Solapur News : दिवाळी म्हटले की फटाक्यांचा जल्लोष ठरलेला, पण कोणत्याही प्रकारचे फटाके न फोडता मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करणारे ‘पर्यावरणस्नेही गाव’ म्हणून सोलापूर जिल्ह्यातील चिंचणी (ता. पंढरपूर) गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दशकभरापासून या गावात ही परंपरा पाळली जाते. विशेष म्हणजे केवळ दिवाळीतच नव्हे, तर कोणताही सण, उत्सव वा घरगुती कार्यक्रमालाही या गावात फटाके फोडले जात नाहीत.
सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणाच्या निर्मितीनंतर १९७८ च्या सुमारास चिंचणी गावाचे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथील टप्पा या ठिकाणच्या माळरानावर पुनर्वसन करण्यात आले. जेमतेम ६५ कुटुंबांतील ३७५ लोकसंख्येचे चिंचणी गाव, वेगवेगळ्या उपक्रमामुळे आधीपासूनच प्रसिद्ध आहे.
पण आता फटाके न फोडण्याच्या परंपरेमुळे हे गाव चर्चेत आले आहे. खरे तर फटाके फोडणे, हा लहान मुलांच्या आवडीचा विषय, किंबहुना तो एक आनंदाचा, जल्लोषाचा क्षण. पण चिंचणीकर ग्रामस्थांनी गावातील मुलांना त्यामुळे होणारे ध्वनी आणि धुराचे प्रदूषण याबाबतचे नेमके समुपदेशन केल्याने चिमुकल्यांनीही आपला हट्ट सोडत पालकांच्या निर्णयाला साथ दिली.
केवळ फटाके फोडल्यानेच दिवाळी साजरी होते असे नाही, तर आज चिंचणीतील चिमुकले किल्ले बनवून दिवाळी साजरा करतात. त्याशिवाय विविध प्रकारचे खेळ खेळतात, त्यांच्यासाठी खास गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी साहित्य ठेवले आहे, त्यात ते विरंगुळा म्हणून दिवाळी सुटीचा आनंद घेतात. ग्रामीण कृषी पर्यटनाचा अनुभव देणारे गाव म्हणून पर्यटकांची पसंती मिळवली आहे. त्यामुळे गावातील उपक्रम पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल असते.
...म्हणून घेतला निर्णय
काही वर्षांपूर्वी गावात अशीच एक घटना घडली, दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांच्या जोराच्या आवाजाने एक कुत्रा घाबरून सारखा पळून जायचा. त्याच दरम्यान त्याला हा सततचा आवाज सहन न झाल्याने तो त्याच्या मालकाच्या शेतात मरण पावल्याचे आढळले.
तेव्हा संपूर्ण गावकऱ्यांची गावात बैठक झाली आणि गावात इथून पुढे कोणत्याही प्रकारचे फटाके न फोडण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. दिवाळीच्या काळात आपल्या काही क्षणांच्या आनंदासाठी गाव शिवारातील पशू-पक्ष्यांना, पाळीव प्राण्यांना फटक्यांच्या आवाजाचा त्रास होतो, याची जाणीव ग्रामस्थांना झाली. तेव्हापासून या गावात फक्त दिवाळीच नव्हे तर कुणाच्याही लग्न, वाढदिवस वा सण-उत्सवामध्ये फटाके फोडले जात नाहीत.
फटाक्यांशिवायही दिवाळी किंवा अन्य उत्सव साजरे होऊ शकतात, याची जाणीव आम्ही गावकऱ्यांना करून दिली. मुळात आपल्यालाही आवाजाचा त्रास होतो, मग जनावरे, पशू-पक्षी यांना किती त्रास होत असेल, हा विचार आम्ही केला. त्याला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला, त्यामुळेच हे शक्य झाले.मोहन अनपट, ग्रामस्थ, चिंचणी, ता. पंढरपूर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.