Sangli News : सध्या हळद काढणीची (Turmeric harvesting) आणि बाजारपेठेत विक्रीची लगबग दिसत आहे. सध्या हळदीला मागणी वाढली असल्याने गेल्या आठवड्यापेक्षा दर प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी सुधारले आहेत.
त्यामुळे हळद उत्पादक (Turmeric Producer) शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. येत्या काळात हळदीच्या दरात (Turmeric rate) फारशी तेजी-मंदी येण्याची चिन्हे नसल्याचा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
यंदाच्या हंगामात जानेवारीपासून हळद विक्रीस येऊ लागली आहे. सर्वांत अगोदर निजामाबाद येथील बाजारपेठेत हळदीचे सौदे होतात. त्यानंतर सांगली बाजार समितीत नवी हळद विक्रीस येते.
निजामाबाद आणि सांगली या दोन्ही ठिकाणी हळदीची आवक वाढू लागली असल्याचे चित्र आहे. या दोन्ही बाजारपेठेत ३० ते ४० हजार पोत्यांची आवक होत आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वीपेक्षा गेल्या चार दिवसांपासून हळदीची आवक वाढली असून, उठावही होऊ लागला आहे. त्यामुळे हळदीच्या दरात प्रति क्विंटलला २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. हळदीला सरासरी ७५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
येत्या महिनाअखेर देशातील अन्य हळदीच्या बाजारपेठेत हळदीची आवक वाढण्याची शक्यता आहे. हळदीची आवक वाढली तरी दरात फारशी तेजी-मंदी येण्याची शक्यता सध्यातरी दिसत नसल्याचे हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
७० टक्के हळद काढणी उरकली
देशात हळदीचे क्षेत्र ३ लाख ५६ हजार हेक्टरवर आहे. हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात काढणीची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. सध्या ७० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली असून, ३० टक्के क्षेत्रावरील काढणी शिल्लक आहे.
शेतकरी हळद काढणीचे नियोजन करत आहेत. देशात अद्याप ३० टक्के काढणी शिल्लक असल्याने उत्पादनाचा अंदाज आताच बांधणे उचित ठरणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
इरोड, कडपा, मराठवाडा हंगाम उशिरा
हळद उत्पादन घेणाऱ्या इरोड, कडपा आणि मराठवाडा या ठिकाणी नवी हळद चैत्र पाडव्यानंतर विक्रीस येते.
त्यामुळे येथील हळद विक्रीस आल्यानंतर दरात चढ-उतार राहील, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हळदीच्या दराचा अंदाज घेऊन विक्री केली जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सांगतील दोन वेळा सौदे सुरू
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली आहे. सांगली जिल्ह्यासह सातारा, कर्नाटक या ठिकाणांहून, तसेच जळगावमधून देखील हळदीची आवक होत आहे.
त्यामुळे बाजार समितीत सकाळी आणि दुपारी असे दोन वेळा हळदीचे सौदे घेतले जातात. सध्या बाजारात १५ ते २० हजार पोत्यांची आवक होत आहे.
देशात ७० टक्के हळद काढणी झाली आहे. यंदाच्या हंगामात हळदीचे पीक चांगले असल्याने निर्यातही चांगली राहील, अशी आशा आहे.मनोज माळी, हळद संशोधन, योजना कसबेडिग्रज, जि. सांगली
गेल्या आठवड्यापेक्षा दोन ते तीन दिवसांत हळदीची आवक वाढली असून, मागणीही वाढली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. सध्या दर टिकून आहेत.गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.