Mango Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Management : वातावरणाचा अंदाज घेऊन करतो हापूसचे नियोजन

Mango Farming : मंडणगड येथील खिसे कुटुंबीयांची आंबा बागायतीच्या व्यवसायात कार्यरत असलेली ही तिसरी पिढी आहे. सध्या फौजन खिसे हे सर्व व्यवसाय हाताळत आहेत. बागांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासोबतच काढणीनंतर दर्जेदार आंबा बाजारात आणण्यासाठी खिसे यांची धडपड असते.

राजेश कळंबटे

Mango Planning Management :

शेतकरी नियोजन

पीक : हापूस आंबा

शेतकरी : फौजन खिसे

गाव : मंडणगड, जि. रत्नागिरी

आंबा लागवड : २००० कलमे

मंडणगड तालुक्यातील समुद्र किनारी भागातील हापूसला मुंबईसह अन्य भागात चांगली मागणी असते. मंडणगड येथील खिसे कुटुंबीयांची आंबा बागायतीच्या व्यवसायात कार्यरत असलेली ही तिसरी पिढी आहे. सध्या फौजन खिसे हे सर्व व्यवसाय हाताळत आहेत.

बागांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासोबतच काढणीनंतर दर्जेदार आंबा बाजारात आणण्यासाठी खिसे यांची धडपड असते. त्यासाठी प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीपासूनच कामांचे योग्य नियोजन ते करतात. उत्पादित सर्व आंब्याची विक्री मुंबई येथील वाशी बाजारात केली जाते.

मागील दोन वर्षे कलमांवर चांगल्या पद्धतीने मोहोर आला होता. मात्र यावर्षी आत्तापर्यंत ४० टक्केच मोहोर आला आहे. याचा एकूण उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

तरीही वातावरणातील बदलांचा अंदाज घेऊन त्यानुसार फवारणी वेळापत्रक तयार करून कार्यवाही करण्यावर भर देण्यात येत आहे. या वर्षीचा हंगाम मे अखेरपर्यंत आंबा हंगाम चालू राहील अशी यंदाची स्थिती आहे, असे खिसे यांनी सांगितले

जून ते डिसेंबर या कालावधीतील नियोजन :

पावसाचा अंदाज घेऊन जून ते जुलै या कालावधीत खते, कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणीचे नियोजन करण्यात आले. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या प्रति झाड २ किलो प्रमाणात मात्रा देण्यात आल्या. त्यानंतर फिशमिल प्रति झाड १० किलो प्रमाणे दिले. यामुळे झाडे सशक्त होण्यास मदत होते. त्यानंतर एनपीके आठ किलो आणि कॅल्शिअम चार किलो प्रमाणे दिले.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाडांना संजीवकांच्या मात्रा देण्यात आल्या. संजीवकांचे प्रमाण झाडाच्या आकारमानानुसार ठरवून त्यानुसार देण्यात येते. त्यामुळे कलमांची फूट लवकर होण्यास मदत होते. संजीवकांच्या मात्रा कलमांच्या बुंध्याजवळ चर काढून पाण्याचे मिश्रण करून देण्यात आले.

पावसाळ्याच्या दिवसांत बागेत गवतवर्गीय तणे आणि वेली अधिक प्रमाणात पसरतात. पावसाळ्याच्या कालावधीत तण नियंत्रणासाठी काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे पाऊस कमी झाल्यावर सप्टेंबर महिन्यात बागेतील गवत काढून बागेची स्वच्छता करून घेतली.

ऑक्टोबर महिन्यात झाडांना मोहर येण्यास सुरुवात झाली. कलमांवर आलेला मोहर टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक असते. मोहरावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. कीड-रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशके आणि कीडनाशकांच्या फवारण्या घेण्यात आल्या.

या प्रतिबंधात्मक फवारण्या साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात आल्या. पावसाचा अंदाज घेऊन फवारणीचे नियोजन केले. जेणेकरून फवारणीचे चांगले परिणाम दिसून येतील. अशाप्रकारे फेब्रुवारीअखेरपर्यंत सहा फवारण्या करण्याचे नियोजित आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामान स्थिती आदी कारणांमुळे अतिरिक्त फवारण्या केल्या जातील.

आगामी नियोजन :

सध्या आंबा कलमांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शिफारशीनुसार प्रतिबंधात्मक फवारणी केली जाईल.

फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात झाडांची हलवणी केली जाईल. त्यामुळे कलमांवरील सुकलेला मोहर तसेच खराब झालेल्या कीड-रोगग्रस्त कैऱ्या गळून जमिनीवर पडतात. हलवणी करण्यामुळे कीडग्रस्त खराब झालेल्या कैऱ्यांवरील प्रादुर्भाव अन्य फळांवर पसरण्यापासून रोखला जातो. त्यानंतर झाडांचे नियमित निरीक्षण केले जाते.

फळांना चांगला रंग येण्यासाठी फळांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी कॅल्शिअमची फवारणी केली जाते. त्यामुळे फळांचा उत्तम दर्जा राखला जातो आणि विक्रीवेळी बाजारात चांगला दर मिळण्यास मदत होते. या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील आंबा काढणी तयार होईल अशी अपेक्षा आहे.

तयार झालेली आंबा फळे काळजीपूर्वक झाडांवरून काढली जातील. त्यानंतर प्रतवारी करून दर्जेदार आंबा विक्रीसाठी क्रेटमध्ये भरला जातो. काही प्रमाणात खराब झालेला आंबा कॅनिंगसाठी वेगळा केला जातो. साधारण १५०-१८०, १८०-२२०, २२०-२५०, २५०-२९०, ३०० प्लस अशा प्रकारांत प्रतवारी केली जाते.

प्रतवारी केल्यानंतर पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये आंब्यांची पॅकिंग केली जाते.

फौजन खिसे, ९४२२६३६३१३ (शब्दांकन : राजेश कळंबटे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT