Monsoon Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon : भारतीय संस्कृतीवर मॉन्सूनचा प्रभाव

Team Agrowon

सतीश खाडे

Monsoon Rain : आपल्या भारताच्या ज्ञात इतिहासामध्ये तर माणसांच्या एकूण जगण्यावर मॉन्सूनचाच प्रबळ प्रभाव दिसून येतो. आपले अनेक सण, उत्सव यांचा संबंध शेवटी पावसाशीच असल्याचे दिसते. श्रावणात तर सण व उत्सवांना तर भरतेच आलेले असते. पावसाळ्यातल्या वट सावित्री, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, पोळा, गणेशोत्सव अशा सणांवर तर वृक्ष, पाऊस व सजीवाचा (उदा. नाग, बैल, हत्ती, उंदीर इ.) साहजिकच प्रभाव असतो.

सध्या श्रावण महिना सुरू आहे. या वर्षी तुलनेने पावसाचे प्रमाण कमी असले तरी पडलेल्या पावसामुळे सर्वत्र हिरवाई पसरलेली आहे. या हिरवाईमुळे श्रावणात केवळ माणसांनाच नव्हे, तर पूर्ण सृष्टीला आनंदाचे उधाण येते. जणू पूर्ण सृष्टी उत्साहाच्या सृजनशीलतेच्या, नवनिर्मितीच्या परमोच्च शिखरावर असते. झाड, झुडपे, गवत, कीटक, पक्षी, प्राणी आणि माणसे ही पडणाऱ्या पावसामुळे आनंदून जातात. पृथ्वीवरील भारतासारखे काही मोजक्याच भूभागावर विशिष्ट काळात पाऊस पडतो. येथे पावसाळा हा स्वतंत्र ऋतू आहे. येथील जनजीवनावर पावसाळ्याचा सर्वांत जास्त प्रभाव आहे. इजिप्त, जॉर्डन या सारख्या अनेक देशांतील संस्कृतीवर नद्यांचा प्रभाव आहे. मात्र भारत वर्षातील सर्वाधिक लोकसंख्या आणि लोकजीवनावर नदी, तलाव यापेक्षाही वर्षा ऋतूचा प्रभाव सर्वाधिक आहे. १४ हजार वर्षांपूर्वी शेतीला सुरुवात झाल्याचे मानले जाते. पुढे अनेक शतके जगभरातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच राहिला. मात्र पुढे अनेक देश शेतीशिवाय अन्य मार्गाने पुढे गेले. मात्र आजही भारतात ‘कृषी ही एक संस्कृती’ आहे.
खरे तर एखाद्या लोकसमुहाची संस्कृती म्हणजे काय?

अगदीच सोप्या भाषेत सांगायचे तर चार टप्प्यांत संस्कृतीचे अवलोकन केले जाते. त्यावर त्या समूहाची संस्कृती कशी आहे, ते ठरते.
१) या लोकसमूहात (समाजात) माणसांमाणसातल्या नात्याकडे कसे बघितले जाते?
२) दुसऱ्या समूहातील वा देशातील माणसांशी कसा व्यवहार आहे?
३) आपण ज्या निसर्गाचे घटक आहोत, त्यांच्याशी हा समूह नाते कसे ठेवतो?
४) आपल्याशी संबंधित अगदी निर्जीव वस्तू, साधने वा हत्यारे यांच्याशीही त्यांचे वागणे कसे आहे?
वरील संदर्भाने आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला असता भारतीय लोक हे प्राणी, व निसर्ग यांच्याइतकीच अनेक निर्जीव घटकांबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ असतो. या घटकांशी संबंधित आपले वेगवेगळे सण व उत्सव असून, त्या वेळी या घटकाप्रती आपली कृतज्ञता वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केली जाते. आपले अनेक सण, उत्सव यांचा संबंध शेवटी पावसाशीच असल्याचे दिसते. श्रावणात तर सण व उत्सवांना तर भरतेच आलेले असते. पावसाळ्यातल्या वटसावित्री, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, पोळा, गणेशोत्सव अशा सणांवर तर वृक्ष, पाऊस व सजीवाचा (उदा. नाग, बैल, हत्ती, उंदीर इ.) साहजिकच प्रभाव असतो.

