प्रीती भोसले
कोबी ही भाजी कच्च्या किंवा शिजवलेल्या स्वरूपात खाल्ली जाते. कमी कॅलरी, अधिक तंतुमय घटक, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असलेल्या कोबीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
पोषणमूल्य :
कोबी ही कमी कॅलरी आणि पोषणतत्त्वांनी युक्त भाजी आहे. ती आरोग्यदायी आहारात समाविष्ट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
कच्च्या चिरलेल्या कोबीमधील पोषणमूल्ये (८९ ग्रॅम)
· कॅलरी : २२ कॅलरीज
· कार्बोहायड्रेट्स : ५ ग्रॅम
· तंतूमय घटक : २.२ ग्रॅम
· प्रथिने : १ ग्रॅम
· स्निग्ध पदार्थ : ०.१ ग्रॅम
· जीवनसत्त्व क : ३६.६ मि.ग्रॅ (दैनिक गरजेच्या ६१ टक्के)
· जीवनसत्त्व के : ५३.२ मि.ग्रॅ (दैनिक गरजेच्या ६६ टक्के)
· जीवनसत्त्व बी ६ : ०.१ मि.ग्रॅ (दैनिक गरजेच्या ६ टक्के)
· फोलेट (बी९) : २४.८ मि.ग्रॅ (दैनिक गरजेच्या ६ टक्के)
· पोटॅशिअम : ११९ मि.ग्रॅ (दैनिक गरजेच्या ३ टक्के)
· मॅंगेनीज : ०.२ मि.ग्रॅ (दैनिक गरजेच्या ९ टक्के)
१) कोबीमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्व अ यांचे प्रमाण कमी असले तरी ते प्रभावी प्रमाणात असते. ही भाजी पोषणतत्त्वांनी परिपूर्ण आहे. ही भाजी कर्करोग, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते. याशिवाय, वजन कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोबी उपयुक्त आहे.
२) कोबीमध्ये ग्लुकोसिनोलेट्स संयुगे असतात, जी इसोथायोसायनेट्समध्ये परिवर्तित होतात. इसोथायोसायनेट्स ही संयुगे जळजळ, ऑक्सिडेटिव्ह ताण, कोशिका मृत्यू आणि पेशींच्या वाढीवर प्रभाव टाकतात, जे कर्करोगाच्या विकासाशी संबंधित असतात.
३) कोबीमध्ये व्हिटॅमिन क, इ, कॅरोटिनॉइड्स तसेच कॅटॅलेस, सुपरऑक्साइड डिसम्युटेज, आणि पेरऑक्सिडेजसारखे अँटिऑक्सिडंट घटक असतात. यामुळे कोबी कर्करोगविरोधी प्रभाव निर्माण करण्यास मदत करते.
४) कोबीचे सेवन स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका १८ टक्क्यांनी कमी करण्यास मदत करते. याबाबत अधिक संशोधन आणि योग्य प्रमाणात सेवनाचे मार्गदर्शन गरजेचे आहे.
५) कोबी चिरल्यावर ग्लुकोसिनोलेट्सचे रूपांतर इसोथायोसायनेट्समध्ये होते. हे इसोथायोसायनेट्स विविध पेशी प्रक्रियांवर प्रभाव टाकतात, जसे की जळजळ, ऑक्सिडेटिव्ह ताण, पेशींचा मृत्यू आणि पेशींची पुनरुत्पत्ती. तसेच रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
६) लाल आणि जांभळ्या कोबीला रंग देणारे अँथोसायनिन हे रंगद्रव्य रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता सुधारतात. नायट्रिक ऑक्साइडचे उत्पादन वाढवतात, जे रक्त प्रवाहासाठी महत्त्वाचे आहे.
७) कोबी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. कोबीमध्ये असलेले फायटोस्टीरॉल्स कोलेस्ट्रॉलच्या शोषणाशी स्पर्धा करतात आणि त्याचा रक्तप्रवाहात प्रवेश रोखतात.
८) संशोधनातून असे दिसून आले आहे की कोबी मधुमेहाच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरू शकते. कोबीमध्ये कमी कॅलरी आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे मधुमेहींसाठी आदर्श आहार आहे. अँथोसायनिन आणि पॉलीफेनॉलसारख्या संयुगांमुळे इन्शुलिन संवेदनशीलता सुधारते. रक्तातील साखरेची पातळी कमी होते. तंतुमय घटक कार्बोहायड्रेट्सच्या शोषणाची गती कमी करून रक्तातील साखरेची झपाट्याने वाढ होण्यापासून रोखते.
९) कोबीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी संयुगे मोठ्या प्रमाणावर आढळतात, जसे की ग्लुकोसिनोलेट्स, अँथोसायनिन्स, पॉलिफेनॉल्स आणि फायटोस्टीरॉल्स. ग्लुकोसिनोलेट्सचे रूपांतर
इसोथायोसायनेट्समध्ये होते, जे जळजळीशी संबंधित विविध पेशी
प्रक्रियांवर प्रभाव टाकतात. अँथोसायनिन्स रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.
१०) कोबीच्या पानांचा उपयोग बाह्य उपचारासाठी केला जातो. उदा. संधिवात वेदना, रक्तवाहिन्यांची जळजळ, सूज, इत्यादी.
११) कोबीतील सल्फोराफेन आणि अँथोसायनिन यांसारख्या संयुगांचा मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक परिणाम दिसून आला आहे. हे संयुगे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. मेंदूत होणाऱ्या जळजळीवर नियंत्रण ठेवतात.
१२) कोबीमध्ये कमी कॅलरी आणि जास्त तंतूमय घटक असल्यामुळे वजन नियंत्रणासाठी ती उपयुक्त आहे. तंतुमय घटकामुळे पचन सुधारते आणि जास्त खाण्यापासून प्रतिबंध करते.
आहारात वापर करतानाची तत्त्वे ः
१) पचनाशी संबंधित अडचणी : काही लोकांना कच्चा कोबी पचवणे कठीण जाते, ज्यामुळे पोट फुगणे, किंवा पोटदुखी होऊ शकते.
२) थायरॉइडवर परिणाम : कोबीमध्ये गॉयट्रोजेन्स असतात, जे थायरॉईड कार्यावर प्रभाव टाकू शकतात.
३) ॲलर्जिक परिणाम : काही लोकांना कोबीमुळे खाज, सूज किंवा श्वास घेण्यास अडचण होऊ शकते.
४) रक्त पातळ करण्याच्या औषधांशी प्रतिक्रिया : कोबीमध्ये जीवनसत्त्व के अधिक प्रमाणात असल्याने, अशा औषधांचा वापर करणाऱ्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- प्रीती भोसले, ८७६७९२०३८४
(सहायक प्राध्यापक, अन्नतंत्र महाविद्यालय, सरळगाव, जि. ठाणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.