Malegaon Sugar Factory
Malegaon Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon Sugar Factory : माळेगावचा ऊस गळीत शुभारंभ उपमुख्यमंत्र्यांऐवजी सभासदांच्या हस्ते

Team Agrowon

Baramati News : मराठा आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा मी आदर करतो, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या ऊस मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला येणार नसल्याचा निरोप ऐनवेळी प्रशासनाला दिला. पवारांच्या सूचनेनुसार कारखाना प्रशासनाने माळेगाव कारखान्याचा ६७ वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ सभासद व महिलांच्या हस्ते केला. या वेळी अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत मराठा आंदोलकांनीही केले.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा ६७ वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवारी (ता. २८) सभासद व महिलांच्या हस्ते पार पडला. हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होता. परंतु बारामती तालुक्यात कोणत्याही राज्यकर्त्यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली होती. त्यानुसार सकल मराठा समाजाने अजित पवार यांच्या माळेगावच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला होता.

त्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये. तसेच मराठा आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा मी आदर करतो, मोळी पूजन सभासदांच्या हस्ते करून घ्यावे, असे सांगत पवारांनी कार्यक्रमाला येणार नसल्याचा निरोप अध्यक्ष केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांच्याकडे दिला. त्यानुसार अध्यक्ष जगताप यांनीही अजित पवार यांचा निरोप आंदोलनकर्त्यांच्या सभेच्या ठिकाणी जाऊन सांगितला. या वेळी आंदोलनकर्त्यांनीही पवारांच्या या निर्णयाचे स्वागत केले.

या वेळी अध्यक्ष जगताप म्हणाले, ‘‘दुष्काळी पार्श्‍वभूमीवर ऊसटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. परिणामी, आगामी ऊस गळीत हंगाम खूपच आव्हानात्मक आहे. मुळातच माळेगावचे उसाचे कार्यक्षेत्र कमी आहे. या प्रतिकूल स्थितीत माळेगावचे १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्णत्वाला येणे खूप महत्त्वाचे आहे.

या स्थितीचा विचार करून खरेतर माळेगावच्या मोळीच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. २८) वेळ दिला होता. परंतु सकल मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यांच्या मागण्यांचा आदर करून अजितदादांनी कारखान्यावर येणार नसल्याच्या सांगितले आहे. दादांच्या सूचनेनुसार मराठा आंदोकर्त्यांमधील महिला, सभासदांच्या हस्ते मोळीचा कार्यक्रम पूर्ण करीत आहे.’’

या वेळी माळेगावचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, जि.प. माजी अध्यक्ष विश्‍वास देवकाते, माजी अध्यक्ष रंजन तावरे, दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, बारामती बाजार समितीचे सभापती सुनिल पवार, संचालक योगेश जगताप, तानाजी कोकरे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, संगिता कोकरे, नितीन सातव, सुरेश खलाटे, राजेंद्र ढवाण, दत्तात्रेय येळे, संजय काटे, स्वप्नील जगताप, बन्शिलाल आटोळे, प्रताप आटोळे, सागर जाधव, अलका पोंदकुले, सुरेश देवकाते, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Sowing : जळगाव जिल्ह्यात ५४ टक्के पेरण्या

Agriculture Input Center : बार्शी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

SRA Recruitment : ‘एसआरए’ची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा घेऊन पूर्ण करा

Hail Damage Subsidy : गुंठाभर जमीन नसणाऱ्यांना गारपिटीच्या नुकसानीचे अनुदान

Agriculture Crops : पिकांना जगविण्यासाठी धडपड

SCROLL FOR NEXT