पण पावसाळा संपल्यानंतर येणारी निरभ्र आकाशाची पहिली पौर्णिमा म्हणजे कोजागरी! पावसामुळे उत्तम पीक, त्यामुळे सुगी, खळे आणि धनधान्याच्या राशी भरल्याचा आनंद व्यक्त करण्याचा सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी! अगदी वार्षिक सोहळाच! संक्रांतीलाही धनधान्याच्या पूजेला महत्त्व आहे. होळी म्हणजे रब्बीची सुगी साजरी करण्याचा उत्सव. होळी पेटविण्याचा संबंध व संदर्भ ही पावसाशीच आहे. भारताच्या पूर्ण भूभागावर एकाच वेळी अग्नी पेटवून हवा तापवणे व त्यातून वाऱ्यांना आपल्याकडे ओढणे. यातून मॉन्सूनच्या वाऱ्यांनी पाऊस घेऊन येणे असा त्यामागील एक दृष्टिकोन असावा. पुढे अक्षय तृतीयेला घटाची पूजा. या दिवशी कुंभरूपात आपण जणू तलावांचीच पूजा करतो असा संदर्भ आहे.
गावोगावच्या जत्रा हे तर भारतातल्या प्रत्येक गावाचे खास वैशिष्ट्य! रब्बीची सुगी आणि होळी झाली की जत्रांचा मौसम सुरू होतो. तोही चैत्र वैशाखापर्यंत म्हणजे पावसाळ्यापूर्वीपर्यंत चालतो. नंतर पावसाळ्यापूर्वीची शेतीची कामे हा संदर्भ. त्याच काळात
लग्नसराईचा ही मौसम असतो. तोही पावसाळ्यापूर्वीच उरकला जातो. कारण पावसाळ्याआधी शेतीच्या मशागतीला वेळ मिळायला हवा. आताही शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात आजही हेच लोकजीवनाचे संदर्भ आहेत.

अन्य राज्यातील संदर्भ ः
लोकजीवनाच्या महाराष्ट्रातील संदर्भाबरोबरच अन्य राज्यातही साधर्म्य असलेले सण आहेत. काश्मीर व पंजाबातील बैसाखी अन् लोहरी, आंध्रातील ब्रह्मोत्सव, आसामातील बोहक व बिहू उत्सव, बिहारमधील छटपूजा, गुजरातमधील नवरात्र, कर्नाटकातला उघडी, केरळमधील ओणम, तमिळनाडूतील पोंगल, बंगालमधील दुर्गा पूजा असे अनेक उत्सव मॉन्सूनशी जोडले गेले आहेत. त्यातही बहुतांश सण हे शेतकरी जीवनाशी संबंधित. पण स्वतःच्या मालकीची शेती नसलेल्या मोठा जनसमूह म्हणजे भटक्यांचा समूह! या सर्व भटक्यांच्या जीवनावर मॉन्सूनचीच छाया असते. या धनगरांचा शेळ्या मेंढ्या घेऊन गावाबाहेर पडण्याचा परत गावाकडे येण्याचा संबंध पावसाळ्याशीच. गायींचे कळप घेऊन भारतभर हिंडणाऱ्या यादवांचा, शिकारी जमातींचा, इतकंच काय बहुरूप्यांपासून इतर अनेक भटक्यांची बरकत खरेतर पाऊस पाण्यावर अप्रत्यक्षरीत्या अवलंबून. ज्या वर्षी पावसाळा चांगला, तर यांना मोकळ्या हाताने दान मिळायचे.

आदिवासी समूह तर पूर्णपणे निसर्गाशी समरस. त्यांचे सर्व जीवन व्यवहार जंगलावर अवलंबून. पावसाळ्यात घराबाहेर पडणे मुष्कील. त्यामुळे जंगलमेवा व इतर जंगलातून मिळणाऱ्या गोष्टी पावसाळा संपल्यावरच. त्यांच्या ही जीवनशैली व परंपरा, सण यांचे संदर्भ पावसाळ्याशीच येऊन मिळतात. मासेमारी करणाऱ्यांचे (कोळ्यांचे) जीवन माशावर अवलंबून असते. पावसाळ्यातील वादळे, जोराचा पाऊस, माशांनी अंडी घालणे न् माशांची पाण्यातील संख्या या सर्व बाबींमुळे मासेमारी थांबलेली असते. त्यामुळे या लोकांच्या जीवनपद्धतीवर मॉन्सूनचा किती मोठा प्रभाव असतो, हे सर्व जण जाणतातच.
पूर्वी व्यापारासाठी किंवा लढाईसाठी गाव वा राज्याच्या बाहेर पडण्याचा मुहूर्त म्हणजे दसरा. पावसाळा संपलेला, त्यानंतर एक उत्सव साजरा करून खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करायचे, ही रीत.

भरभराटीसोबत कला ः
पावसाने बरीच वर्षे हुलकावणी दिली. तलाव, नद्या आटल्यामुळे उपासमार यातून समूहाचे मृत्यू होणे किंवा स्थलांतर करावे लागणे. यातून नदीकाठच्या संस्कृती विलयास गेल्या. काही संस्कृती तर अतिपावसाने आलेल्या नद्यांच्या पुरामुळे उद्ध्वस्त झाल्याचे किंवा चक्क गावेच्या गावे पुराच्या गाळामध्ये दबली गेल्याचेही दिसून येते.
माणसांच्या घरांच्या, पोशाखांच्या, आहाराच्या सवयी व परंपराही हवामानाशी जोडल्या होत्या. त्यातही पावसाचा प्रभावच अधिक. जास्त पावसाच्या प्रदेशात उतरत्या छपराची घरे तर मैदानी प्रदेशात सपाट धाब्याची घरे. जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ, नाचणी तर मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू आणि कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी ही प्रमुख धान्ये. विविध कलावंत व कलेचा विकास राजांच्या व लोकांच्या आश्रयावर अवलंबून. राज्याची अन् लोकांची संपत्ती शेवटी शेतीच्या भरभराटीवर, तर शेतीची अर्थातच पावसावर. त्यामुळे चांगला पाऊस तसेच बारमाही नद्यांच्या काठांवर असलेल्या राज्यांत कलांची भरभराट भरपूर झालेली दिसते. आजची सर्वांत ठळकपणे दिसणारी कला म्हणजे शिल्पकला. तीही सर्वांच्या नजरेत भरत असली तरी गायन कला व शास्त्रीय नृत्य कला या सर्व भरभराटीच्या राज्यांमध्येच उभरतीला आल्या होत्या.

पावसावरील चक्र ः
आजही भारतीय जनमानसांवर सर्वांत जास्त प्रभाव मॉन्सूनचाच आहे. पूर्ण भारतातल्या शाळा जूनमध्येच सुरू होतात. पाऊस आणि शाळा बरोबरच सुरू होतात. आजही भारतातील शेतकरी आणि त्यांचे जीवन शंभर टक्के पावसावर अवलंबून आहे. शेतीबरोबरच सर्व ग्रामीण भारतातल्या आर्थिक उलाढाल पावसावरच आधारित असते. दुष्काळ व कमी पावसाच्या वर्षात उपासमारी होत नसली तरी आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम होतो. या ग्रामीण भागातल्या आक्रसलेल्या उलाढालीचा परिणाम शहरातील व्यापारावर पण जाणवतो. पाऊस कमी त्यामुळे दुष्काळ पडतो, त्या वेळी किती नकारात्मक परिणाम सर्व समाजावर होतो. लक्षावधी लोकांना गाव, घर, कुटुंब समाज सोडून भटकंती करावी लागते. ही समूहांची स्थलांतरे खूप मोठ्या प्रमाणात समाजात, गावात, देशात, स्थित्यंतरे घडवतात. यातून खूप मोठ्या प्रमाणात लोक जीवन, लोककला, संस्कृती, परंपरा या कायमच्या लोक पावत आहेत.

ही स्थलांतराची प्रक्रिया आजही सतत चालूच आहे. दुष्काळाच्या वर्षात शहरे लोकांनी भरून जातात. शहरांत बकालपणा येतोच, पण त्याहीपेक्षा स्थलांतरितांचे जीवनमान कस्पटासमान होऊन जाते, हे खूप दुःखद. या बरोबरच जिथे पाऊस भरपूर तिथे धरणे भरपूर. धरणांच्या पाण्याच्या भरवशावर शहरे वसली. तिथेच पाण्याची अधिक शाश्‍वती आल्याने लोकांचा ओघही शहराकडेच वाढला. लोकसंख्या वाढल्याने व्यापार, व्यवसाय आणि उलाढाल वाढले. सेवा व्यवसाय वाढले. रोजगार उपलब्धता आणि शाश्‍वती मिळाली. त्यातून येणाऱ्या समृद्धीच्या ओढीने शहरांकडील लोकांचे लोंढे वाहू लागले. हे चक्र सुरूच राहते. भारताच्या शेअर मार्केटवरही मॉन्सूनचाच प्रभाव असतो. माणसाचा इतिहास जिथपासून सापडतो, तेव्हापासून आजपर्यंत भारतीय संस्कृती व परंपरांवर मॉन्सूनचाच प्रभाव दिसत असल्याचेच स्पष्ट होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT