Green energy Agrowon
ॲग्रो विशेष

Green Energy : कृषी शिक्षणात हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा समावेश होणार ; साखर उद्योगातून स्वागत

Agriculture Education : कृषी शिक्षणात हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची शिफारस अभ्यासगटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे साखर उद्योगातून स्वागत करण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : हरित ऊर्जा क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विस्तार विचारात घेता राज्याच्या कृषी शिक्षणात हरित ऊर्जा उत्पादन तंत्रज्ञानाचा समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हरित ऊर्जा क्षेत्राचा विस्तार व उलाढाल सतत वाढत जाणार आहे.

त्यामुळे या क्षेत्रात उच्च तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या मनुष्यबळाची मागणी वाढणार आहे. सध्या हरित ऊर्जा उत्पादन तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी कोणतीही सुविधा राज्यात उपलब्ध नाही. परिणामी चारही कृषी विद्यापीठांमध्ये असे अभ्यासक्रम सुरू करण्यास संधी आहे.

कृषी शिक्षणाचा आढावा एका अभ्यासगटाकडून सध्या घेतला जात आहे. या गटाकडून येत्या महिनाभरात हरित ऊर्जा अभ्यासक्रमाच्या समावेशाची शिफारस राज्य शासनाला केली जाणार आहे.

राज्यात आता केवळ हरित ऊर्जा उत्पादन तंत्रज्ञानविषयक छोटे अभ्यासक्रम आणून भागणार नाही; तर हरित ऊर्जा उत्पादनाचा विषय पदवीपासून ते पदव्युत्तर शिकवणारी स्वतंत्र महाविद्यालये राज्यात उघडावी लागतील, असे साखर उद्योगाचेही म्हणणे आहे.

साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले म्हणाले, ‘‘हरित ऊर्जा उत्पादन घटकाचा विकास साखर उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात एकट्या इथेनॉलचे उत्पादन आता १२५ कोटी लिटरच्या पुढे गेले आहे. साखर उद्योगाकडून सहवीज, बायोसीएनजी, इथेनॉलनंतर आता हरित हायड्रोजन उत्पादनाकडे वाटचाल होत आहे.

त्यामुळे भविष्यात हरित ऊर्जा हा विषय कृषी शिक्षण व संशोधनात अतिशय महत्त्वाचा होईल. अर्थात, या विषयाला केवळ एका अभ्यासक्रमापुरते मर्यादित ठेवता येणार नाही. या विषयाची खोलवर तांत्रिक माहिती देणारी स्वतंत्र महाविद्यालये उघडल्यास त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळू शकतो.’’

पुढचा टप्पा ऊर्जा पीक उत्पादनशास्त्राचा

वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, ‘‘राज्यात कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालये आहेत. आता त्याचा पुढचा टप्पा ऊर्जा पीक उत्पादनशास्त्राचा असेल. त्यामुळे काळाची पावले ओळखून या विषयावर गांभीर्याने काम करीत असल्यास राज्य शासनाचे स्वागत करायला हवे.

ऊर्जा पिकांच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत सर्व शास्त्र सखोलपणे आता अभ्यासक्रमात आणावे लागेल. कारण, ऊर्जा पिके हीच हरित ऊर्जा उत्पादनाचा प्रमुख कच्चा माल आहेत. कच्चा माल ताब्यात आल्यानंतर ऊर्जा कशी तयार करायची हा पुन्हा तंत्रज्ञानाचा मुद्दा आहे. तोदेखील अभ्यासक्रमात आणावा लागेल.’’

हरित ऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान हा विषय आता जगाच्या कृषी व्यवस्थेत महत्त्वाची जागा घेऊ पाहतो आहे. त्यामुळे या विषयात राज्याला आघाडीवर ठेवण्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची शिफारस केली जाईल.
- रावसाहेब भागडे, महासंचालक, कृषी शिक्षण व संशोधन परिषद.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT