Rural Development Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development: सर्वच क्षेत्रांत वाढतील पायाभूत सुविधा

Tech In Rural India: आगामी दशकामध्ये दळणवळण, आरोग्य, शिक्षण यांच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल होतील. स्मार्ट कृषी तंत्रज्ञान, ड्रोनचा वापर, अचूक हवामान माहिती व अन्न प्रक्रिया उद्योग हे कृषी पायाभूत सुविधांचे महत्त्वाचे भाग ठरतील.

शेखर गायकवाड

Future Of Rural India: ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आगामी दशकात पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल होतील. मुख्यतः नागरीकरण व शहरीकरण वाढल्यामुळे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे, शहरांमधील मेट्रोचे विस्तारीकरण, शहरांना जोडणाऱ्या जिल्ह्यांच्या रस्त्यांचे रुंदीकरण, औद्योगिक क्षेत्रात वाढ, खासगी क्षेत्रामधील गुंतवणूक या सगळ्यांचा परिणाम म्हणून पायाभूत सुविधांमध्ये वाढ अपेक्षित आहे. अशा प्रत्येक पायाभूत सुविधेसाठी मोठ्या प्रमाणावर शेतजमीन व्यापली जाईल. मागील पाच वर्षांत भारताचे सहा लाख एकर क्षेत्र बिगर शेतीकडे वर्ग झाले आहे. त्यांपैकी ५० टक्के क्षेत्र एकट्या महाराष्‍ट्रात आहे.

दळणवळण क्षेत्रातील बदल

आगामी दशकामध्ये ग्रामीण भारतामध्ये जे पायाभूत सुविधांमध्ये बदल होतील, ते केवळ जीवनमान उंचावण्यासाठीच नव्हे, तर देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहेत. सर्वाधिक बदल हा दळणवळण क्षेत्रामध्ये होईल. पूर्वी आपल्याकडे कोणीही ग्रामीण भागात ट्रक खरेदी केला तर तो शेतावर मुक्कामाच्या ठिकाणी दारासमोर लावला जात होता. आता ड्रायव्हरसाठी व क्लीनरसाठी राहण्याची सोय, स्वच्छतागृह हे वैयक्तिक पातळीवर करावे लागेल.

शहरांच्या जवळ व हायवे वर मात्र ट्रक पार्किंग क्षेत्र, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स, सौरऊर्जेवर चालणारी सार्वजनिक वाहतूक ह्या नव्या पायाभूत सुविधा असतील. भविष्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गाव शहरांशी जोडले गेलेले असेल. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महामार्गांची विस्तार योजना गावांपर्यंत पोहोचवली जाईल. ‘प्रधानमंत्री ग्राम सडक’सारख्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण गावांना शहरांशी जोडण्याचा प्रयत्न होईल. यामुळे शेतीमालाची बाजारपेठांपर्यंत सहज ने-आण करता येईल.

आरोग्य, शिक्षणातील बदल

सौरऊर्जा आणि इतर नवीकरणीय ऊर्जेचा वापर करून ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक स्थिर व स्वस्त केला जाईल. तसेच, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प व नळ योजना मोठ्या प्रमाणावर राबविल्या जातील. अनेक छोट्या वाड्या-वस्त्यांना नळपाणी पुरवठा योजना राबविल्या जातील. टेलिमेडिसिन, मोबाइल हॉस्पिटल्स आणि ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या सुधारित सुविधा हे आरोग्य क्षेत्रातले प्रमुख बदल असतील. यामुळे तातडीच्या आरोग्य सेवेचा लाभ ग्रामीण नागरिकांना मिळेल. ग्रामीण शाळांमध्ये डिजिटल शिक्षण प्रणाली लागू केली जाईल. इंटरनेट सुविधा व स्मार्ट क्लासरूम्समुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल. तसेच तरुणांसाठी ऑनलाइन कोर्सेस व व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध होईल. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होत असल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या महागड्या शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांना पाठविण्याकडे ग्रामीण भागात कल वाढत आहे.

शेतीतील बदल

स्मार्ट कृषी तंत्रज्ञान, ड्रोनचा वापर, अचूक हवामान माहिती व अन्न प्रक्रिया उद्योग हे कृषी पायाभूत सुविधांचे महत्त्वाचे भाग ठरतील. एवढी वर्षे फक्त शासनाकडेच असलेले हवामान केंद्र आता विकेंद्रित स्वरूपात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसू लागले आहे. जमिनीतील आर्द्रता मोजणारे मॉयश्चर मीटर, वाऱ्याचा वेग दर्शविणारे सेन्सॉर, पावसाचे सेन्सॉर, तापमानाचे सेन्सॉर, व टोटल व्हेदर स्टेशन हे आता शेतीचे अविभाज्य हिस्सा बनतील. शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी उपकरणे, ड्रोन वापर, जमिनीचा उपग्रहाद्वारे अभ्यास, अचूक हवामान अंदाज यांचा वापर वाढेल.

पाणीसंवर्धनासाठी ड्रिप इरिगेशन, जलसंधारण प्रकल्प आणि स्मार्ट सिंचन प्रणाली ग्रामीण भागात राबवली जाईल. ग्रामीण भागासाठी सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि बायोगॅस हे ऊर्जा स्रोत प्रमुख ठरतील. भविष्यातील ग्रामीण भारत हा केवळ कृषिप्रधान न राहता तेथील युवक स्टार्टअप्स, लघुउद्योग आणि कौशल्याधारित सेवा उद्योगात उतरतील. यासाठी औद्योगिक हब, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे आणि वित्त सहाय्य सुविधा असतील.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टिकाऊ व स्वस्त घरे बांधली जातील. स्वच्छता मोहिमेचा अधिक विस्तार होऊन प्रत्येक घरात शौचालयाची सुविधा मिळेल. ‘डिजिटल इंडिया’ अभियानामुळे प्रत्येक गावात इंटरनेट, मोबाइल बँकिंग, डिजिटल व्यवहार हे सर्वसामान्य होतील. यामुळे आर्थिक समावेशन साधले जाईल. गावात डिजिटल सेवा केंद्रे, ऑनलाइन प्रशिक्षण केंद्रे, वर्च्युअल शाळा या सर्व सामान्य गोष्टी ठरतील. भविष्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था टेलिमेडिसिन, आरोग्य ऍप्स, मोबाइल हेल्थ क्लिनिक्स यांच्या माध्यमातून अधिक सक्षम होईल. डिजिटल शाळा, ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्स आणि व्यावसायिक शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. पुढील काही दशकांत ग्रामीण भारतात होणारे पायाभूत सुविधा परिवर्तन हे केवळ भौतिक विकासापुरते मर्यादित न राहता सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिवर्तनाचेही द्योतक ठरेल.

shekharsatbara@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT