Jalgaon Ndews : जळगाव ः चारा पिकांची कमी पेरणी किंवा लागवड, यंदा रब्बीत बऱ्यापैकी आहे. खानदेशात यंदा चारा मुबलक राहील. यामुळे कडबा दरात घट होण्याचे संकेत आहेत. दुधाळ पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देताना दूध उत्पादकांना यंदा फारसा खर्चही करावा लागणार नाही, अशीही स्थिती आहे.
खानदेशात सुमारे १६ लाख पशुधन आहे. यात जळगाव जिल्ह्यात साडेआठ लाख पशुधन आहे. खानदेशात दर महिन्याला पावणेतीन लाख टन चाऱ्याची गरज असते. जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा, रावेर, यावल, चोपडा, पारोळा, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारात नंदुरबार, शहादा हा भाग दूध उत्पादनात अग्रेसर आहे. यात शेळ्या - मेढ्यांची आणखी मोठी संख्या आहे. सध्या माळरानात पशुधनाला पुरेसा चारा नाही. कारण उन्हामुळे माळरानातील गवत संपले आहे. परंतु चारापिके शिवारात डोलत आहेत.
यंदा पाऊस चांगला होता. पाऊस चारापिके व चारा यासंबंधी महत्त्वाचा असतो. पाऊस वेळेत आल्याने ज्वारी, मका यांची पेरणी हवी तेवढी झाली, पण अतिपावसात खरिपातून चारा हवा तसा उपलब्ध होवू शकला नाही. खानदेशात खरिपाखाली एकूण १४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात साडेआठ लाख हेक्टरवर कापूस आहे. सुमारे ३० हजार हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार हेक्टरवर तूर आहे. तृणधान्यवर्गीय पिके म्हणजेच चारा पिकांची तीन लाख हेक्टरवर पेरणी होती. ही पेरणी तापी, गिरणा, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रात झाली. पण अतिपावसात चारा व पिकांची माती झाली.
नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर व शहाद्यातील मागील वेळेस पूर्व भागात चारा समस्या अधिकची बिकट होती. पण यंदा सर्वत्र चारा मुबलक असणार आहे. धुळ्यात साक्री, शिंदखेडा व धुळे तालुक्यात चारा अन्य भागातून आणावा लागतो. काऱण या भागात रब्बीची पेऱणी कमी असते. परंतु यंदा या भागातही चारा मुबलक असणार आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर, पारोळा, अमळनेर, जळगाव, धरणगाव, एरंडोल या भागात चाऱ्याची समस्या नाही. तापी, गिरणाकाठी व कृत्रीम जलसाठा मुबलक असलेल्या भागात मका, दादर ज्वारी आदी पिके बरी आहेत.
चाराटंचाई होणार नाही, अशी स्थिती आहे. तूर पिकाद्वारे हवा तेवढा चारा उपलब्ध झाला आहे. पुढे चाऱ्याची मोठी मागणी असणार व याच काळात ज्वारी, मक्याचा कडबा, कुट्टी उपलब्ध होणार आहे. कारण लवकरच कापणी, मळणीचे काम सुरू होईल. यंदा कडबा दर कमी होतील व चारा विक्री शेतकऱ्यांना नुकसानकारक किंवा कमी नफा देणारी ठरेल, असाही मुद्दा आहे.
बाजरीची पेरणी खानदेशात बऱ्यापैकी झाली आहे.
यातून काहीसा चारा उन्हाळ्यातही उपलब्ध होईल. त्याचे दरही आवाक्यात असतील. कृषी व पशुसंवर्धन विभागानुसार जळगाव, धुळे व नंदुरबारात सध्या चाराटंचाई नाही. पुढे सोयाबीनचा भुसा उपलब्ध होईल. दूध उत्पादक आपल्या शेतात हिरव्या चाऱ्याची लागवड करतात. तसेच कोरडा चारा किंवा कुट्टीही त्यांच्याकडे आहे. तसेच फेब्रुवारीअखेरिस रब्बीचा चाराही मिळेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.