Solapur News : पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत आलेल्या आणि अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीत रविवारी (ता. १८) कारखान्याचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्या पॅनेलने विरोधी विठ्ठल साखर काऱखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या पॅनेलला मोठा धक्का देत कारखान्यावर पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आली होती. त्यातही काळे यांना विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, प्रा. बी. पी. रोंगे आणि दीपक पवार या तिघांनी मिळून आव्हान दिल्याने काळेंच्या विरोधात मोठे आव्हान निर्माण झाले होते.
त्यात निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली होती. अगदी एकेरी भाषेवर हा प्रचार आला होता. परंतु काळे यांनीही जशास तसे उत्तर देत विठ्ठलचे माजी चेअरमन भगिरथ भालके, गणेश पाटील, युवराज पाटील या नेत्यांची मोट बांधत त्यांना एकत्र आणत त्यांच्यासह अभिजित पाटील यांना शह दिला.
या एकीची ताकदच काळे यांना विजयापर्यंत जाण्यास कारणीभूत ठरली. त्यात मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष काळे यांच्या पॅनेलचे उमदेवार तब्बल १७००-१८०० मतांनी आघाडीवर राहिले. कारखान्याच्या एकूण २१ जागांपैकी २० जागांसाठी ही निवडणूक झाली.
सहकारी संस्था मतदारसंघातून या आधीच काळे यांच्या मातोश्री मालन वसंतराव काळे यांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित २० जागांसाठी मतदान झाले.
कल्याणराव काळे यांच्या विरोधात उतरलेल्या अभिजित पाटील यांनी थकित ‘एफआरपी’सह इतर मुद्द्यांवरून रान पेटवले होते. पण या सर्व मुद्द्यांना बगल देत सभासदांनी काळे यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे दिसून आले.
काळे गटाचे विजयी उमेदवार
गोरख जाधव, युवराज दगडे, सुनील सराटे, कल्याणराव काळे, अमोल माने, परमेश्वर लामकाने, दिनकर कदम, नागेश फाटे, मोहन नागटिळक, योगेश ताड, जयसिंह देशमुख, तानाजी सरदार, राजाराम पाटील, अण्णा शिंदे, संतोषकुमार भोसले, मालन काळे, राजेंद्र शिंदे, संगीता देठे, उषा माने, अरुण नलावडे, भारत कोळेकर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.