Indian Social Structure
Indian Social Structure Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Social Structure : गावात राहून आलेला भकासपणा संपत नाही तेव्हा...

Dhananjay Sanap

लेखक- धनंजय सानप

----------------

देवीच्या मंदिरापासून सरळ चालत शऱ्या घराकडे गेलेला. सुन्यानं मोरे मास्तरच्या घराकडे वळून चालण्याचा स्पीड वाढवला. त्याच्या मनावर सध्या कसलाच भार नव्हता. त्याला शऱ्याला भेटल्यापासून थोडंसं हलकं वाटलं होतं. भलेही त्याच्यासमोर मनातला सगळा कोलाहल बाहेर काढता आला नसला, तरी त्याला थोडं हलकं वाटत होतं. कदाचित दादानं जेवायला कॉल केला म्हणून असं त्याला वाटत असावं.

आखाड्यावरून चालत येताना देवीच्या मंदिराजवळ त्याला उगाच भकास वाटलं. अनेकदा असं झालं की, तो स्वतःला चिमटा काढायचा. त्याला भकास वाटणं क्षणिक असायचं. अशावेळी त्याला खोल डोहात शिरल्यासारखं वाटायचं. अनोळखी जागेवर किंवा कुठं तरी शिरून हा भकासपणा पिऊन टाकण्याचा मोह व्हायचा. देवीच्या मंदिरापासून पुढं आल्यावर त्याला ओट्यावर घोळक्यात बसलेली माणसं दिसली. जेवण करून निवांत गुटखा चघळत किंवा तंबाखू मळत बसलेली माणसं ओट्यावर बसून हसत होती. त्याला तो घोळका पाहून कधी त्यांना ओलांडून पुढं जातोय, असं झालेलं. पण त्यानं ते फार मनावर घेतलं नाही. त्याच्या चालण्याच्या गतीत अजून तरी जराही बदल झालेला नव्हता. तो चालत चालत घोळका ओलांडून मोरे मास्तरच्या घराजवळ आला.

तिथून घर जसं जवळ येत होतं, तशी त्याला दादाची अंधुकशी आकृती दारात उभी दिसली. अंगात बनियान आणि कमेराला लुंगी गुंडाळलेल्या अवस्थेत पाण्याचा तांब्या हातात घेऊन दादा चूळ भरत होते. आणि खाकरत पाण्याच्या पिचकाऱ्या घरासमोरच्या नालीत मारत होते. तो आता घराजवळ पोहचला. दादाला बोलावं की नाही या विचारात मुख्य दारातून घरात शिरला.

त्यानं पायातली चप्पल दरवाजाच्या मागच्या बाजूला सोडली. त्याला वाटलं होतं, दादा काहीतरी बोलतील, पण सगळं काही घरात शांत होतं. त्यानं बाथरूम जवळच्या बादलीतलं पाणी हातावर घेतलं. हात नुसतेच एकमेकांवर चोळून खिळ्यावरच्या टॉवेलला पुसले. समोरच्या खोलीतून बाई बाई म्हणत किचन गाठलं. तशी माय गॅसवरचं पातेलं उतरवत म्हणाली, "आलास व्हय! बस बरं जेवायला. किती येळची वाट पाहत बसलोत आम्ही! ते पण जेवयाचे राहिलेत!" त्याला 'ते पण' राहिलेत यावर जरासं आश्चर्य वाटलं.

संध्याकाळी झालेला राडा पाहता त्याला दादानं फोन करणं अपेक्षित नव्हतं. पण त्याला त्यावेळीच अंदाज आलेला की, बाईनं फोन करायला सांगितलेलं असणार. किचन मधून मागच्या खोलीकडे जात त्यानं खिशातला मोबाईल काढला. त्याला चार्जरची पिन खोसली. जीन्स काढून खोलीतल्या भिंतीवरच्या खिळ्याला अडकवली. संध्याकाळी बेडवर टाकलेली नाईट पॅन्ट घातली. आणि किचनमध्ये येत बाईला म्हणला, "जेवायला वाढ बरं बाई! लैच भूक लागलीय." बाईनं रॅकमधलं स्टीलचं ताट काढलं. पातेल्यात पळी फिरवत वरण चकूल्या ताटात वाढल्या. आणि दादाला आवाज दिला.

"अहो, चला बरं भाकर खायला." तोवर दादा लुंगीला एक हात पुसत किचनमध्ये आले. त्यांनी हातातला तांब्या बाईकडे दिला आणि मांडी घालून बसले. तिनं बाप-लेकासाठी दोन ताटं लावली अन् स्वतःसाठी आकारानं छोटीशी प्लेट घेऊन गॅस जवळच जेवायला बसली. सुन्या गप मान खाली घालून वरण चकूल्या ओरपत होता. दादा काहीतरी बोलतील, असं कुठंतरी मनात सुरू होतं. तेवढ्यात बाई दादाकड पाहत म्हणाली, "उद्या साडेगावच्या बाबू मामाच्या नातीचं लग्नय. तुम्ही जाल का? परादिशी सकाळीचं बाबूमामाचा सुरेश पत्रिका अन् मूळ द्यायला आलता." बाईचं ऐकत ऐकत दादानं वरणाचा फुरका हाणला. तसा त्यांना ठसका लागला.

सुन्या डाव्या हातानं ग्लास दादाकडे सरकवत म्हणला, "हं पाणी घ्या." दादानं पाण्याचा घोट घेतला. ग्लास खाली ठेवत एक हात मांडीवर ठेवत म्हणाले, "मला नाई व्हायचं जाणं. उद्या सकाळीच पाटलाच्या सोन्याकड जावं लागणारे. वरचं रान नांगरून घ्यायचंय. पावसाळा आलाय तोंडावर. रान तळाय पाहिजे. तू आणि बबल्याला जा." तसं सुन्याला धसकन झालं. दादाचं वाक्य ऐकून सुन्याला वाटलं लगेच नकार कळवावा. पण दादा पुन्हा शिव्या घालायचे म्हणून त्यानं शब्दही काढला नाही.

बाई म्हणली, "सुरेश आपल्या छकुलीच्या लग्नात दोन दिस इकडंच व्हता. आपुन लग्नाला गेलो नाही तर बरं वाटन का? बरं जाऊ द्या. मी जाते बबलूला घेऊन. व्हय रं बबलू येशीन का ?" सुन्यानं नुसतं बघू म्हणत तोंडात घास घेतला. तसं दादा घास चघळत म्हणाले, "बघू म्हंजी काय? उद्या कुठं झक मारायचीय तुला ? कलेक्टरची मिटिंगय लागलीय तोह्या मागं." सुन्याला काहीच बोलावं वाटत नव्हतं. तेवढ्यात बाई म्हणली, "बास झालं. जेवा आपलं." बराच वेळ नुसताच घास चावल्याचा आवाज येत होता. बाई सुन्याला आग्रह करत होती. दादाचं नेहमीप्रमाणं जेवण आवरलं होतं. त्यांना जेवताना पाहून सुन्याला कायम किळसवाणं वाटायचं. भूत मागं लागल्यागत बाप जेवतो, असा विचारही त्याच्या मनात येऊन गेला.

दादानं ताटात हात धुत ताट जागेवरचं पुढं ढकललं. आणि ढुंगणावर मागं सरकत भिंतीला पाठ देऊन बसले. बनियानच्या खिशातली एक बारीक काडी घेऊन दादा दात टोकरत बसले. सुन्या आणि बाईचं जेवण सुरू होतं. दात टोकरत दादा मधेच म्हणाले, "व्हय रं, आज कुठं गेलता दुपारी?" सुन्याला अंदाज आला होता. दादाला कुणीतरी सांगितलं असणार आपण संत्यासोबत गेलेलो. सुन्या घास चघळत म्हणला, "कुठं नाई इथंच व्हतो." "मला गण्या म्हणत होता, तू त्या संत्यासोबत कडेगावला गेलता म्हणून!" दादानं सरळ विचारलं होतं. सुन्याला वाटलं, आता मुद्दा फिरवण्यात मजा नाही. म्हणून सुन्या म्हणला,"हा तिकडं गेलतो जरा!" "आरं संगती जरा धड पोरांच्या ठेव. त्येव संत्या माप टाकून असतोय. तुम्ही बी नादाला लागतान. कोणाच्या संगतीत ऱ्हांव हेही बी सांगाव लागतंय. शिकून सवरून काय उपोग दिसत नाही. धड नोकरी लागना अन् काहीच होईना. त्येव मोरे मास्तरचा शुभ्या मायला मागून आला बी मास्तर झाला बी. अन् आपलं अजून शिकणंच सुरूय."

सुन्या न राहून म्हणला, "मास्तरनं शुभ्याच्या नोकरीसाठी पंधरा लाख न्याट भरलेत. आपली हाई का तेवढी औकात?" सुन्याला बापानं केलेल्या तुलनेचा राग आलेला. त्यावर दादा दात खात म्हणाले, "आता फक्त अंगाची कातडी विकून लावायची राहिलीय तोह्या शिक्षणासाठी. बारावी झालती त्याच येळला म्हणलो होतो, डीएड कर. पण नाई गडी म्हणला आपल्याला एम्पीऐशी करायचीय. झालं पाच वरीस तेच सुरुय. आतालोक काय कमी पडू देलंय का तुला?" दादानं मुद्द्यावर बोट ठेवलं होतं. सुन्याला काय बोलावं सुचत नव्हतं. खात्या ताटावरही बापाची कटकट सुरूच होती. पण बाईच्या आग्रहानं पोटभर हादडून झालं होतं. तसंही मेसचं पोचट खाऊन पोटाची खळगी अर्धी रिकामीच राहत होती. पोट भरलं होतच म्हणून सुन्या राग आल्यागत ताडकन उठला आणि हात धुत म्हणला, "लोकांचं गोड वाटतंय तुम्हाला. इथं म्या तुमचे पैसे उधळतच सुटलोय ना! लै तालेवाराच्या घरात जन्मलो मी."

पोट भरल्यावर सुन्याला बोलायला जोर चढला होता. बाई नुसतं ऐकून घेत होती. तिला यातलं काहीच कळत नव्हतं. तिचा हा जणू प्रांतच नव्हता. तिला फक्त सुन्यानं शिकावं एवढंच वाटत होतं. दादानं सुन्याचा शब्द खाली पडूच दिला नाही. "तोह्या शिकण्याचा आम्हाला तर काही उपोग होईन असं वाटत नाई. पैसे लावून जीव जायचा टाईम आलाय. त्येव एकनाथचा थोरला न शिकताही लागला कामाला." दादा मानेला हिसडा देत बोलत होते. सुन्या म्हणला, "मग लावूच नका. मी मपलं बघतो." "दलिंदर वाणाच्या एवढी जीभ चालायला लागलीय, त दोन रुपये कमुन दाखव." बापाच्या प्रॅक्टिकल वाक्यावर सुन्याला काहीच बोलता आलं नाही. त्यानं तांब्यातलं पाणी गटागटा पिलं आणि मागच्या खोलीत मोबाईल घ्यायला गेला. मोबाईल अजून चार्ज झाला नव्हता. बाईचं जेवण झालं होतं. तिनं दादाला नुसतं शांत राहण्याचा इशारा केला.

बाप लेकाच्या कटकटीला ती वैतागली होती. दादाचा मात्र पट्टा सुरूच होता. सुन्याला मागच्या खोलीत सगळं ऐकू येत होतं. आपला बाप बोलतोय त्यात चूकही काही नव्हतं, याचीही जाणीव त्याला झालेली होतीच. त्यामुळं ऐकून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्याला वाटत होतं, खरं सांगून टाकावं आणि विषय कायमचा संपून टाकावा. पण त्याचं मन तयार नव्हतं. किंबहुना त्याच्या मनाची अजून तयारी झालेली नव्हती. आता जर सांगून मोकळंही झालो तरी इकडं गावात राहून काय करणार? तसंही या गावात करण्यासारखं आहे तरी काय? मोबाईल चार्जिंगचा काढत सुन्यानं बेडवर अंग टाकलं. बाई आवराआवर करत होती. दादाचं आता बोलणं थांबलं होतं. मोबाईल स्क्रीनवर बोट फिरवत त्यानं उगाच कॉल हिस्ट्री चेक केली. व्हॉटसअँपला स्टडी ग्रुपचे दोन तीन मेसेज पडलेले होते. त्या मेसेजकडे दुर्लक्ष करत त्यानं कुलरचं बटन टाकलं. कुलरच्या आवाजानं बाहेरचा आवाज येणं बंद झालेलं.

मागच्या तीन प्रयत्नात हाती काहीच लागलं नव्हतं. परीक्षेचा अर्ज करण्यात उगाच पैसा जातो. आणि वेळही. सुन्या वयाच्या पंचविशीत होता. घरची परिस्थिती जेमतेम होती. बारावी नंतर डीएड कर म्हणून बाप मागं लागलेला. पण सुन्याला मास्तर होण्यात रस नव्हता. आणि परत नोकरीसाठी वणवण करत फिरण्यापेक्षा त्याला बी.ए करणं सोपं वाटलं. त्यासाठी औरंगाबादच्या एस के आर्टस् आणि कॉमर्स कॉलेजला प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केलेला. सुरुवातीला त्याला आपलं काहीतरी होईल असं वाटत होतं. पण मागच्या काही वर्षात जागा निघणं कमी होत गेलं. आणि अर्ज करणाऱ्याची संख्या वाढत गेली. त्यात त्याचा अभ्यासाचा उत्साह कमी होत गेला.

कित्येक वेळा तर तो नुसताच खोलीवर बसून असायचा. दिवसभर मोबाईलवर पिक्चर पाहणं आणि अधूनमधून उगाच जाडजूड ठोकळा हातात घेऊन बसणं एवढंच त्याचा दिनक्रम ठरलेला होता. वाचलेलं काहीच लक्षात राहत नव्हतं. सतत आपलं काही खरं नाही, याची भीती त्याला पोखरत होती. त्यात एका बाजूला दादाचा धोश्या आणि बाईचं सांत्वन सुरू असायचं. छकुली होती, तोवर किमान आधार वाटायचा. तिच्याशी बोलता यायचं. पण तिचं लग्न झालं आणि ती तिच्या संसारात रमून गेली. उरलो फक्त आपणच याच मनस्थितीत त्याचे दिवस ढकलणं सुरू होतं. बेडवर पडल्या पडल्या त्याला पाश्चातपाचे उमाळे दाटून येत होते.

वाटत होतं, कुठं तरी निघून जावं कायमचं. मग बाई आठवायची. तिचं फाटका आधार आठवायचा. आणि सारं काही मिटून जायचं. आता त्याला थोडं भरून आलं होतं. पडल्या जागीच त्यानं मोबाईल बाजूला टाकला. आणि डोळे मिटून घेतले. तेवढ्यात त्याला शऱ्याचा मेसेज आला. 'आज्जीची तब्येत बिघडलीय. तिला घेऊन खैरबांडे डॉक्टरकड जातोय. बापानं घरी पुन्हा राडा केलाय.' सुन्यानं त्यावर 'दवाखान्यात पोहचतो' रिप्लाय देत मोबाईलमध्ये वेळ बघितला. नऊ वाजून पस्तीस मिनिटं झाली होती. त्यानं खोलीतलं कुलर बंद केलं. आणि तसाच टी शर्ट नाईट पॅन्टवर तो खोलीतून बाहेर आला. बाई दादाच्या मोबाईल वर छकुलीला बोलत बसलेली होती. दादा बाहेर गेले होते. त्यानं बाईला बाहेर जाऊन येतो असं खुणवत दरवाज्याच्या मागची चप्पल पायात घातली आणि तो चालत मंदिराच्या दिशेने निघाला.

क्रमशः

#गोतावळा_५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा भावावरील दबाव कायम; कापूस, सोयाबीन, तूर तसेच कांदा यांचे बाजारभाव काय आहेत ?

Sugar Production : साखर उत्पादन वाढले पाच लाख टनांनी, उतारा मात्र घटला

Electricity Issue : नियमित विजेची नागरिकांची मागणी

Soybean Seed Processing : सोयाबीन बीज प्रक्रियेवर जोर

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

SCROLL FOR NEXT