ली मारली ती कायमचीच.

आज खरिपामध्ये सोयाबीन, कापूस हीच महाराष्ट्राची प्रमुख पिकं आहेत. त्यापाठोपाठ तूर, सूर्यफूल, संकरित ज्वारी, मूग, उडीद ही पिकंही घेतली जातात. पाच वर्षांपूर्वीपर्यंत मी मूग आणि उडीद घ्यायचो. अपेक्षित उत्पन्न निघत नसतानाही. घरची डाळ चांगली, अशी भूमिका होती. पण सलग तीन वर्षे मुगानं बेहाल केलं. मुग काढणीच्या काळात हमखास पाऊस पडू लागला. शिवाय मूग काढायला रोजंदारीवर मजूर मिळेनात. मूग काढणी आणि त्याची रास करण्याचा एवढा त्रास होऊ लागला, की मुग पेरणं बंद केलं. अर्थात, हा माझा अनुभव आहे. मुगासाठी चांगल्या प्रतीची जमीन लागते; ती माझ्याकडं नाही. शिवाय मनुष्यबळाची अडचण आहेच. तरीही काही भागात मूग मोठ्या प्रमाणात घेतात. त्यांना उत्पन्नही चांगलं मिळतं. म्हणजेच ज्याला मूग, उडीद पिकवणं परवडतंय तेच सध्या ही पिकं घेत आहेत. पण एकूण क्षेत्र कमी कमी होत चाललंय.

विषमुक्त शेती

अशात शेतकऱ्यांकडून हमखास विचारला जाणारा प्रश्‍न म्हणजे सेंद्रिय शेती करावी का? बरेच जण या शेतीला विषमुक्त शेती असंही म्हणतात. मी तर नेहमीच म्हणतो, तुम्हाला जे सोयीचं वाटतं, जे परवडतं ते तंत्रज्ञान वापरा. सेंद्रिय शेतीत मनुष्यबळ अधिक लागतं. तो खर्च मोठा आहे. पैशासाठीही आज सहजासहजी शेणा-मुतात हाय घालायला मजूर तयार नाहीत. सेंद्रिय शेतीतही जैविक खते, कीटकनाशके वापरावी लागतातच. तरीही उत्पादन कमी येतं. हा सेंद्रिय शेतीमाल विकण्यासाठी तुम्हाला हक्काचे ग्राहक हवेत. जे बाजारापेक्षा किमान दुप्पट भाव देतील. असा ग्राहक नसेल, तर तुमच्या मालाला रासायनिक एवढीच किंमत मिळेल. शिवाय केवळ तुम्ही म्हणता म्हणून, तुमचा माल सेंद्रिय ठरत नाही. त्यासाठी सरकारी सर्टिफिकेशन लागतं. तरीही ज्यांना हे सगळं सोयीचं वाटतं त्यांनी ते करायला हरकत नाही.

मुळात रासायनिक शेतीला विषारी शेती म्हणणं अज्ञानमूलक आहे. पिकांसाठी लागणारी जी जीवद्रव्ये मातीत नाहीत, ती रासायनिक खतांच्या माध्यमातून आपण देतो. याचं प्रमाण काय असावं, हा चर्चेचा मुद्दा असू शकतो. तज्ज्ञांनी त्याचं प्रमाणही ठरवून दिलंय. कीटकनाशकांच्या बाबतीतही हेच आहे. या औषधांमधील घटक किती टक्क्यापर्यंत अन्नपदार्थात उतरले तरी, ते मानवासाठी हानिकारक ठरत नाही, हे सांगणाऱ्या जागतिक संस्था आहेत. या आधुनिक संशोधनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सगळ्या रासायनिक खतांना व कीटकनाशकांना विषारी म्हणणे, हा सरळ सरळ वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार आहे.

जागतिक तापमान वाढ

जागतिक तापमान वाढ होण्याला शेतकरी कारणीभूत नाही. प्रगत मानवाने आपल्या अतिहव्यासातून ही परिस्थिती ओढवून घेतली आहे. मात्र जागतिक तापमान वाढीने जे पर्यावरणीय बदल होत आहेत, त्याचा जास्तीत जास्त फटका शेतीला बसतोय. गेल्या हंगामात महाराष्ट्रात सोयाबीन, कापूस या पिकांची दैना झाली. वादळांमुळे गुजरातमध्ये व महाराष्ट्रातही आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. लिंबालाही फटका बसला. तापमानवाढीचा सगळ्याच फळबागांवर कमी-जास्त परिणाम होतोय. वादळांची संख्या व तीव्रता वाढतेय. बिगरमोसमी पावसाचं प्रमाण वाढलंय. पावसात मोठे खंड पडताहेत. तसेच २४ तासांत प्रचंड पाऊस पडण्याचे नवे विक्रम नोंदवले जात आहेत. खरं तर या संकटाचे नेमके परिणाम अद्याप तज्ज्ञांच्याही लक्षात आले नसावेत. जागतिक तापमानवाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावेत, अशी कथित तज्ज्ञांची आवाहनं मी वाचलीत. पण कोणताही तज्ज्ञ नेमकी कोणती पिकं घ्यावीत आणि या संकटाचा मुकाबला कसा करावा याबाबतीत मार्गदर्शन करीत नाही. मला वाटतं त्यांच्याकडंही याची उत्तरं नाहीत.

आम्ही या वर्षी तीन वादळांचा अनुभव घेतला. अतिशय मर्यादित क्षेत्रात हे वादळ आणि पाऊस होता. पण तरीही त्यांनी आमच्या बागेत दहा टक्केही आंबा शिल्लक ठेवला नाही. मी यावर बराच विचार केला. पण या वादळांपासून आंबा कसा वाचवता आला असता, याचं उत्तर मला शोधता आलेलं नाही. केवळ या नैसर्गिक संकटांना वैतागून अनेकांनी केसर आंब्याच्या बागा मोडल्याची उदाहरणं मला माहीत आहेत.

शेतीसमोरच्या अनेक संकटांत तापमानवाढीच्या एका अवघड मानवनिर्मित नैसर्गिक संकटाची भर पडली आहे. अशा स्थितीत कमीत कमी जोखमीची, कमीत कमी नुकसान होईल अशी शेती करण्याचा माझा प्रयत्न राहील.

-----------

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.) ९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT